गुरुवार, १ डिसेंबर, २०१६




अर्थव्यवस्थेतील स्थित्यंतराच्या काळात 'सी.एं.'ची भुमिका महत्वपूर्ण
                                                            - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
        कोल्हापूर, दि. 1 : हजार आणि पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून काढून घेण्याचा पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला निर्णय हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिर्घकाळ परिणाम करणारा असून याचे अतिशय चांगले फलित समोर येणार आहे. या निर्णयामुळे जनतेच्या आर्थिक विश्वाबरोबरच त्यांचे भावविश्वही बदलणार आहे. या स्थित्यंतरच्या काळात लोकांची मानसिकता तयार करण्यामध्ये चार्टर्ड अकाऊटंटनी महत्वाची भुमिका बजावावी, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
            द इन्स्टिट्युशन ऑफ चार्टर्ड अकाऊटंट ऑफ इंडिया यांच्यावतीने डायरेक्ट टॅक्स या विषयावर हॉटेल सयाजी येथे दोन दिवसाच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन महसूलमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. यावेळी आयकर विभागाचे प्रधान सचिव पी. आर. मेघवाल, आयसीएआयचे निहार जंबोसरिया, सी. ए. सर्वश्री मंगेश किनरे, निलेश भालकर, श्रृती शहा, यांची प्रमुख उपस्थिती होती.
            भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांच्या निर्मुलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद ठरविल्या; याचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दुरगामी आणि चांगले परिणाम होणार आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल विकसनशिलतेकडून विकसनाकडे होत आहे. या स्थित्यंतराच्या काळाला सामोरे जाण्यासाठी सामाजाची मानसिकता तयार करण्यात चार्टर्ड अकाऊटंटची भुमिका  महत्वाची ठरणार असल्याचे  महसूलमंत्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
            यावेळी त्यांनी चार्टर्ड अकाऊटंट हा समाजातील एक अत्यंत हुशार वर्ग मानला जात असल्याचे सांगून प्रत्येक व्यवसायात प्रामाणिकता आवश्यक आहे. आपल्या क्षेत्रातील नव नवीन विचारांचे आदान प्रदान आणि एकूणच विचार मंथन यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा महत्वपूर्ण असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कोल्हापूरची विमानसेवा लवकरच सुरु होईल, त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील अशा प्रकारच्या कार्यशाळा याठिकाणी होणे सुलभ आणि सुखकर होईल, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
            या कार्यक्रमात रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनीही व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. पायाभुत सुविधांसाठी राज्याला करांची आवश्यकता आहे. त्याशिवायी राज्यांची कर्तव्यपार पाडणे अश्यक्य आहे. अशा अत्यंत महत्वाच्या विषयावर कार्यशाळा होत असल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. यावेळी त्यांनी कॅशलेस समाजाची निर्मिती ही काळाची गरज आहे. त्यासाठीही सीएंनी योगदान द्यावे. जनता आणि शासन या दोघोंमध्ये सीएंची भुमिका महत्वाची असल्याचे सांगितले.
            श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, देश या वर्षामध्ये तीन महत्वाच्या घडामोडींना सामोरे जात आहे. यात जीएसटी प्रणाली, भारतीय सैन्यांनी केलेला सर्जिकल स्ट्राईक आणि पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय यांचा समावेश आहे. ही अत्यंत महत्वपूर्ण पावले उचलल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. काळा पैसा रोखण्यासाठी नोटा बंदीचा निर्णय आवश्यक होता. या बदलाला सामोरे जाताना होणारा त्रास जनतेने अत्यंत संयमाने पेलला. यातून देश आर्थिकदृष्ट्या अधिक सबल होईल. जगात अनेक विकसित देशांमध्ये कॅशलेस अर्थव्यवस्था  स्वीकारण्यात आली आहे. आपल्या देशातही यादृष्टीने पावले पडत आहेत, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
            आयकर विभागाचे प्रधान सचिव पी. आर. मेघवाल म्हणाले, कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी शासन आग्रही आहे. जीएसटीमध्ये  करप्रणालीचे सुलभीकरण करण्यात आले आहे. करप्रणाली अंतर्गत येणाऱ्या दाव्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. करांबाबतची पुर्तता आणि दाव्यांचे प्रमाण कमी करण्यामध्ये सीएंनी महत्वाची भुमिका पार पाडावी, कायद्यामधील त्रुटी आणि कच्चे दुवे न शोधता करप्रणालीमागील शासनाचा हेतु लक्षात घेऊन काम करावे.  
            आयसीआयचे संचालक निहार जंबोसरिया म्हणाले, कर विषयक प्रकरण सापेक्ष कायद्यांचा अर्थ लावला जाऊ नये यासाठी करप्रणाली विषयक असणारे कायदे निसंदिग्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे करविषयक सल्लागारांमधील मतभेद टाळले जातील. केंद्र सरकारने अत्यंत योग्य वेळी नोटा बंदीचा निर्णय घेतला असून आमची संघटना संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी राहील. व्यवसायीक वर्ग आणि करदाते यांच्यात या निर्णयाचे महत्व पटवून देण्यासाठीही  संघटना प्रयत्न करीत आहे.


            मंगेश किनरे यांनी करप्रणालीमधील सीएंची भुमिका महत्वाची असल्याचे सांगून कोल्हापूरमध्ये या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरच्या कार्यशाळेचे आयोजन होत असून, या कार्यशाळेत 500 जणांचा सहभाग असणे ही बाब अभिनंदनीय असल्याचे सांगितले.
            डब्ल्युआयआरसी च्या अध्यक्षा श्रृती शहा म्हणाल्या, विकसनशील देश ते विकसित देश असा देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास सुरु असून भ्रष्टाचार, दहशतवाद, काळा पैसा, मुक्त देश घडविण्याकडे देशाची पावले पडत आहेत. या सर्व बदलात सीएंनी देशासाठी महत्वपूर्ण योगदान द्यावे. समाजाच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. कॅशलेस इकॉनॉमी आणि जीएसटी प्रणाली याबाबत सर्व स्थरांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करावेत.
            यावेळी प्रास्ताविक निलेश भालकर यांनी केले. तर आभार नवीन महाजन यांनी मानले. कार्यक्रमास या क्षेत्रातील तज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.