मंगळवार, ६ जून, २०२३

सूक्ष्म नियोजनाने 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम यशस्वी करा -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 






 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तपोवन मैदानावर 11 जूनला कार्यक्रम

कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या  लाभार्थ्यांना वाहतूक, भोजन, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा द्या

सर्व विभागांनी समन्वयाने आपापल्या जबाबदाऱ्या उत्कृष्टरित्या पार पाडाव्यात

 

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका): 'शासन आपल्या दारी' अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 11 जूनला तपोवन मैदानावर होणारा कार्यक्रम सूक्ष्म नियोजन करुन यशस्वी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.

  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहूजी सभागृहात शासन आपल्या दारी कार्यक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्यासह अन्य विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

       जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधून लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. त्या त्या तालुक्यातील लाभार्थ्यांना कार्यक्रमामध्ये लाभ देण्याचे नियोजन करावे. लाभार्थ्यांना बसेसद्वारे कार्यक्रम स्थळी आणणे, पुन्हा त्यांच्या गावी पोहोचवणे, त्यांना पाणी, ओआरएस पॅकेट, नाश्ता व भोजन वेळेत द्यावे. वाहनाच्या पार्किंगसाठी नियोजनबध्द व्यवस्था करावी जेणेकरुन लाभार्थी व नागरिकांना कोणतीही अडचण भासणार नाही. 

संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणची पाहणी करुन या ठिकाणी व्यासपीठ व्यवस्था, तसेच नागरिकांसाठी पाणीपुरवठा, फिरते स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. त्याचबरोबर शासकीय योजनांची माहिती कक्ष, वैद्यकीय कक्ष आदी कक्ष तयार करण्याबरोबरच त्या-त्या कक्षांचे माहितीफलक दर्शनी भागात लावावेत. या ठिकाणी रुग्णवाहिका तैनात ठेवाव्यात. शहराच्या मुख्य प्रवेश व्दारानजिकही त्या- त्या विषयांचे माहिती फलक लावावेत. सर्व तालुकास्तरीय कार्यालये, ग्रामपंचायत इमारती, नगरपालिका कार्यालये, जिल्हास्तरीय कार्यालये या ठिकाणीही बॅनर लावण्याची व्यवस्था करावी. शहरी, ग्रामीण भागातील घंटागाड्यांबरोबरच विविध माध्यमातून या कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. या कामांसाठी गरज भासल्यास अन्य विभागांच्या कर्मचाऱ्यांची सेवा उपलब्ध करुन घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

  लाभार्थ्यांना ने-आण करणाऱ्या प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार किट  ठेवा. आरोग्य विभाग व महसूल विभागाचा एकेक कर्मचारी या बसमध्ये तैनात ठेवा. सर्व विभागांनी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात. बैठक व्यवस्था- सभा ठिकाण, उपस्थित नागरिक, लाभार्थी, पत्रकार, मान्यवरांची बैठक व्यवस्था, चोख करा. विद्युत पुरवठा सुरळीत राहिल याची खात्री करा, अशा सूचना करुन सर्व विभागांनी मिळून समन्वयाने काम करुन हा कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडूया, असे आवाहन  जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.

          यावेळी सर्व विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागांच्या वतीने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती दिली.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.