शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५



केंद्र व राज्य शासनाच्या योजना
लाभार्थीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा
                                      -- पालकमंत्री चंद्रकांत पाटील
लोक माहिती अभियान व महाराजस्व अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद

कोल्हापूर, दि. 6 : केंद्र व राज्य शासन जनतेसाठी राबवित असलेल्या अनेकविध विकास व कल्याणकारी योजना त्या- त्या लाभार्थीपर्यंत थेट आणि प्रभावीपणे पोहोचविण्यात शासकीय यंत्रणांनी सक्रिय व्हावे, या कामी नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनीही भरीव योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले.
केंद्र शासनाचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय व कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गडहिंग्लज येथे महाराणी राधाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या लोक माहिती अभियान आणि महाराजस्व अभियांनांतर्गत विस्तारित समाधान योजनेचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष राजेश बोरगावे, गडहिंग्लजच्या पंचायत समितीच्या सभापती अनुसया सुतार, रामराजे कुपेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
शासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले काम निटनेटके, वेळेत, पारदर्शी आणि लोकाभिमूख करुन सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेसाठी अनेकविध योजना जाहीर केल्या असून, त्या योजना जिल्ह्यातील घराघरापर्यंत आणि घराघरातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासकीय यंत्रणांनी प्राधान्यक्रमाने हाती घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
जिल्ह्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामाची संस्कृती बदलण्याची आवश्यकता असून, यासाठी यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली मानसिकता बदलावी, असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्र शासनाने सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेसाठी सुरु केलेल्या पंतप्रधान जीवन सुरक्षा, प्रधानमंत्री जीवन ज्योती वीमा योजना तसेच अटल पेन्शन योजना, मुद्रा बँक योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ अशा विविध क्रांतिकारी योजनामध्ये जनतेचा सहभाग वाढविणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. केंद्र शासनाने सर्वसामान्य माणसांसाठी विविध विमा योजनांद्वारे विमा सुरक्षा कवच निर्माण केले असल्याचेही ते म्हणाले.
शासनाने राज्यातील 65 टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमुक्त केले असून, कोल्हापूरचा टोलप्रश्नही लवकरच मार्गी लावला जाईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या सर्वागिण विकास आणि उन्नतीसाठी राज्य शासन कसोशिने प्रयत्न करीत असून, सामान्य जनतेला सहाय्यभूत होण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. कोल्हापूरच्या विमानतळाचा प्रश्नही राज्य शासन प्राधान्यक्रमाने हाताळत असून, येत्या वर्षभरात हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याबरोबरच राज्यातील रस्ते विकासावरही केंद्र आणि राज्य शासनाने अधिक लक्ष केंद्रीत केले असून, सातारा कागल हा राष्ट्रीय महामार्ग सहापदरी करण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी बोलतांना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, शासनाच्या विविध योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोक माहिती अभियान आणि महाराजस्व अभियान हे उपयुक्त उपक्रम असून, सर्वसामान्यांच्या विकासासाठीच्या शासन राबवित असलेल्या अनेकविध योजना त्या त्या लाभार्थीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी असे कार्यक्रम गावागावात भरविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.  केंद्र शासनाने सामान्य माणसांसाठी सुरु केलेल्या विविध विमा योजना, सांसद आदर्श ग्राम योजना, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, कौशल्य विकास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना अशा विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात सर्वांनीच सक्रिय व्हावे, असे आवाहनही खा. धनंजय महाडिक यांनी केले.
याप्रसंगी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, शासनाच्या विविध विकास योजना तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी लोक माहिती अभियानाबरोबरच महा राजस्व अभियानही गावागावात राबविले जात आहे. या अभियानातून लोकांना विविध योजनांची माहिती देण्याबरोबरच त्यांना लागणारे दाखले, प्रमाणपत्रे, आधार कार्ड अशा विविध बाबी जागेवरच उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना महसुली दाव्यासंदर्भातील माहिती  ई डिस्नीक प्रणालीद्वारे ऑनलाईन उपलबध करुन देण्याचा क्रांतिकारी उपक्रम हाती घेतल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पंतप्रधान विविध विमा योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्वांना उपलबध करुन देण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले या दोन योजनेद्वारे आतापर्यंत जिल्ह्यातील साडेसहा लाख लोकांनी सहभाग घेतला असून उर्वरित जनतेनेही या योजनांत सहभागी होवून, कुटुंबासह सर्वांनीच विमा सुरक्षा कचव निर्माण करुन घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले. याबरोबरच पंतप्रधान मुद्रा योजना, कौशल्य विकास योजना, जलयुक्त शिवार अभियानही जिल्ह्यात गतिमान केले जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक  मनोजकुमार शर्मा,  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी केंद्रीय पत्र सूचना कार्यालयाच्या संचालक अल्पना पंत शर्मा यांनी स्वागत केले आणि लोक माहिती अभियानाच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. गडहिंग्लजचे उप विभागीय अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात ते म्हणाले. आजच्या लोक माहिती अभियानात विविध विभागांकडील सुमारे 50 स्टॉल उभारण्यात आले असून या स्टॉलच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती जनतेला दिली जाणार आहे. या अभियानामध्ये 5 हजार 400 मतदार ओळखपत्रांचे वितरण, 1 हजार 500 शिधापत्रिका, 1 हजार 300 दाखले, 10 हजार माहितीपुस्तिका, 5 हजार घडीपत्रिकांचे वितरण करण्यात येणार असून, विविध विभागांकडील लाभार्थीना अनुदान व धनादेशांचे वितरणही मंत्रीमहोदयांच्या हस्ते करण्यात आले. या 3 दिवसीय अभियानात आधार कार्ड काढण्याची सुविधा तसेच मोफत आरोग्य शिबिराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
याप्रसंगी मंत्रीमहोदय व अन्य मान्यवरांनी सर्व विभागांच्या स्टॉल्सना भेटी देवून माहिती घेतली.
या समारंभास मान्यवर पदाधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.