इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत निल्लेवाडी रस्ता सुधारणा कामाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन




            कोल्हापूर, दि. 1 :  रस्त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी सहकार्य करा, सगळे मिळून महाराष्ट्राचा विकास करु, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
            राज्यात एकाचवेळी 730 कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुरु होत आहेत. या अंतर्गत घुणकी, नवीन चावरे, जुने पारगाव, निल्लेवाडी या गावांना जोडणाऱ्या राममा क्र. 4 ते निल्लेवाडी  8 कि.मी. रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हातकणंगले तालुक्यतील घुणकी येथे करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता एस.एन. शेळके, तहसिलदार वैशाली राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
            सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून राज्यात एकाचवेळी 730 कि.मी. लांबीचे नवीन रस्ते तर 30 हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे सुधारीकरण करण्यात येत असून यामध्ये 5 कोटी 72 लाख रुपयांच्या 8 कि.मी. लांबीच्या घुणकी ते निल्लेवाडी या रस्त्याचा समावेश असल्याचे सांगून रस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
            2019 पर्यंत रस्त्यांबाबत महाराष्ट्राची स्थिती बदलेल असे सांगून सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, रस्त्यांची कामे करत असताना नवीन भुसंपादन केले जाणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील जे रस्ते आहेत त्यांचा वापर केला जाईल. मात्र त्यावरील अतिक्रमणे काढली जातील. यासाठी नागरीकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा. याबरोबरच याकामांसाठी गुणवत्तेच्या आधारावर ई-टेंडरद्वारे कंत्राटदार निर्धारीत केले जातील. त्यात कोणीही ढवळाढवळ करु नये. कंत्राटदारांकडून कामे गुणवत्तापूर्ण होत आहेत किंवा नाहीत याचीही जनतेने पाहणी करावी. चांगल्या कामासाठी सहकार्य करा, राज्याला निधीची कमतरता नाही, आवश्यक सर्व बाबी पूर्ण केल्या जातील, सगळे मिळून विकास करु, जनतेने बदल सर्वार्थाने स्वीकारावा.
            आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी घुणकी ते निल्लेवाडी या 8 कि.मी. रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. निल्लेवाडी ते अमृतनगर पर्यंत सुमारे 4.5 कि.मी. रस्ताही करुन द्यावा अशी मागणी केली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी रस्त्याचे 60 ते 65  लाखापर्यंतचे काम त्वरीत करुन देण्याचे मान्य केले.
            यावेळी कार्यक्रमाला सरपंच राजवर्धन मोहिते, उपसरपंच मारुती पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.