इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, १ ऑक्टोबर, २०१६

विकासासाठी उत्पन्न आणि कर दोन्हीची वाढ महत्वाची - पालकमंत्री चंद्रकांत पाटील





        
कोल्हापूर, दि. 1 : राज्याच्या उत्पन्नात कराद्वारे जमा होणारा महसूल अत्यंत महत्वाचा असून विकासासाठी व्यवसाय आणि कर या दोन्होंची वृध्दी आवश्यक महत्वाची असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात ताराराणी सभागृहात विक्रीकर दिनानिमित्त विक्रीकर दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे प्रमुख पाहूणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षिरसागर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, अप्पर विक्रीकर आयुक्त सी.एम.कांबळे, विक्रीकर सह आयुक्त व्ही.एस.इंदलकर, नगरसेवक अशोकराव जाधव, राज्यपत्रित अधिकारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
            राज्य चालविण्यासाठी जमा होणारा कर महत्वाचा असून करदात्यांनी वेळेवर आणि नियमित कर भरावा यासाठी प्रेरीत करणे आवश्यक असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, करदात्यांच्या मनातील या विभागा विषयाची भिती नाहीशी होऊन त्यांच्यात सहजतेचे नाते निर्माण होण्यासाठी नियमित आणि वेळेवर कर भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचीही आवश्यकता आहे. व्यवसायिकांची त्यांच्या व्यवसायात भरघोस वाढ व्हावी आणि त्या व्यवसायावरील करातही भरघोस वृध्दी व्हावी, अशा शुभेच्छा पालकमंत्री पाटील यांनी दिल्या. आयकर विभागाच्या कार्यालयाच्या जागेसंबंधीचा विषयही लवकरच सोडविण्यात येईल, तसेच राज्यातील 1200 विक्रीकर अधिकाऱ्यांच्या वेतनश्रेणी संदर्भातील प्रश्नही लवकरच निकाली निघेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            राज्याला दरवर्षी 13 हजार कोटींचे व्याज भरावे लागते. शासनाच्या मालकीच्या असलेल्या मालमत्ता तारण देऊन कमी व्याज दराचे कर्ज मिळविण्यासाठी त्याद्वारे मोठ्या प्रकल्पांची उभारणी करुन विकासाची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशिल असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
             खासदार धनंजय महाडिक यांनी नव्याने येऊ घातलेल्या जीएसटी प्रणालीचे अवलंबन सुटसुटीत पध्दतीने व्हावे त्यातून करदात्यांची संख्या वाढावी अशी अपेक्षा व्यक्त करुन करप्रणालीमध्ये कोल्हापूरच्या जनतेचे योगदान वाढावे यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या विभागाचे केंद्र शासनाच्या पातळीवरील विषय सोडविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            अप्पर विक्रीकर आयुक्त सी.एम.कांबळे यांनी जीएसटी कायदा एप्रिल 2017 पासून येऊ घातला असून त्यासाठी आवश्यक ट्रेनिंगची सुरुवात लवकरच करण्यात येईल, असे सांगून कोल्हापूर परिक्षेत्राला असणारे 2224 कोटींच्या उद्दिष्टांपैकी 6 महिन्यात 1026 कोटींची उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी केलेला पाठपुरावा आणि व्यापारी वर्गाने दिलेला सकारात्मक प्रतिसाद करणीभूत असल्याचे स्पष्ट करुन यापुढेही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी करदात्याला कोणतीही हानी होता कर संकलन करावे, असे सांगितले.
            कार्यक्रमाचे प्रस्ताविक विक्रीकर सह आयुक्त व्ही.एस.इंदलकर यांनी  केले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अचुक वेळेत कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मे.टाटा कमिन्स प्रा.लिचे रवींद्र माने., मे. मोहन ऍ़टो इंडस्ट्रीचे तेज घाटगे, मेनन अँड मेनन प्रा.लि.चे विजय मेनन, घाडगे-पाटील प्रा.लि.चे, किरण पाटील, के.पी.जी.ऍ़टो.लि.चे गौरव घाटगे, यश मेटॅलिक्स प्रा.लि.चे यतिन जानवाडकर, मे.फ्युअल इन्स्ट्युटमेंटस् ऍ़ण्ड इंजिनिअर्स प्रा.लि.चे अमोद कुलकर्णी एस.के.सोमन यांचा सत्कार करण्यात आला.

 0 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.