इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, १५ डिसेंबर, २०१६

कॅशलेस भारताच्या निर्मितीसाठी वापरा डिजिटल आर्थिक सुविधा




जगातील अनेक देशांमध्ये कॅशलेस अर्थ व्यवस्था स्वीकारण्यात आली असून भारत ही त्या दिशेने पावले टाकत आहे. भ्रष्टाचार, काळा  पैसा, अवैध संपत्ती यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद ठरविल्या आणि आता त्या पुढचे पाऊल म्हणून डिजिटल पेमेंट पध्दतीचा मोठ्या प्रमाणात अवलंब करुन अर्थ व्यवस्था कॅशलेस करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. भारतात ग्रामीण भागातील जनतेमध्ये असलेली डिजिटल आर्थिक साक्षरता जाणिवेची कमतरता हे एक देशापुढील महत्वाचे आव्हान आहे.  डिजिटल आर्थिक सेवांच्या बाबतीत नागरीकांमध्ये आणि त्यातही ग्रामीण आणि निम शहरी भागांमध्ये ही जाणीव निर्माण करणे आणि त्याचबरोबर डिजिटल सेवांदर्भातील पर्यायांबाबतीत सक्षम बनविणे/साहाय्य करणे ही एक तातडीची गरज बनलेली आहे.
देशभरातील 2 लाख 50 हजार पंचायतींमध्ये असलेल्या 2 लाख सीएससीच्या (कॉमन सर्व्हिस सेंटर्स) साहाय्याने 25 लाख व्यापारी आणि 1 करोड नागरीकांची नोंदणी डिजिटल आर्थिक साक्षरतेसाठी करुन घेणे आणि त्यांना ती देऊ करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. ग्रामीण नागरीकांसाठी उपलब्ध असलेल्या सरकारच्या धोरणांबाबत आणि डिजिटल आर्थिक पर्यायांबद्दल जाणीव करुन देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करुन आणि डिजिटल आर्थिक सेवांबाबतीत असलेल्या आयएमपी, युपीआय, बँक पीओएस यंत्रे इ.सारख्या निरनिराळ्या यंत्रणांचा वापर करण्यासाठी निरनिराळ्या संबंधितांना साहाय्य करुन ‍डिजिटल आर्थिक केंद्र व्हावीत यासाठी सीएससीना सक्षम बनविणे हा याचा उद्देश आहे. देशातील दुर्गम, ग्रामीण आणि निम शहरी भागातील लोकांना ई-गर्व्हनंस आणि व्यावसायिक सेवा उपलब्ध करुन देणारी केंद्रे म्हणजेच कॉमन सर्व्हिसेस सेंटर आपण यांना आपले सरकार केंद्र या नावाने ओळखतो. या सीएससी मार्फत बँक व्यवहारापासून वंचित समाज घटकांना डिजिटल मार्गाने आर्थिक सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ लागल्या आहेत.
 डिजिटल आर्थिक सेवा या प्रामुख्याने कार्डस्, युएसएसडी, एईपीएस, युपीआय, वॅलेट या मुख्य प्रकारात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
1) कार्डस-कार्डसचे तीन प्रकार प्रामुख्याने पडतात.
यामध्ये अ) प्रिपेड कार्डस-ग्राहकाच्या बँक खात्यातून ही कार्डस् प्रि-लोड केलेली असतात. यांचा वापर मर्यादित रकमांच्या व्यवहारासाठी केला जाऊ शकतो. मोबाईल रिचार्जसारखेच यांचेही रिचार्ज करता येऊ शकते. यांचा वापर सुरक्ष्‍िात असतो. ब)  डेबिट कार्डस्-ज्या बँकेमध्ये ग्राहकाचे खाते असते तेथून हे देऊ केले जाते आणि तेथील बँक खात्याशी ते जोडलेले असते. खातेधारकांना (करंट/सेव्हींग्ज/ओव्हरड्राफ्ट) डेबिट कार्डस् जारी केली जातात आणि ग्राहकाने त्याद्वारे केलेल्या कोणत्याही खर्चाचे त्याच्या खात्यात लगेचच डेबिट टाकले जाते. त्याच्या/तीच्या बँक खात्यामध्ये जेवढी रक्कम शिल्लक आहे त्या मर्यादेपर्यंतच खातेदार या कार्डचा वापर करुन रोख पैसे काढून घेऊ शकतो. या कार्डसचा वापर केवळ एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पैश्यांच्या देशांतर्गत हस्तांतरणासाठीही केला जाऊ शकतो. क) क्रेडीट कार्डस-बँन्क्स/आरबीआयने अधिकृत केलेल्या संस्थांकडून ही कार्डस जारी केली जातात. याचा वापर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही केला जाऊ शकतो.  डेबिट कार्डच्या विरुध्द, क्रेडीत कार्डद्वारे ग्राहक त्याच्या बँक खात्यात शिल्लक असलेल्या रकमेहून अधिक रक्कमही काढू शकतो. परंतु ही अतिरिक्त रक्कम किती प्रमाणात काढता येऊ शकेल याची एक विशिष्ट मर्यादाही प्रत्येक क्रेडीट कार्डसाठी निश्चित करुन दिलेली असते. काढलेली ही अतिरिक्त रक्कम कशाप्रकारे परत करता येईल याबद्दलही एक विशिष्ट मर्यादा या कार्डससाठी निश्चित केलेली असते. ही अतिरिक्त रक्कम बँकेला परत करण्यासाठी असलेल्या निर्धारित कालावधीनंतर कार्ड जारी करणाऱ्याच्या नियमानुसार असलेल्या व्याजासहीत बँकेला परत केली जाते.
कार्डस का वापरायला हवीत? कुठेही खरेदी करता येते,  दुकाने, एटीएम, वेलेट्स, मायक्रो एटीएम्स, ऑनलाईन शॉपिंग येथे पेमेंट्साठी वापरता येते. डेबिट आणि क्रेडिट अशा दोन्हीही कार्डसचा वापर करुन एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात. वस्तुंची पॉइन्ट ऑफ सेल (पीओएस) सेवा आणि ऑनलाईन खरेदी करता येऊ शकते. सर्व प्रकारच्या युटीलिटी बिल्सचे पेमेंट करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. यांचा वार करुन ग्राहक तिकीटे (विमान/रेल्वे/बस) हॉटेल्स बुक करु शकतो आणि रेस्टॉरंट्समध्येही त्यांचा वापर करता येऊ शकतो. कार्ड रिडर/पीओएस यंत्र असलेल्या कोणत्याही ठिकाणी कोणत्याही सेवेचे पेमेंट करण्यासाठी आपल्या कार्डचा वापर करता येतो.
कार्ड कसे प्राप्त करावे-कोणत्याही सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकेमध्ये डेबिट/रुपे/क्रेडीट कार्ड मिळवण्यासाठी अर्ज सादर करावा. डेबिट कार्ड बदलून त्याऐवजी रुपे कार्ड ही घेऊ शकता. ज्या नागरीकांची बँक खाती नाहीत अशांनी कार्ड मिळवण्यासाठी प्रथम बँक खाती उघडावी. सर्व जनधन खातेधारकांना रुपे कार्डस जारी केली जातात.
2)  युएसएसडी म्हणजे काय?
युएसएसडी म्हणजे अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हीस डेटा. देशातील प्रत्येक नागरीकापर्यंत बँकींग सेवा घेऊन जाण्याच्या उद्देश असलेली ही सेवा आहे. टेलिकॉम सेवा पुरवठादार, मोबाईल हॅन्डसेट्चा प्रकार आणि प्रदेश कोणताही असला तरीही ही सेवा एकाच क्रमांकाद्वारे ग्राहकाला बँकींग सेवा उपलब्ध होते. ही सेवा *99# या संक्षिप्त संकेतांकाच्या नॅशनल युनिफाईड् युएसएसडी प्लॅटफॉर्म (एसयुयुपी) द्वारे पुरवली जाते. याचा वापर रु. 5000 प्रती दिवस प्रती ग्राहक पेमेंटसाठी करता येऊ शकतो. यासाठी एखाद्या बँकेतील खाते, जीएसएम नेटवर्कमधील कोणताही मोबाईल फोन, ग्राहक खात्यासाठी बँकेमध्ये नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
युएसएसडी कसे वापराल? आपल्या बँक खात्याद्वारे आपला मोबाईल क्रमांक जोडण्यासाठी आपल्या बँक शाखेला भेट द्या. (हे एटीएम किंवा ऑनलाईन करता येऊ शकते). तुम्हाला मोबाईल मनी आयडेंटीफायर (एमएमआयडी) आणि मोबाईल पिन (एमपीआयएन) मिळेल. तुमचा एमपीआयएन लक्षात ठेवा.
 युएसएसडी सुविधा कशी वापरावी-आपल्या फोनवरुन आपली प्रिपेड शिल्लक तपासण्याएवढे हे सोपे आहे. साधारण मोबाईल फोनवरुनही व्यवहार करणे शक्य आहे.
 आपल्या बँक खात्याशी आपला मोबाईल क्रमांक जोडा. आपल्या फोनवरुन *99# डायर करा. संक्षिप्त नावाच्या ठिकाणी आपल्या बँकेची पहिली 3 अक्षरे किंवा आयएफएससीची पहिली 4 अक्षरे भरा. फंड-ट्रान्स्फर-एमएमआयडी हा पर्याय निवडा. पेईचा मोबाईल क्रमांक आणि एमएसआयडी पुरवा. रकमेचा आकडा आणि आपला एमपिन पुरवा, एक स्पेस सोडा आणि मग आपल्या खाते क्रमांकाची अखेरची 4 अक्षरे पुरवा. आपण आपल्या पैशांचे हस्तांतरण करु शकता.
गैर-आर्थिक सेवा- वापर करणारा त्याच्या मोबाईल क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यातील उपलब्ध शिल्लक तपासू शकतो. मिनि स्टेटमेंट प्राप्त करुन घेऊ शकतो. मोबाईल बँकींग नोंदणीच्या वेळी बँकेने खात्यासाठी जारी केलेला एमएमआयडी वापर करणारा जाणून घेऊ शकतो. एम-पिन (मोबाईल पिन) निर्माण करुन शकतो. हा पिन म्हणजे एखाद्या संकेतांकासारखाच असतो आणि आर्थिक व्यवहार अधिकृत करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
आर्थिक सेवा- मोबाईल क्रमांक आणि एमएमआयडी वापरुन निधीचे हस्तांतर-लाभार्थीचा एमएमआयडी आणि मोबाईल क्रमांक यांचा वापर करुन निधीचे हस्तांतरण करु शकतो. आयएफएससी आणि खाता क्रमांक वापरुन निधीचे हस्तांतर-लाभार्थीचा आयएफएस संकेतांक आणि खाता क्रमांक पुरवून वापर करणारा निधीचे हस्तांतरण करुन शकतो.
3) एईपीएस (आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम)
एईपीएस म्हणजे आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम. ही एक अशी पेमेंट सेवा आहे ज्याद्वारे आधारचा वापर त्याची/तीची ओळख सिध्द करुन त्याच्याशी/तीच्याशी संबंधित आधार एनेबल्ड बँक खात्यामध्ये प्राथमिक बँक व्यवहार करुन बँक ग्राहकाचे सबलीकरण केले जाते. बँकींग कॉरसपॉन्डंट (बीसी)/व्हीएलईच्या साहाय्याने पीओएसमधील (मायक्रो एटीएम) बँक टू बँक व्यवहार याद्वारे करता येतात. वापर करणाऱ्याने आधार क्रमांकासह त्याचे/तीचे खाते बँकेत किंवा बीसी/व्हीएलईच्या साहाय्याने उघडालय हवे. कोणत्याही एईपीएस केंद्रामध्ये कोणत्याही पिन किंवा संकेतांकाशिवाय वापर करणारा कितीही व्यवहार करुन शकतो.
एईपीएस व्यवहार करण्यासाठी केवळ आयआयएन (ज्या बँकेशी  ग्राहक निगडीत आहे त्या बँकेची ओळख), आधार क्रमांक, नोंदणी करताना घेतले गेलेले बोटांचे ठसे यांची पूर्तत करणे आवश्यक आहे.
एईपीएसद्वारे शिल्लक चौकशी, रोख पैसे काढणे, रोख भरणा, आधार ते आधार निधी हस्तांतरण व एईपीएसद्वारे स्वस्त धान्य दुकानांमध्ये खरेदी व्यवहार करुन शकता.
का वापरायला हवे?
वापर करण्यास सोपे आणि आधार क्रमांक ते बोटांचे ठसे पुरवून लाभ घेता येईल असे सुरक्षित पेमेंट व्यासपीठ. प्रत्येक व्यक्तीच्या डेमोग्राफीक आणि बायोमेट्रीक/डोळ्यातील बुबुळांच्या माहितीवर आधारीत असल्याने कोणतीही अवैध आणि असत्य कृती टाळता येते. एनआरईजीए, सामाजिक सुरक्षा निवृत्तीवेतन, अपंग वृध्दांचे वेतन इत्यादी सारख्या कोणत्याही केंद्रीय किंवा राज्य सरकारी अनुदानांच्या लाभासाठी, बँका-बँकांमधील अंतर्गत व्यवहार, आधार कार्ड अधिकृतीकरणाद्वारे सोयीस्कर. सध्या या सेवेवर कोणतेही व्यवहार शुल्क लागू नाही. बँक खाते क्रमांक लक्षात ठेवायची आवश्यकता नाही.             
4) युपीआय (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस)
युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. ही एक अशी प्रणाली आहे ज्याद्वारे स्मार्ट फोनमार्फत त्वरीत इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स पाठवली जातात. जीचा वापर बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरीत करण्यासाठी केला जात होता त्या इमिडिएट पेमेंट सर्व्हीस (आयएमपीएस) ची ही एक सुधारीत आवृत्ती आहे. आयएमपीएस प्रमाणेच, युपीआयद्वारेही दिवसाच्या कोणत्याही वेळेला निधी हस्तांतरण सेवा उपलब्ध असेल.
डेबिट कार्ड ज्याप्रमाणे स्वतंत्र कार्डचा वापर न करता वापर करणाऱ्याची ओळख अधिकृत करते तसेच याबाबतीतही फोनचा वापर एखाद्या साधनासारखा करुन घेत असते. 365 दिवसही हे 24X7 कार्यान्वित असते.
यासाठी युपीआय ॲप्लिकेशन (ॲप) असलेला स्मार्ट फोन आणि बँक खाते आवश्यक आहे.
युपीआयचे फायदे
युपीआयमुळे वापर करणाऱ्याचे नाव, बँक खाते क्रमांक, आयएफएससी संकेतांक किंवा बँक शाखा पुरवत बसणे टाळले जाते. डेबिट कार्डससारख्या भौतिक साधनांचा वापरही युपीआयमुळे टळतो. असुरक्षित रचनेमुळे ज्यामध्ये ऑनलाईन धोके वाढतात अशा नेट बँकींगसारख्या अनेक पायऱ्या असलेल्या प्रक्रीयाही करत बसण्याची आवश्यकता नाही. अत्यंत सोपे ॲप्लिकेशन आणि कोणीही वापरु शकतो. त्वरीत आणि सुरक्षित अधिकृतीकरण आणि कोठूनही करता येते. संपूर्णत: कॅशलेस डिजिटल सुरक्षिततेचे मार्ग मोकळे होतात. पैशांची मागणी करणारी विनंती (उदा.एखादा ईनव्हॉईस) पाठवण्यासाठी वापर करता येतो. युटीलिटी बिल्स आणि शाळेची फी भरण्यासारखी ऑनलाईन पेमेंट्स करण्यासाठीही ग्राहक युपीआयचा वापर कर शकतात.
5) ई-वॅलेट (इलेक्ट्रॉनिक वॅलेट)
ई-वॅलेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॅलेट. हे एक अशा प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कार्ड आहे ज्याचा वापर संगणक किंवा स्मार्टफोनद्वारे केलेल्या ऑनलाईन व्यवहारांसाठी करता येतो. ई-वॅलेटचा वापर क्रेडीट किंवा डेबिट कार्डसारखाच असतो. पेमेंट करण्यासाठी हे ई वॅलेट आपल्या बँक खात्याशी जोडणे आवश्यक असते. कागदविरहीत आर्थिक व्यवहार सुलभ करणे हा ई-वॅलेटचा प्रमुख उद्देश आहे.
सॉप्टवेअर आणि माहिती हे ई वॅलेटचे महत्वाचे दोन घटक असतात. यातील सॉप्टवेअर हा घटक व्यक्तीगत माहिती जपून ठेवतो आणि सुरक्षा आणि डेटाचे एनक्रिप्शन पुरवतो. तर माहिती हा घटक वापर करणाऱ्याने पुरविलेल्या तपशिलांचा एक डेटाबेस असतो, ज्यामध्ये त्याचे नाव, वस्तू पाठविण्याचा पत्ता, पेमेंटची पध्दत, पेमेंट करावयाची रक्कम, क्रेडीत किंवा डेबिट कार्ड तपशिल इ.चा समावेश असतो.
ई-वॅलेट कशाप्रकारे वापरावे?
ग्राहकांसाठी-आपल्या उपकरणावर ॲप डाऊनलोड करुन घ्या. योग्य ती माहिती पुरवून साईन अप करा. वापर करणाऱ्याला एक संकेतांक प्राप्त होईल. डेबिट/क्रेडीट कार्ड किंवा नेटबँकींगचा वापर करुन पैसे भरायला सुरुवात करा. ऑनलाईन शॉपिंग झाल्यानंतर आपले ई-वॅलेट आपोआपच वापर करणाऱ्याची माहिती पेमेंट फॉर्मवर भरेल. एकदा का ऑनलाईन पेमेंट करुन झाले की मग वापर करणाऱ्याला इतर कोणत्याही संकेतस्थळावर ऑर्डर फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही, कारण ही माहिती डेटाबेसमध्ये सुरक्षित ठेवली जाते आणि आपोआपच अद्ययावतही केली जाते.
ई-वॅलेटचा वापर सुरु करण्यासाठी बँक खाते, स्मार्ट फोन, 2 जी/3जी3/4जी कनेक्शन, मोफत वॅलेट ॲप आवश्यक आहे.
अवश्य करायलाच हवे असे काही
 प्रत्येक व्यवहाराची नियमित माहिती एसएमएसद्वारे मिळावी यासाठी आपल्या मोबाईल क्रमांकाची बँकेमध्ये नोंदणी करा. आपला पिन कोणालाही सांगू नका. फक्त विश्वासू व्यापाऱ्यांशीच व्यवहार करा. एटीएममध्ये असताना आपल्या खांद्यावरुन वाकून इतर कोणीही आपला बँक व्यवहार पहात नाही ना याची खात्री करा.               
            या सर्व डिजिटल पर्यायांचा वापर करुन आपण कॅशलेस इंडिया आणि रोकडहित महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये नक्कीच योगदान देऊ शकतो.
                                                                                                                                                वर्षा पाटोळे
                                                                                                                                                जिल्हा माहिती अधिकारी
                                                                                                                                                कोल्हापूर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.