शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५





खासदार धनंजय महाडिक यांच्या
हस्ते पासपोर्ट सेवा कॅम्पचे उद्घाटन

      कोल्हापूर, दि. 21 : देशातील प्रत्येक नागरिकाला पासपोर्ट सेवेचा लाभ मिळावा यासाठी विविध ठिकाणी पासपोर्ट सेवा कॅम्पचे आयोजन करण्यात येते. क्षेत्रिय पासपोर्ट कार्यालय, पुणे  यांच्यातर्फे कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा कॅम्पचे उद्घाटन खा.धनंजय महाडिक यांच्याहस्ते करण्यात आले.
      जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित कार्यक्रमात यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा, क्षेत्रिय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      कोल्हापूर जिल्हा सधन असल्याने जिल्ह्यातून विविध करणांसाठी परदेशात जाणाऱ्यांची संख्याअधिक आहे. पर्यटन, विविध क्रीडा स्पर्धा, नोकरी, व्यवसाय आदी अनेक कारणांनी जिल्ह्यातून नागरिक परदेशी जात असतात. त्यामुळे कोल्हापूरला पासपोर्ट कार्यालयाची अत्यंत आवश्यकता असून ते लवकरात लवकर मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगून खा.महाडिक यांनी कोल्हापूर येथे होत असलेल्या पासपोर्ट सेवा कॅम्पचा नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, खेळाडूंनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. याठिकाणी वरचेवर सेवा कॅम्प तसेच कलेक्शन कॅम्प आयोजित केले जावेत असे सांगितले.
      पासपोर्ट मिळण्यासाठी पोलीसांकडील अहवाल आवश्यक आहे. पण त्यासाठी कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करुन संपूर्ण संगणकीरण झाल्याने जिल्ह्यातील सर्व क्राईम रेकॉर्ड एकत्रितपणे उपलब्ध आहे त्यामुळे तपासणीसाठी लागणारा कालावधी कमी झाला आहे. तथापी आंतरराष्ट्रीय पातळीवरील होत असलेल्या आंतकवादी कारवाया लक्षात घेता पोलीस व्हेरिफिकेशन सुक्ष्मपणे होणे आवश्यक असल्याने त्यासाठीचा आवश्यक वेळ मिळणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
      क्षेत्रिय पासपोर्ट अधिकारी गोतसुर्वे म्हणाले, पासपोर्ट हा जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. आर्थिक सशक्तीकरणाचे प्रबल माध्यम बनत आहे. शैक्षणिक, धार्मिक, पर्यटन, व्यवसाय, नोकरीच्या संधी आदी कारणांसाठी पासपोर्ट आवश्यक बनला आहे. अनेक आय.टी. कंपन्यांनी पासपोर्ट असणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे पासपोर्ट कार्यालयाने नागरिकांच्या दारात जाऊन त्यांना ही सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सन 2014 मध्ये 2 लाख 14 हजार तर नोव्हेंबर 2015 पर्यंत 2 लाख 70 हजार पासपोर्टचे वितरण करण्यात आले आहे. दरवर्षी यामध्ये 25 ते 30 टक्क्यांनी वाढ होत आहे. पासपोर्ट मिळण्याचा कालावधी अत्यंत कमी करण्यात आल्याने केवळ 1 हजार 500 रुपयात परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज केल्यास अर्जदाराच्या पत्यावर एक महिन्यात पासपोर्ट मिळू शकतो. त्यासाठी कोणालाही पैसे देण्याची अथवा लाच देण्याची आवश्यकता नाही. तथापी अर्जदाराने खोटी माहिती देऊ नये. माहिती खोटी दिल्याचे सिध्द झाल्यास तो गुन्हा ठरवून आर्थिक दंड शिक्षेची तरतुद आहे. त्यामुळे खऱ्या माहितीसह अर्जदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. टोल फ्रि क्रमांक 1800 258 1800 यावर संपर्क साधुन अधिक माहिती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
      जतिन पोटे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन आभार मानले. यावेळी पासपोर्टसाठी अर्ज दाखल केलेले अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 00 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.