|
तृतीयपंथीयांचे कल्याण व
त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाचा सामाजिक न्याय विभाग
प्रयत्नशील आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांवर वाटचाल करणाऱ्या
कोल्हापूर जिल्ह्यात तृतीयपंथीयांना सन्मानाची वागणूक मिळवून देण्यासाठी
महत्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 2 तृतीयपंथीय व्यक्तींना सहायक
आयुक्त समाज कल्याण कार्यालयात येत्या 1 जुलैपासून कंत्राटी पध्दतीने नोकरीची
संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तृतीयपंथीय व्यक्तींना शासनाच्या विविध
योजनांची माहिती देवून त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी आतापर्यंत सहायक आयुक्त
समाज कल्याण कार्यालयामार्फत अनेक कार्यशाळा घेण्यात आल्या असून गुरुवार दि. 23
जून 2022 रोजी शिवाजी विद्यापीठाच्या सभागृहात एक दिवसीय 'जनजागृती कार्यशाळा'
होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेले उपक्रम निश्चितच पथदर्शी
आहेत. याविषयी थोडक्यात... तृतीयपंथीयांची राष्ट्रीय पोर्टलवर नोंद करुन
घेण्यासाठी राज्यात सर्वात प्रथम कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय कार्यशाळा
घेण्यात आली. यात एकाच दिवशी 67 तृतीयपंथीयांनी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर
या संकेतस्थळावर ऑनलाईन नावनोंदणी केली. तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध
योजनांचा लाभ मिळवून देवून त्यांच्या सक्षमीकरणासाठी पालकमंत्री सतेज पाटील
यांच्या संकल्पनेतून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यादृष्टीनं
नियोजनबध्द प्रयत्न सुरु केले आणि जिल्ह्यात तृतीयपंथीयांची नॅशनल पोर्टल फॉर
ट्रान्सजेंडरवर नोंदणी सुरु झाली. तृतीयपंथीय व्यक्तींना समाजाच्या मुख्य
प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यांना विविध
विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कोल्हापूरात झालेल्या 'राजर्षी छत्रपती
शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व' सांगता समारंभात पहिल्या टप्यात
प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या 6 तृतीयपंथीय प्रशिक्षणार्थ्यांना श्री शाहू छत्रपती
महाराज, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व सामाजिक न्याय
राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर
मुळे व लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आले, यावेळी
जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते. तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणावर भर-
पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने
'तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात देण्यात येत आहे. तृतीयपंथीयांच्या
जीवन पद्धतीला नवी दिशा देण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेणं आवश्यक होतं...
तृतीयपंथीयांचा पूर्वापार चालत आलेला जीवन जगण्याचा मार्ग बदलण्यासाठी आणि
त्यांच्या मनामध्ये आत्मसन्मान व स्वाभिमान निर्माण करण्यासाठी तृतीयपंथीय व्यक्ती,
गुरु व चेले यांचं सहकार्य घेणं आवश्यक होतं. यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी
राहुल रेखावार यांनी तृतीयपंथीयांचे गुरु, चेले यांच्यासोबत सविस्तर बैठक घेतली.
यात पोलीस विभाग,
समाजकल्याण विभागासह राज्यस्तरीय तृतीयपंथीय कल्याण मंडळाच्या सदस्य ॲड दिलशाद
मुजावर, मयुरी आळवेकर, जिल्हास्तरीय समिती सदस्य अमृता सुतार, प्रिया उर्फ
स्वप्नील सवाईराम तसेच तृतीयपंथीय व्यक्तींना सहभागी करुन घेतले. तृतीयपंथीयांच्या रोजगार निर्मितीसाठी नियोजनबध्द प्रयत्न-
जिल्हाधिकारी राहुल रेखावार
यांनी जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडवण्यासाठी बैठका
घेवून त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. 'आई अंबाबाई' व राजर्षी छत्रपती
शाहू महाराजांमुळे कोल्हापूर जिल्ह्याची जगभरात वेगळी ओळख आहे. या जिल्ह्यातील
तृतीयपंथीयांची नोंदणी करुन त्यांच्या कलागुणांनुसार प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध
करुन देऊन त्यांच्या जीवन जगण्याला नवी दिशा देवूया... त्यांचे सक्षमीकरण करुन
देशासमोर कोल्हापूर जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करुया..! अशी भावनिक साद घालून
तृतीयपंथीयांना सन्मानाची वागणुक मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य जिल्हा
प्रशासन करेल, असे आश्वासन कोल्हापूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी तृतीयपंथीय व्यक्ती,
गुरु, चेले यांना दिले. त्यांच्या या आवाहनाला प्रशासकीय यंत्रणेसह
तृतीयपंथीयांनी चांगला प्रतिसाद दिला. जिल्ह्यात तृतीयपंथीयांची अधिकाधिक नोंदणी
होवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न सुरु
करण्यात आले. कौशल्य विकास प्रशिक्षण- तृतीयपंथीयांची वैयक्तिक, शैक्षणिक, आर्थिक
माहिती घेवून त्यांना त्यांच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार त्यांना कौशल्य शिक्षण
देवून रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त विशाल
लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली 50 मुद्यांचा समावेश असणारा सर्वेक्षण अर्ज तयार
केले. हे अर्ज जिल्ह्यातील प्रत्येक तृतीयपंथी व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यात आले. यासाठी जिल्हास्तरीय समितीचे सदस्य, सामाजिक
कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, तालुकास्तरीय गुरु यांची मदत घेण्यात आली.
पोर्टलद्वारे नोंदणी वाढविण्यासाठी जिल्ह्यात 8 ते 10 ठिकाणी नोंदणी शिबिरे
घेवून 115 अर्ज भरुन घेण्यात आले. यानंतर या अर्जांची छाननी करुन प्रत्येकाच्या
छंद व आवडीनुसार त्यांना कोणते प्रशिक्षण देता येईल, याबाबत माहिती तयार करुन
त्यादृष्टिने प्रशिक्षण देण्यात येत आहे. इचलकरंजी नगरपालिका अग्रक्रमी- तृतीयपंथीय व्यक्तींसाठी जिल्ह्यातील प्रत्येक
रुग्णालयात स्वतंत्र वॉर्डची सोय करण्याच्या दृष्टिने जिल्हा प्रशासन प्रयत्नशील
आहे. तृतीयपंथीयांबाबत संवेदनशील विचार करुन जिल्ह्यात सर्वात आधी इचलकरंजी
नगरपालिकेने तृतीयपंथीयांना सोयी
सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद केली. येथील
इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल (आयजीएम) मध्ये तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वतंत्र
वॉर्डची निर्मिती व नगरपालिका क्षेत्रात तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वतंत्र
स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देवून अन्य नगरपालिकांना दिशा दिली आहे. तृतीयपंथी व्यक्तींना अन्य सुविधा
देण्याबरोबरच त्यांना कायदा व सुव्यवस्थेची माहिती मिळावी व याविषयी सहकार्य
होण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक
नोडल ऑफिसर नेमण्यात येत आहेत. तृतीयपंथीयांच्या कलागुणांनुसार त्यांना प्रशिक्षण देवून रोजगार
निर्मितीसाठी त्या-त्या भागात नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच
तृतीयपंथीयांसाठी वसतिगृह उभारण्यासाठीही जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.
पुरोगामी विचारांवर वाटचाल करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात तृतीयपंथीयांना
समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे योगदान वाखाणण्याजोगे
असून यातून निश्चितच चांगला बदल साधला जाईल... शब्दांकन -
वृषाली मिलिंद पाटील, माहिती
अधिकारी
जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर 00000 |
|||||
|
||||||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.