इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

हागणदारीमुक्त कोल्हापूर




   
  केंद्राच्या स्वच्छ  भारत अभियानाच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस  यांनी राज्यातही स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवून स्वच्छ महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यात आघाडी घेतली आहे. कोल्हापूर जिल्हयानेही याकामी सक्रीय होऊन हे अभियान गतीमान केले. उत्स्फूर्त लोकसहभागामुळे जिल्हयातील 1029 गावांपैकी 1026 गावे हागणदारीमुक्त झाली असून, 3 गावांची घोषणाही अपेक्षित आहे. 9 नगरपरिषदापैकी 8 नगरपरिषदा आणि कोल्हापूर महानगरपालिकाही हागणदारीमुक्त झाली आहे. खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्हा संपूर्णत: हागणदारीमुक्त होत आहे. ही जिल्हा वासियांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.   


अस्वच्छता ही आजारांची जननी असल्याने प्रत्येकाने वैयक्तिक तसेच सार्वजनिक  स्वच्छता जोपासणे अगत्याचे बनले आहे. नेमकी हीच बाब डोळयासमोर ठेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु करुन संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ, सुंदर, समृध्द करण्यावर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  संपूर्ण देशात गेल्या दोन वर्षापासून सुरु  केलेल्या  स्वच्छ  भारत    अभियानाला उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला. स्वच्छ भारत अभियान  हे केवळ एक अभियान राहीले नसून ती देशव्यापी लोकचळवळ बनली आहे. राज्यातही मुख्यमंत्री देवेंन्द्र  फडणवीस यांनी   स्वच्छ महाराष्ट्रासाठी दमदार पावले टाकून हे अभियान गतिमान केले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानातून जनमाणसाचं जीवन  स्वच्छ, सुंदर, समृध्द बनू लागले आहे. नागरिकांच्या सहभागातून परिसर, रस्ते, गांव व शहरे स्वच्छ व निटनेटकी होत आहेत. यामध्ये शहरी व ग्रामीण स्वच्छा अभियानाचा सहभाग असून व्यक्तीगत व सार्वजनिक शौचालये निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकांना शौचालयासह स्वच्छता, सुविधा उपलब्ध करण्याचा मुख्य उद्देश या अभियानांतर्गत ठेवण्यात आला असून त्यादृष्टीन शासनाची गतीमान वाटचालही सुरु आहे.
जिल्हयात स्वच्छ भारत अभियानाने आज गती घेतली असुन जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महापालिका आयुक्त के. शिवशंकर यांनी जिल्हयातील मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच सर्व यंत्रणाच्या सक्रीय लोकसहभागातून हे अभियान प्रभावी केले आहे. जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण भागात हे अभियान राबविण्यात नागरिकाकडून लाभत असलेला सक्रीय योगदानही तितकेच मोलाचे आहे. स्वच्छ महाराष्ट्र  अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीव्दारे संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी  यांनी पुढाकार घेतलेला पुढाकार आणि केलेले  नियोजन कौतुकास्पद आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर व जिल्हयात लोकसहभागातून स्वच्छता मोहिम राबू लागली आहे.जिल्हा परिषदेनेही स्वच्छ महाराष्ट्र अभियान गतीमान केले असून स्वच्छतेमध्ये सातत्य ठेवण्यावरही भर दिला आहे. जिल्हा परिषदेने जिल्हयातील गावागावात स्वच्छता अभियान गतीमान करुन सर्व गावे स्वच्छ, सुंदर आणि समृध्द केली आहेत. याकामी गावकऱ्यांचा सक्रीय लोकसहभागही तितकाच महत्वाचा आहे. जिल्हयातील 1029 गांवापैकी 1026 गांवे हागणदारीमुक्त झाली असून, चंदगड तालुक्यातील केवळ 3 गावांची घोषणा लवकरच अपेक्षित आहे. या 3 गावांनी शासनाच्या  हागणदारीमुक्तीच्या धोरणानुसार 90 टक्के कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालयांची सुविधा हा निकषही पूर्ण केला असून, हागणदारीमुक्तीची घोषणा होणे बाकी आहे. 
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हयात नागरी स्वच्छता अभियानही गतीमान करुन जिल्हयातील नगरपरिषदाबरोबरच कोल्हापूर महानगरपालिकाही हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी भरीव कामगिरी करुन प्रभावी लोकसहभाग घेतला. यासाठी नगरपरिषदामध्ये स्वच्छतेची सप्तपदी हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवून शहरवासियांना स्वच्छतेची सवय लावण्यात यंत्रणा खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्या असे म्हटल्यास वावगे ठरु नये. नागरी स्वच्छता अभियानाव्दारे जिल्हयात फार मोठे काम झाले असून शहरे स्वच्छ, सुंदर आणि समृध्द होत आहेत. नागरिकांच्या प्रभावी लोकसहभागामुळे कागल नगरपरिषदेने हागणदारीमुक्तीमध्ये देशात लौकिक प्राप्त केला आहे. कागल नगरपरिषदेबरोबरच पन्हाळा, मुरगुड, मलकापूर, जयसिंगपूर, कुरुंदवाड, गडहिंग्लज,वडगांव या नगरपरिषदांनी हागणदारीमुक्त होण्याचा बहुमान पटकाविला आहे. याशिवाय कोल्हापूर महानगरपालिकेनेही हागणदारीमुक्तीत मोलाची कामगिरी बजावून हागणदारीमुक्त महानगरपालिका होण्याचा मान मिळविला आहे. ही जिल्हयाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.
संपूर्ण कोल्हापूर जिल्हा स्वच्छ, सुंदर,, समृध्द आणि आरोग्यसंपन्न करण्याच्या प्रशासनाच्या संकल्पनेस शहर आणि जिल्हयातील प्रत्येक नागरिकांनी दिलेले योगदान आणि लोकसहभागामुळेच कोल्हापूर जिल्हा हागणदारीमुक्तीच्या वाटेवर पोहोचला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अ भियान हे कोणा एका व्यक्तीसाठी अथवा घटकासाठी नसून ते तुम्हा-आम्हा सर्वांसाठी आहे. आपलं शहर,, आपलं गांव आणि  परिसर स्वच्छ, सुंदर आणि नेटका ठेवून संपूर्ण जिल्हा आणि शहरांमध्ये यापुढील काळातही हागणदारीमुक्तीमध्ये सातत्य ठेवणे प्रत्येकाचेच आद्य कर्तव्य बनले आहे. चला तर मग स्वच्छ महाराष्ट्र  अभियानात सर्वानीच सामील होऊया.
 -एस.आर.माने
 -माहिती अधिकारी, कोल्हापूर

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.