इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ४ नोव्हेंबर, २०१५

जलयुक्त शिवार अभियानासाठी




यंदा 54 कोटीचा आराखडा
-जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी
जिल्हयात महाराजस्व अभियान गतीमान करणार.. जिल्हाधिकारी
कोल्हापूर, दि. 4 : जलयुक्त शिवार अभियान जिल्हयात अधिक गतीमान करुन भुर्गभातील कमी होत असलेली पाण्याची पातळी वाढविण्यास प्राधान्य दिले आहे. यंदा या अभियानांतर्गत जिल्हयातील 69 गावांची निवड करुन त्यांसाठी 54 कोटीचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली.
महाराजस्व अभियानांतर्गत शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण येथे परिसरातील 25 गावांसाठी आयोजित केलेल्या विस्तारीत समाधान योजना शिबिराचा शुभांरभ जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी  यांच्या हस्ते आणि आमदार सत्यजित पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होेते. या कार्यक्रमास शाहुवाडी पंचायत समितीचे सभापती पंडीतराव नलवडे, उपसभापती पाडूरंग पाटील, प्रांताधिकारी रवींद्र खाडे, शाहुवाडीचे तहसिलदार ऋषीकेश शेळके, पन्हाळ्याचे तहसिलदार आर.एस.चोबे आदीजण उपस्थित होेते.
     राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियानाचा क्रांतीकारी उपक्रम हाती घेतला असल्याचे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी डॉ. अमित  सैनी म्हणाले, जिल्ह्यातील काही तालुक्यात पाण्याची पातळी खालावत असून ही पाण्याची पातळी वाढविणे काळाची गरज आहे. यासाठी जलयुक्त शिवार अभियान जिल्हयात शासन योजना आणि लोक सहभागातून गतिमान करुन आगामी काळात जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रशासनाचा संकल्पआहे. जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी यंदा 54 कोटीचा आराखडा तयार केला असून 25 कोटी विविध विभागाकडील योजनाद्वारे तर 20 कोटी जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करुन देण्यात असल्याचेही ते म्हणाले. पन्हाळा शाहूवाडीच्या डोंगरी भागात पाण्याची पातळी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.
    सेवा हमी कायद्यानुसार 21 दिवसात जातीचा दाखला देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, विहित मुदतीत दाखला दिला गेला नसल्यास संबधितावर कारवाई केली जाईल. जिल्हयात सेवा हमी कायद्याची प्रभावी परिणामकारक अमंलबजवानी केली जाईल. या कायद्याअतर्गत येणाऱ्या सेवा निश्चित केलेल्या मुदतीत सर्व संबंधितांना देण्याची दक्षता घ्यावी, असे  निर्देशही त्यांनी दिलेे.
     जिल्ह्यात महाराजस्व अभियान अधिक गतीने राबविले जाईल, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले,  सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या तसेच त्यांना लागणारे विविध विभागाकडील दाखले आणि प्रमाणपत्रे महाराजस्व अभियानाच्या शिबिरातून गावागावातच उपलब्ध करुन देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या अभियानात महसूल बरोबरच सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित ठेवून जनतेचे प्रश्न, त्यांचा लागणारे दाखले यांचा निपटारा केला जात आहे. यापुढे महाराजस्व अभियानाच्या शिबिरामध्ये सेवा हमी कायदा, पंतप्रधान जीवन सुरक्षा योजना तसेच अन्य योजनांची माहिती असणारे फ्लेक्स ठळकपणे लावण्याची सूचनाही त्यांनी दिली.
     कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने तयार केलेली - डिस्नीक प्रणाली राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू केली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, जमीनी सदर्भातील महसूली दावे, कामकाज, तारखा, निकाल, नकला ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचं काम जिल्ह्यात ई-डिस्नीक प्रणालीव्दारे होत असून शेतकऱ्यांना विशेषत: पक्षकारांचे तारखांसाठी, नकलेसाठी आणि निकालासाठी होणारे हेलपाटे वाचले आहेत. याबरोबरच जिल्हयात सेवा हमी कायद्याचीही प्रभावी अंमलबजावणी करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचेही ते म्हणाले. 
     या प्रसंगी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील जमिनीतील कमी होत चाललेली पाणी पातळी ही चिंतेची बाब असून ही पाणी पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान जिल्हयात लोक सहभागातून अधिक गतीमान व्हावेे. महाराजस्व अभियनाच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना तळागाळातील माणसापर्यंत पोहचण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले. आजच्या शिबिरात जवळपास अडीच हजार दाखल्याचे वितरण होणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच जिल्ह्यातील जनतेला विशेषत: शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या ई-डिस्नीक प्रणालीचा त्यांनी मुक्त कंठाने गौरव केला. आगामी काळात जलयुक्त शिवार अभियानातून पाणी अडविणे आणि पाणी जिरविणे हे काम सर्वांनी समन्वयाने करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
     याप्रसंगी सभापती पंडीतराव नलवडे, प्रांताधिकारी रवींद्र खाडे, उपसभापती पाडूरंग पाटील, डॉ. नितीन पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी तहसिलदार ऋषीकेश शेळके यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, आजच्या महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारीत समाधान शिबिरामध्ये महसूल, आरोग्य, कृषी, वन, सामाजिक वनीकरण, एस.टी, विद्युत, पुरवठा विभाग, आधार कार्ड अशा विविध विभागांनी सहभाग घेतला आहे. शाहूवाडी तालुक्यात गेल्या दोन वर्षात 40 हजाराहून अधिक लाभ या योजनेद्वारे देण्यात आला असून आजच्या शिबिरात सुमारे अडीच हजार दाखल्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समारंभास नायब तहसिलदार बाजीराव पाटील, डॉ. नितीन पाटील, सरपंच दर्शना फाटक यांच्यासह तालुक्यातील मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    याप्रसंगी विविध विभागाकडील अर्थसहाय्य योजनांचे धनादेश तसेच लाभार्थींना पॉवरटिलरचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

0  00 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.