टंचाई परिस्थती असल्यामुळे पिक कर्जाची माहिती
-- सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे
कोल्हापूर, दि. 19 : टंचाई परिस्थती असल्यामुळे पिक कर्जाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्राधान्याने पोहोचविण्यासाठी पुरेसे प्रयत्न करावेत. पुढच्या 5 वर्षासाठी शेतक-यांना शेतीच्या प्रयोजनासाठी कर्ज देण्याबाबत प्राधान्याने विचार करावा. असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
सहकार विभागातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्यासमवेत राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर, विभागीय सह निबंधक राजेंद्र दराडे, कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, सांगलीचे प्रकाश आष्टेकर, साताऱ्याचे महेश कदम यांच्यासह कोल्हापूर, सांगली व सातारा येथील सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
श्री. दादाजी भुसे यांनी कोल्हापूर विभागाचा बैठकीत प्रत्येक मुद्यानिहाय सविस्तर आढावा घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, शेतकऱ्यांना शेतीसाठीच्या पहिल्या वर्षी कर्जाचे व्याज शासन भरेल, त्यानंतर पुढील वर्षांचे कर्जाचे व्याज शेतकऱ्यांकडून निम्मे व शासनामार्फत निम्मे भरले जाईल. न्यायालयाने दिलेल्या सूचना तसेच अस्तित्वातील शासन निर्णयाप्रमाणे ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवींची रक्कम परत करण्यासाठी योग्य नियोजन करावे. शेतक-यांना शेतीच्या प्रयोजनार्थ विविध संस्थांकडून कर्ज दिले जाते. या कर्जाच्या रकमेइतकी व्याजाची परतफेड झाली असल्यास त्या शेतकऱ्यास कर्जमुक्त केले पाहिजे.
सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे म्हणाले, शेतकऱ्यांनाशेतीच्या प्रयोजनासाठी देण्यात आलेल्या कर्जाच्या मुद्दलाइतक्या रक्कमेची परतफेड झालेली असल्यास सहकार कायद्यातील कलम 44 प्रमाणे त्या शेतकऱ्यास कर्जमुक्त केले पाहिजे. शासनाने दिलेल्या रकमेच्या परताव्याची स्थिती, न्यायप्रविष्ठ प्रकरणांची स्थिती, अन्य प्रकरणे यांचा सविस्तर आढावा घेवून टंचाई परिस्थितीचा विचार करुन अडचणीतील पतसंस्थांची वसुली, बंद संस्थांवर पुढील कारवाई, मजूर संस्थांना निकषाप्रमाणे काम, मजूरांचे पासबुक ठेवून त्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करणे, त्यांचा विमा, विविध विकास सोसायट्यांच्या माध्यमातून नवीन उपक्रम हाती घेणे याबाबत तसेच अडीअडचणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रारंभी कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक महेश काकडे यांनी स्वागत केले. विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी आभार मानले. यावेळी कोल्हापूर सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.