कोल्हापूर,
दि.5 (जिमाका): जिल्ह्यातील स्त्री भ्रूण हत्या विरोधी मोहीम गतिमान करा. यासाठी
बोगस डॉक्टरांची तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवून बोगस डॉक्टरांवर कारवाई करा, अशा
सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.
जिल्हा दक्षता पथक
(पीसीपीएनडीटी) बैठक आज जिल्हाधिकारी
राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात
घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सरिता
थोरात व सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षला वेदक, ऍड. गौरी पाटील, अतिरिक्त
जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने तसेच समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री रेखावार म्हणाले, जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत
मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी 'गर्भधारणा पूर्व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (लिंग
निवडीस प्रतिबंध) कायद्याची
व वैद्यकीय गर्भपात कायद्याची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासाठी नियोजनबद्ध
रीतीने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात याव्यात. स्त्री रोग तपासणी रुग्णालये व
रेडिओलॉजी केंद्रांची नियमितपणे तपासणी करुन कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे आढळून
आल्यास योग्य ती कार्यवाही करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सरिता थोरात व सीपीआरच्या
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षला वेदक, ऍड. गौरी पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य
आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने यांनी आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत
माहिती दिली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.