इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत कामांना गती पोलीस उद्यान विकासाचे काम 1 मे पर्यंत पूर्ण व्हावे - पालकमंत्री चंद्रकांत पाटील



            कोल्हापूर, दि. 1 : कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांना विशेषत: पोलीस उद्यान विकसित करण्यास गती देऊन ही कामे येत्या 1 मे पर्यंत पूर्ण करण्यात केएसबीपीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केले.
            कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या वतीने पोलीस मुख्यालया समोरील चौकातील विकसित केलेल्या ट्रॅफिक आयलॅंड येथे रावबहादुर डॉ. पी.सी.पाटील-थोरात चौकाचे सुशोभिकरण करण्यात आले असून या प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी पोलीस मुख्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी माहिती दिली. या कार्यक्रमास श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार राजेश क्षिरसागर, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, पोलीस अधीक्षक महादेव तांबडे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव, आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्वीनी सावंत, डॉ. रघुजी थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
            कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पाअंतर्गत सुरु असलेल्या सुशोभिकरण कामांबद्दल समाधान व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूरात रस्ते व चौकांचे सुशोभिकरण करण्याच्या कामास प्राधान्य दिले असून या प्रकल्पाअंतर्गत हाती घेण्यात आलेले प्रकल्प आणि सुरु असलेले प्रकल्प अतिशय दर्जेदार, देखणे आणि गुणात्मक असून शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे आहेत. या प्रकल्पा अंतर्गत पोलीस उद्यानाचे कामही हाती घेण्यात आले असून हे काम येत्या 1 मेपर्यंत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली.  भविष्यात कोल्हापूर शहराच्या सुशोभिकरणासाठी नव-नवे उपक्रम हाती घेण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
            कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पा अंतर्गत पोलीस मुख्यालयासमोरील चौकाचे करण्यात आलेले सुशोभिकरणाचे काम डोळे दिपणारे असून यामध्ये उभारण्यात आलेले शिल्प म्हणजे प्रजा आणि पोलीस यांच्या नात्याचे प्रतीबींब असून कॉमन मॅन च्या सहाय्याने हे नाते रेखाटण्याचा व पोलीस दलाची प्रजेच्या सहाय्याबद्दल तीच्याप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रसंग उभा केला आहे. या चौकाच्या उद्घाटनाप्रसंगी हवेत फुगे सोडून या सोहळ्याचे स्वागत करण्यात आले तसेच पोलीस बँडवरील देश भक्तीपर गीते सादर करण्यात आली. पोलीस मुख्यालयात कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पाअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांची चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी या प्रकल्पाच्या कामांविषयी सुजेय पित्रे यांनी माहिती दिली. यावेळी शिल्पकार मंगेश कुंभार, सारीका भोसले, राहूल मोरे, सेवा मोरे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

            या प्रसंगी रावबहादुर डॉ. पी.सी.पाटील-थोरात आणि पद्मविभूषण आर.के.लक्ष्मण यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, पोलीस उप अधीक्षक भारतकुमार राणे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, पाटील-थोरात कुटुबीय, पोलीस कर्मचारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.