इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला उर्जित अवस्था मिळणार पालकमंत्री चंद्रकांत पाटील




        कोल्हापूर, दि. 1 : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला उर्जित अवस्था देण्यात येणार असून यातून सुशिक्षित बेरोजगारांना शासन मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करुन देईल. ठराविक रकमेपर्यंतच्या कर्जाचे व्याज शासन भरणार आहे.  याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु असल्याचे सांगून कौशल्य विकासामध्ये केवळ नोकऱ्या करणारे न होता नोकऱ्या निर्माण करणारे व्हा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
            औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोल्हापुला 75 वर्षे पूर्ण होत असून या संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. योवळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, पुणेचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे, प्राचार्य यतीन पारगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तंत्र प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मेक इन इंडिया अंतर्गत एलईडी बल्ब उत्पादन प्रशिक्षणाचे उद्घाटनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
            पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय हे विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करणारे शिक्षण देते. महाराष्ट्रातील सर्वात जुनी आयटीआय म्हणून कोल्हापूरच्या आयटीआयचा गौरव करण्यात येतो. कौशल्य विकासावर आधारीत अभ्यासक्रमांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. देशातील 5 कोटी लोकांना मेक इन इंडिया योजनेमध्ये रोजगार मिळणार आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना स्वंयरोजगाराच्या निर्मितीसाठी मुद्रा योजनेतून मोठ्या प्रमाणात कोणत्याही तारणाशिवाय कर्ज उपलब्ध करुन दिली जात आहेत. या साऱ्यांचा तरुणांनी लाभ घ्यावा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला उर्जित अवस्था देण्यात येणार असून तरुणांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात स्वंयरोजगारासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. ठराविक रक्कमेपर्यंतचे व्यास शासन स्वत: भरेल. यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे.
            राज्यात 5 लाख लोकांना सोलर पंप दिले जाणार आहेत. त्यातून निर्माण होणारी विद्युत निर्मिती फिडरशी जोडली जाणार आहे. यासाठी येत्या काळात तंत्रविकसित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे आगामी काळ लक्षात घेता. आयटीआयने अभ्यास क्रमाची निर्मिती करावी. आवश्यक तेवढा सर्व निधी दिला जाईल पण अत्यंत चांगले कौशल्य विकसित विद्यार्थी तयार करा, असे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
            छत्रपती शाहू महाराज म्हणाले, सध्याच्या युगात तांत्रिक शिक्षणाला फार महत्व आहे. विद्यार्थ्यांना कँप्समध्ये नोकरी मिळेल अशी स्थिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी निर्माण करावी. खऱ्या अर्थाने मेक इन इंडिया यशस्वी करायची असेल तर उत्पादीत होणाऱ्या मालाची गुणवत्ता सुधारली पाहिजे, त्याला यशस्वी मार्केटींगची जोड दिली पाहिजे. देशात महाराष्ट्र, महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा नंबर एक रहावा यासाठी आयटीआयने महत्वपूर्ण योगदान द्यावे.
            व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, पुणेचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे म्हणाले, देशातील जुनी व महत्वाची औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून कोल्हापूरच्या आयटीआयचा उल्लेख केला जातो. याठिकाणच्या विद्यार्थ्यांना 100 टक्के नोकरी मिळते, उद्योंगामध्येही अनेक जण यशस्वी होतात. या संस्थेमार्फत विधवा आणि परितक्ता यांना स्वत:च्या पायावर उभे राहता येईल यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना कॅशलेस व्यवहाराचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
            यावेळी राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सुहास पाटील, पल्लवी हिरवे, बेनझीर भालदार, संभाजी चौगुले, गिता गुदगे, मंगल शिंदे यांचा तर आयटीआय कोल्हापूरचे विद्यार्थी व आजचे यशस्वी उद्योजक असणाऱ्या चंद्रकांत जाधव, शिवाजीराव सुतार, महादेवराव पवार, रामचंद्र लोहार, शहाजी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या 75 वर्षाच्या कार्यकाळात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या शाम पिटके, बी.जे.चिंचकर, निवृत्ती दाखले, सरला महानुर, एम.पी.पाटील, पी.एस.दळवी, एम.पी. म्हाकवेकर यांचाही गौरव करण्यात आला.
            यावेळी शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 0 0 00 0 0  0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.