इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २० डिसेंबर, २०१६

हरितगृहाचं गांव कासारवाडी




            कासारवाडीच्या लाल,पिवळया शिमला मिरचीची चव आज मुंबईच्या  मोठ-मोठया हॉटेलमधील पिझा आणि बरगरमधून खवयांच्या जिभेवर रेंगाळते आहे. शासनाच्या कोरडवाहू शेती अभियानातून कासारवाडीत हरितगृहांची उभारणी होत आहे. आज जवळपास दहा हरितगृहे असून कासारवाडी हरतिगृहांचे गांव म्हणून नजीकच्या काळात ओळखले जाईल. याच गावातील हिंदुराव लुगडे यांच्या हरितगृहातील लाल,पिवळया सिमला मिरचीने मुंबईच्या मार्केटमध्ये कोल्हापूरी दबदबा निर्माण केला आहे.


            कोल्हापूर जिल्हयास जरी बागायती जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी हातकणंगले तालुक्याचा काही भाग तसा कोरडवाहूच आहे. कासारवाडी त्यातीलच एक कोरडवाहू गांव. मुंबई- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर डोगर-दऱ्यात वसलेल्या या गावाला सुरुवातीपासूनच पाण्याची टंचाई भेडसावत आहे. अपुरा आणि अवेळी पडणाऱ्या पावसामुळे कोरडवाहू शेतीचा प्रयोग म्हणजे एक लपंडावच म्हणावा लागेल. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची अडचण असणाऱ्या या गावात कृषि विभगाच्या कोरडवाहू शेती अभियानातून शेतकऱ्यांच्या जीवनात नवी पहाट उजाळू लागली आहे.
            कृषि विभागाच्या कोरडवाहू शेती अभियानातून जिल्हयात अनेक गावांची निवड केली, त्यातीलच कासारवाडी हे एक गांव. कोरडवाहू शेती अभियानातील संरक्षित शेती योजनेतून हरितगृह उभारणीची योजना प्रभावीपणे राबविण्याचं काम कासारवाडीतील अनेक बहाद्दर शेतकऱ्यांनी करुन शेतीला आधुनिक कृषितंत्रज्ञानाची जोड देऊन गावाचा लौकीक निर्माण केला आहे. या कामी येथील शेतकऱ्यांनी सक्रीय पुढाकार घेऊन हरितगृह उभारणीची योजना खऱ्या अर्थाने यशस्वी करुन जिल्हयातील शेतकऱ्यासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. आज लांब-लांबून अनेक होतकरु शेतकऱ्यांची कासारवाडीतील हरितगृह शेती पाहण्यासाठी आणि अभ्यासासाठी रिघ लागली आहे. कासारवाडीच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब मानावी लागेल.
            जुनी दहावी शिक्षण घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठी खाजगी नोकरीमध्ये सारं आयुष्य घालविल्यानंतर गावी परतताच, शेतीची आस जोपासणाऱ्या कासारवाडीच्या हिंदुराव महादेव लुगडे यांनी  आधुनिक पध्दतीने शेती करण्याचा संकल्प केला.पदरी असणारी पुंजी आणि कृषि विभागाच्या कोरडवाहू शेती अभियानातून हरितगृह शेती करण्यास प्रारंभ केला. कोरडवाहू शेती अभियानातून त्यांनी कासारवडीच्या खडकाळ आणि डोंगराळ जमीनीत कष्ट आणि मेहनतीने हिरवी सृष्टीच निर्माण केली आहे. मनात क्षणभर येऊन जात की, कासारवाडीचा हा डोगराळ भाग नसून तो धरतीवरचा स्वर्गच आहे.
            हिंदुराव महादेव लुगडे यांनी आपल्या वडीलोपार्जित जमीनीमध्ये हरितगृह उभारणीचा निर्णय घेऊन आधुनिक शेतीची कास धरली. जुन्या विहिरीची खोली आणि डागडुजी करुन पाण्याची व्यवस्था निर्माण केली. आणि हे पाणी हरितगृहातील पिकांना शासनाच्या ठिबक सिंचन योजनेतून पाणी देण्याची सोय केली. याकामी त्यांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी आणि त्यांच्या टीमने खऱ्या अर्थाने मदत केली. तसं पाहिलं तर हिंदुराव महादेव लुगडे हे तसे शेतीमध्ये नवखेच, पण शेतीची आवड, कष्टाची अपार तयारी आणि कृषि विभागाचे मार्गदर्शन आणि सहाय्य या त्रिसुत्रीव्दारे त्यांनी फोंडया माळावरही नंदनवन उभे केले आहे.  कोरडवाहू शेती अभियानातून त्यांनी आपल्या 1008 चौरस मिटर क्षेत्राचे हरितगृह उभारणीस गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रारंभ केला. यासाठी कृषि विभागाच्यावतीने त्यांना 4 लाख 71 हजार 240 रुपयांचे अनुदान मिळाले. अल्पावधीत त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या मदतीने हरितगृहाची उभारणी करुन त्यामध्ये लाल व पिवळया सिमला मिरचीची लागवड केली. कष्ट आणि जिद्द या बळावर उभारलेल्या हरितगृह शेतीत  त्यांच्या कष्टाला यश येऊ लागले, आणि माळावर हिरव्यागार मिरचीची झाडे डौलाने डोलू लागली. बघता-बघता या रोपांनी बाळसं धरलं आणि शिमला मिरचीच्या घडांनी माणसाचं मन भाराऊन गेलं.
            एक एकरात पहिल्या वर्षी हरितगृहातून त्यांना लाल आणि पिवळी मिरचीचं साडेतेरा टन इतकं उत्पन्न मिळालं. या क्षेत्रातील तज्ञांच्या सल्यानुसार आणि बाजारपेठांचा अभ्यास करुन त्यांनी उत्पादित सर्व मिरची मुंबई मार्केटला पाठविली. या मिरचीला त्यांना 37 रुपये प्रतिकिलो दरही मिळाला. त्यामुळे बऱ्यापैकी पैसा मिळाल्याने शेतीतून एक आधार मिळाला, आणि पुन्हा नव्या जोमाने शेती करण्याची उमेद त्यांच्यात निर्माण झाली. हिंदुराव महादेव लुगडे यांच्या शेतात निर्माण झालेल्या लाल, पिवळया सिमला मिरचीची चवच काय न्यारी असून, त्यामुळेच हिंदुराव महादेव लुगडे यांच्या मिरचीला पुण्या- मुंबईच्या मोठ-मोठया हॉटेलमध्ये पिझा आणि बरगरसाठी मोठी मागणी लाभली. यंदाही हिंदुराव महादेव लुगडे यांनी आपल्या शेतातून जवळपास 15 ते 20 टन मिरचीचे उत्पादन केले आहे. यापुढेही हरितगृह शेतीमध्ये वाढ करुन उत्पादन वाढविण्याचा संकल्पही हिंदुराव महादेव लुगडे यांनी व्यक्त केला.
            आज कासारवाडीत जवळपास दहाहून अधिक हरितगृहे असून येथील शेतकरी आता कृषि विभागाच्या कोरडवाहू शेती अभियानातून हरितगृहांची उभारणी करण्यात सक्रीय झाला आहे. भविष्यात हरितगृहांच गांव म्हणूनही कासारवाडी नावारुपाला येईल, यात काही शंका नाही.
                                                                                                      - एस.आर.माने
                                                            - माहिती अधिकारी, कोल्हापूर.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.