इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

कोल्हापूर जिल्ह्याचे काम राज्यात आदर्श - मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय कोल्हापूरने ई-जमाबंदी प्रयोग यशस्वी करावा






            कोल्हापूर, दि. 10 : कोल्हापूर जिल्ह्याचे काम राज्यात आदर्श असून पर्यटन, विमानतळ, आरोग्य विभागातील रिक्त पदे आदी विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी  शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असा विश्वास राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिला. तसेच ई-डिस्निक प्रणाली कोल्हापूर जिल्ह्याने यशस्वी केली असून आता यापुढे जाऊन ई-जमाबंदी प्रयोगही यशस्वी करावा, असे सांगून  26 जानेवारी पर्यंत कोल्हापूर जिल्हा 100 टक्के हागणदारीमुक्त व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या.
            जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महानगरपालिका आयुक्त पी.शिवशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह सर्वसंबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
            कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव असल्याचे स्पष्ट करुन स्वाधीन क्षत्रिय म्हणाले, कोल्हापूरच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी नव्या-नव्या उपाययोजना प्रशासनाने हाती घ्याव्यात. तसेच कोल्हापूरच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी विमान सेवा सुरु करण्यासाठी रिजनल कनेक्टीव्हीटी स्किम अंतर्गत यासाठी प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना त्यांनी केली. याबरोबरच महालक्ष्मी तिर्थक्षेत्र विकास आराखडा, जोतिबा परिसर विकास आराखडा यासह जिल्ह्यातील अन्य तिर्थक्षेत्र विकास आणि पर्यटन विकासाच्या योजनांना शासनस्तरावर प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने पन्हाळा लाईट व साऊंड शो याचा दर्जेदार आणि गुणात्मक आराखडा बनवावा, अशी सूचना त्यांनी केली. शाहू स्मारक भवन टुरिस्ट हब म्हणून विकसित करण्याबरोबरच अन्य पर्यटन स्थळांच्या विकासास प्राधान्य दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यावेळी सांगितले.   
कोल्हापूरने ई-जमाबंदी प्रणाली यशस्वी करावी- मुख्य सचिव
            कोल्हापूर जिल्ह्याने विकसित केलेल्या ई-डिस्निक प्रणालीचा संपूर्ण राज्यात आवलंब केला जात असून आता ई जमाबंदी ही प्रणाली विकसित करुन आणखी एक पाऊल पुढे टाकावे यासाठी शुभेच्छा देऊन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याने अनेक योजना सुरु करुन त्यांची राज्यस्तरावर नोंद घेतली जाते. यामध्ये तलाठ्यांना लॅपटॉप देण्याचा प्रकल्प कोल्हापूरने सुरु केला. ई-डिस्निक प्रणाली कोल्हापूरने सुरु केली. स्वच्छता अभियानात कोल्हापूरने केलेली कामगिरी, आरोग्य विभागाचा कायपालट योजना अशा अनेकविध योजनांची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्याने केली, आणि त्या योजना राज्याने स्विकारल्या ही कोल्हापूरच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे.
            शासनाच्या सर्व योजनांसाठी आधार कार्ड लिंक करण्याच्या उपक्रमाचीही यावेळी माहिती देण्यात आली. आधारसाठी एकच खाते निश्चित करावे याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने द्यावा. त्याचा राज्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या आधारसाठीच्या कायद्यामध्ये अंतर्भाव करण्याबाबत कार्यवाही करणे सोईचे होईल, जिल्ह्यातील पुरवठा विभाग अधिक लोकाभिमुख आणि सक्षम करण्यासाठी सर्व रेशन दुकानामध्ये बायोमॅट्रीक प्रणाली सुरु करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. तसेच जिल्ह्यात तलाठी सज्जच्या ठिकाणी चावड्या उभारण्यासाठी शासनाची योजना असून या योजनेतून जिल्ह्यातील चावड्यांची उभारणी करण्याचा प्रस्ताव तात्काळ पाठवावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            हागणदारीमुक्तीत कोल्हापूर जिल्ह्याने भरीव काम केल्याबद्दल समाधान व्यक्त करुन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय म्हणाले, जिल्ह्यातील 9 नगरपालिकापैकी 8 नगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका हागणदारीमुक्त झाली असून जिल्ह्यातील 1029 गावेही हागणदारीमुक्त घोषित केली आहेत. जिल्ह्यात 4 लाख 93 हजार वैयक्तिक शौचालय असून अद्यापही 37 हजार शौचालयांची आवश्यकता आहे. 26 जानेवारीपर्यंत 100 टक्के जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषदेने तसेच महानगरपालिकेने पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. महानगरपालिकेच्या सेफ सिटी अंतर्गत उभारलेल्या सी.सी.टी.व्ही प्रकल्पाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.
            जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात गेल्या वर्षी 69 गावांची निवड करुन सिंचनाची व्यवस्था केली आहे. कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक कळंबा तलाव लोकसहभागातून गाळमुक्त करुन मोठा पाणीसाठा उपलब्ध झाल्याबद्दलही मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी प्रशासनाचे कौतुक केले. यंदा जलयुक्त शिवार अभियानातून 20 गावांची निवड केली असून यासाठी 622 कामांचा 30 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार येत्या 31 मार्च अखेर जलयुक्त शिवारचे काम पूर्ण केले जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी स्पष्ट केले.
            यावेळी आरोग्य, तंत्र शिक्षण, कृषी, रस्ते विकास, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, वन, महानगरपालिका, नगरपालिका, सामाजिक अर्थ सहाय्याच्या योजना, जिल्हा खनिकर्म  विकास, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, पर्यटन, आधार लिंकिंग अशा सर्व विभागांचा मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालय आदर्श इमारत : स्वाधिन क्षत्रिय
            कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे हेरिटेज इमारत असून नवीन इमारतही अतिशय दर्जेदार उभारली असल्याचे  गौरवोदगार स्वाधीन क्षत्रिय यांनी यावेळी काढले. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी या इमारतीची पाहणी करुन विविध विभागांना भेटी दिल्या. अंतर्गत उपाययोजनांसाठी ह्दय योजनेमधून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना त्यांनी केली.
            जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहिती दिली. शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी आभार मानले. या बैठकीस सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.