गावाच्या शिवारात पडणारे पावसाचे पाणी आडवून ते मुरविण्याच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे आजरा तालुक्यातील लाकुडवाडी शिवारातील विहिरींच्या तसेच बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पिकांना संरक्षित पाणी उपलब्ध झाल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हे अभियान यापुढेही गतीमान करण्याचा गावकऱ्यांचा संकल्प आहे.
|
आजरा शहरापासून 20 किमी अंतरावरील हे लाकुडवाडी गाव पाण्याच्या दुर्भीक्षापासून मार्ग काढण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची साथ लाभली. गेल्या वर्षी लाकुडवाडी गावकऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानाद्वारे गावात शेततळी, वनराई बंधारे, सिमेंट नालाबांध, माती नालाबांध, जमीन सपाटीकरण अशी जलसंधारणाची कामे हाती घेऊन गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, पाझर तलावातील गाळ काढणे व दुरुस्ती करणे याद्वारे गावाच्या शिवारात पडणारा थेंब अन् थेंड आडवून तो जमिनीत मुरविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे गावात जवळपास 10 टीसीएम इतका पाणीसाठा निर्माण होऊ शकला आहे. त्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होऊन रब्बी आणि खरीपातील पिकांना संरक्षित पाणी मिळू लागले.
जलयुक्त शिवार अभियानातून लाकुडवाडी गावातील 134 हेक्टर क्षेत्र जलसंधारणाच्या कामांसाठी निवडण्यात आले, त्यासाठी जवळपास 26 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. शासनाचा निधी आणि गावकऱ्यांचा लोकसहभाग यामुळे लाकुडवाडी गावात जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविले गेले. या अभियानातून गावात शेततळी, सिमेंट नालाबांधाची कामे मोठ्या प्रमाणावर झाल्याने जवळपास 10 टीसीएम इतका पाणीसाठा होऊ शकला आहे, त्यामुळे गावातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होऊन कोरडवाहू शेतील स्थैर्य लाभले.
लाकुडवाडी गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शेततळी व नालाबांधाची कामे हाती घेतल्याने 3 हेक्टर
क्षेत्र सिंचनाखाली येत असून नगदी व भाजीपाला पिकांना हे अभियान वरदायी ठरले आहे. याबरोबरच माती नालाबांध, जमीन सपाटीकरण, वनराई बंधारे अशा जलसंधारणाच्या प्रणालीमुळे जमिनीची धुप थांबली आहे. जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब अन् थेंब आडला गेला आणि सिंचन क्षेत्रात वाढ झाली. त्यामुळे विहिरींची पाणी पातळी वाढून पिकांना संरक्षित पाणी उपलब्ध झाले. गावामध्ये भात, सोयाबीन, ज्वारी, नाचणी तसेच भुईमुग, गहू, हरबरा, मक्का व चारा पिके मोठ्या प्रमाणात होऊ लागली. यंदाच्या खरीपामध्ये भाताची उत्पादकता 2026.1 कि.प्रती हेक्टर, नाचणी 1431.8 कि.प्रती हेक्टर, भुईमूग 1232.8 कि.प्रती हेक्टर आहे. तसेच रब्बी हंगामामध्ये गव्हाची उत्पादकता 2500 कि.प्रती हेक्टर, हरबरा 561.1 कि.प्रती हेक्टर, मक्का 3000 कि.प्रती हेक्टर आणि ऊसाची उत्पादकाता 58.6 टन प्रती हेक्टर आहे.
जलयुक्त शिवार अभियानामुळे लाकुडवाडी गावाच्या शिवारात पाणी मुरल्याने विहिरीच्या तसेच बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे पिकांना संरक्षित पाणी देणे गावकऱ्यांना शक्य झाल्याचे मतही लाभधारक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे लाकुडवाडी सारख्या कोरडवाहू गावाच्या शिवारात सिंचनाची क्षमता निर्माण होऊन पिकांच्या उत्पादकतेत वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यास मदतच झाली आहे.
एस.आर.माने
माहिती अधिकारी, कोल्हापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.