इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

प्रधानमंत्री उज्वल योजनेतंर्गत जिल्ह्यातील 52 हजार 226 कुटुंबांना गॅस कनेक्शन - पालकमंत्री चंद्रकांत पाटील


राज्यातील 1 कोटी 37 लाख खातेदारांचा विमा हप्ता शासनामार्फत  : पालकमंत्री
कोल्हापूर, दि. 2 : प्रधानमंत्री उज्वला योजनेतंर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 52 हजार 226 दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना गॅस कनेक्शन मंजूर झाले असून या उपक्रमांतर्गत आज उत्तूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महिलांना प्रातिनिधीक स्वरुपात गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.
आजरा तालुक्यातील उत्तूर विद्यालय येथे प्रधानमंत्री उज्वला योजनेतंर्गत मंजूर गॅस कनेक्शनचे वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महिलांना वितरीत करण्यात आले. त्यांच्यासमवेत आंतरभारती शिक्षण संस्थेचे चेअरमन आनंदराव आजगावकर, हिंदुस्थान पेट्रोलियमचे वरिष्ठ क्षेत्रीय प्रबंधक डी.टी.पाटील, भारत पेट्रोलियमचे श्री. राव, प्रांताधिकारी किर्ती नलवडे, कार्यकारी अभियंता एन.एम.वेधपाठक, तहसिलदार आनंद देवूळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 महिलांचा सन्मान वाढविणारी प्रधानमंत्री उज्वला योजना असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या योजनेमुळे महिला सक्षक्तीकरण होणार असून पर्यावरण व आरोग्य रक्षणास प्राधान्य दिले आहे. धुरामुळे महिलांना होणारे आजार तसेच चुलीसाठी होणारी वृक्षतोड या योजनेमुळे थांबणार असून स्वच्छ आणि पुरेस इंधन उपलब्ध झाल्याने धुरापासून महिलांची मुक्तता होणार आहे. या योजनेतंर्गत येत्या तीन वर्षात देशातील 5 कोटी कुटुंबियांना गॅस कनेक्शन देण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.  या योजनेतील लाभार्थी महिलांना 1600 रुपयांचे अनुदान रुपाने सिलेंडर शेगडी उपलब्ध होणार असून त्यांनी गॅस सिलेंडरचा सातत्यपूर्ण वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यातील 1 कोटी 37 लाख खातेदारांचा विमा हप्ता शासनामार्फत  : पालकमंत्री
  राज्यातील शेतकऱ्यांना अपघात विम्याचे कवच उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून या योजनेंतर्गत राज्यातील 1 कोटी 37 लाख खातेदारांचा विमा हप्ता राज्य शासनामार्फत  भरण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ते म्हणाले, 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्यांना या विमा योजनेंतर्गत 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. योजना कालावधीत शेतकऱ्यांना केंव्हाही अपघात किंवा अपंगत्व आले तरीही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेने विमा कंपन्याकडे स्वतंत्ररित्या विमा हप्ता भरण्याची गरज नसून सर्व खातेदार शेतकऱ्यांचा हप्ता राज्य शासनामार्फत भरण्यात आला असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

 सामान्य माणसाला सुखी-समृध्द आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून होत असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सामान्य माणसाच्या हिताचा विचार करुन केंद्र शासनाने अटल पेंशन योजना लागू केली असून या योजनेत दरमहा 220 रुपये 60 वर्षापर्यंत बँकेत भरल्यास 60 वर्षानंतर त्यांना दरमहा 5 हजार रुपये दराने पेंशन मिळणार आहे. या योजनेचाही जिल्ह्यातील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.