शनिवार, १० जून, २०२३

शासन आपल्या दारी उपक्रमासाठी येणाऱ्या 35 हजार लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी -पालकमंत्री दीपक केसरकर

 


शासन आपल्या दारी उपक्रमासाठी येणाऱ्या 35 हजार लाभार्थ्यांची

गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी

                                        -पालकमंत्री दीपक केसरकर

 

या उपक्रमासाठी अवांतर खर्च होणार नाही

याबाबत प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे

                                        -उद्योग मंत्री उदय सामंत

 

शासन आपल्या दारी हा उपक्रम

दिनांक 13 जून 2023 रोजी दुपारी 4 वाजता तपोवन मैदानावर होणार

 

कोल्हापूर, दि.10(जिमाका):- 13 जून रोजी होणाऱ्या 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाला जिल्ह्याच्या सर्व भागातून जवळपास 35 ते 40 हजार लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. तरी यातील एकाही लाभार्थ्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने नाष्टा, पाणी, जेवण, वाहतुक व आरोग्य पथक यासह  अनुषंगिक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृह येथे आयोजित शासन आपल्या दारी आढावा बैठकीत पालकमंत्री श्री केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्योग मंत्री उदय सामंत, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव डॉ. अमोल शिंदे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुकेरिकर, कोल्हापूर महापालिकेचे उपायुक्त रविकांत अडसूळ, तहसीलदार स्वप्निल पवार आदी उपस्थित होते.

उद्योग मंत्री श्री. सामंत मार्गदर्शन करताना म्हणाले की, शासन आपला दारी हा उपक्रम सर्व जिल्ह्यात एक सारखा झाला पाहिजे. तसेच या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत,असे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सूचित केलेले आहे. त्याप्रमाणे कार्यक्रमाचे नीटनेटके आयोजन करावे तसेच या कार्यक्रमासाठी कोठेही अवांतर तर खर्च होणार नाही याबाबत प्रशासनाने काटेकोरपणे नियोजन करावे असेही त्यांनी सुचित केले.

कोल्हापूर येथील या उपक्रमासाठी जवळपास 35 ते 40 हजार लोक येण्याचे नियोजित असल्याने व सर्व आलेल्या लोकांना उत्कृष्ट जेवण वेळेवर मिळणे आवश्यक असल्याने जेवणाचे विकेंद्रीकरण करावे व एकाच व्यक्ती, बचत गट अथवा संस्थेला काम न देता चार ते पाच संस्थांना/बचत गटांना काम द्यावे. तसेच कार्यक्रम दुपारी चार चा असल्याने कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येक लाभार्थी वेळेत त्यांच्या घरी पोहोचला पाहिजे याबाबत ही योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही श्री. सामंत यांनी सूचित केले.

यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम रत्नागिरीमध्ये कशा पद्धतीने आयोजित केला व कोणकोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबाबत दूरदृश्य प्रणाली द्वारे मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव डॉक्टर शिंदे यांनी कार्यक्रमाच्या दिवशी पाऊस आल्यानंतर ज्या उपायोजना करणे आवश्यक आहे, त्याबाबत प्रशासनाने तयारी ठेवावी असे सुचित केले. तसेच या उपक्रमाचे जिल्हा प्रशासनाने योग्य पद्धतीने नियोजन केलेले असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा मोठा असल्याने शासन आपल्या दारी उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर लाभार्थी येणार आहेत. हा कार्यक्रम 13 जून रोजी दुपारी चार वाजता नियोजित असल्याने लाभार्थी आपल्या गावातून वेळेत निघणे व कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचणे तसेच कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या घरी वेळेत व सुखरूप पोहोचणे याबाबत प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे, असे सूचना मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुकेरीकर यांनी केली.

प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शासन आपल्या दारी उपक्रमासाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली. तसेच हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले.  यावेळी या उपक्रमासाठी मान्यवरांनी दिलेल्या सूचनांची दखल घेऊन त्या अनुषंगाने आवश्यक ते बदल करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.