शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शासन सकारात्मक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतीतील गुंतवणूक वाढवून शेतकरी सक्षम करणार




          कोल्हापूर, दि. 31 : शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याबाबत शासन सकारात्मक असून त्या दृष्टीने शेतकरी सक्षम करण्यासाठी 25 हजार कोटी रुपयांचा शेतीचा अर्थ संकल्प सादर केला आहे. शेतीमध्ये गुंतवणूक करुन विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी सक्षम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
                शिरोळ पंचायत समिती नूतन इमारत, शिरोळ मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा व शेतकरी मेळावा शिरोळ येथील पद्माराजे हायस्कुलच्या पटांगणावर झाला. यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, खासदार राजू शेट्टी, खासदार संजय पाटील, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके,आमदार उल्हास पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, रजनीताई मगदुम, कृषी सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे उपस्थित होते.
                मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याच्या दृष्टीने त्याला सक्षम करण्याच्या भुमिकेतून शेतीत गुंतवणूक केली त्यासाठी  शासनाने 25 हजार कोटी रुपयांचा शेतीचा अर्थ संकल्प सादर केला. त्यातून सुक्षम सिंचन, जलयुक्त शिवार, विहिरी, त्यावरील पंप, विविध सिंचन सुविधा, शेततळी आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. शेतकऱ्यांचे गट तयार करुन त्यांना सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ देऊन शेतीची उत्पादकता वाढविण्यावर भर दिला जात आहे. शेतकऱ्यांच्या गटांना ऊस तोडणी यंत्राची मागणी होत आहे. ही मागणीही शासन पूर्ण करेल.  शेतकऱ्यासाठी आवश्यक सर्व निर्णय शासन घेत आहे. शेतकऱ्याला सक्षम न करता कर्जमुक्ती केली तर केवळ बँकांचाच फायदा होईल. हे टाळून शासन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताचा व सक्षमीकरणाचा विचार करेल.
                मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांच्या जमिनीवरील आरक्षण ऊठवून जमिनी त्यांना परत करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेऊन शासनाने नवा इतिहास रचला आहे. असे सांगून बाजार समित्यांच्या आणि मध्यस्थांच्या जोखडातून शेतकऱ्याला सोडविणे आवश्यक होते. त्यासाठी शासनाने संत सावता माळी आठवडी बाजार सुरु केला त्यातून शेतकऱ्याच्या मालाला चांगला दर मिळाला. त्याच बरोबर सामान्य माणसालाही वाजवी दरात भाजीपाला उपलब्ध होऊ लागला. त्यातून शेतकरी आणि ग्राहक यांच्या मधली साखळी संपुष्टात आली.
                श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे सुरु असलेल्या कन्यागत महापर्वकाळासाठी भरीव निधी दिला असून उर्वरित निधीही उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी जानेवारीमध्ये येणाऱ्या कन्यागत महापर्वकाळाच्या पर्वणीला आपण निश्चितपणे उपस्थित राहू असे सांगितले.
                शिरोळ पंचायत समिती नूतन इमारत व शिरोळ मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतींचे बांधकाम अतिशय सुंदर झाले असून यातून जनतेला न्याय मिळावा, सामान्य माणसाची कामे व्हावीत, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात स्टेट बँक ऑफ इंडियाची पीओएस मशिन्सचे जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते वितरण करण्यात आले.
               

 0 00 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.