शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

प्रादेशिक आराखड्यातील नियम 'सह्याद्री व्याघ्र'च्या बफर झोनसाठी वापरावेत - विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम




कोल्हापूर, दि. 2 : सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राचे कोअर व बफर क्षेत्र घोषित करण्यात आले असून बफर झोन मधील बांधकामाबाबतचे नियम ठरवित असताना नवीन नियम करण्याऐवजी प्रादेशिक आराखड्यामध्ये बफर झोनसाठी असणारे नियम लागू करण्याबाबतचा ठराव विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.
 सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राच्या बफर झोन मधील बांधकामाबाबतच्या नियमांसाठी स्थानिक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची बैठक एस.चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी आमदार शंभूराजे देसाई, मुख्य वनसंरक्षक तथा सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राचे संचालक डॉ. व्ही.क्लेमेंट बेन, सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, मुख्य वनसंरक्षक एम.के.राव, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपवनसंरक्षक  प्रभुनाथ शुक्ला,  उपवनसंरक्षक वन्यजीव कराड  डॉ. विनीता व्यास यांची प्रमुख उपस्थिती होती.
सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राच्या कोअर व बफर क्षेत्रात सातारा जिल्ह्यातील 99, सांगली जिल्ह्यातील 20, कोल्हापूर जिल्ह्यातील 19 आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 5 अशा एकूण 143 गावांचा समावेश आहे. यातील 62 गावे कोअर क्षेत्रात तर उर्वरित 81 गावे बफर क्षेत्रात येतात. यातील बफर क्षेत्रातील बांधकामाबाबत नियमांसाठी स्थानिक सल्लागार समिती राज्य शासनास सल्ला देण्यासाठी नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने बफर क्षेत्रासाठी नवीन नियम करण्याऐवजी एकात्मिक प्रादेशिक आराखड्यासाठी असणारे नियम सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राच्या बफर झोनसाठी वापरावेत, असा ठराव आज केला.
 यावेळी बफर क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना कोणत्या बाबी करता येतात व कोणत्या करता येत नाहीत याबाबतची माहिती लोकांना कळेल अशा शब्दात द्यावी. या क्षेत्रातील खुंदलापूर, जि. सांगली, मळे, कोळणे, पाथरपुंज्य (जि. सातारा), या गावांचे पुनर्वसनाबाबतचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावेत अशी सूचना आमदार शंभूराजे देसाई यांनी केली.
 सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राचा बफर झोन दर्शविणारा नकाशा एमआरसॅक कडून तयार करुन घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.