मंगळवार, ३ जुलै, २०१२

धनादेश वाटप करण्यात प्रशासनाकडून योग्य कार्यवाही

  कोल्हापूर दि.२: हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी नगरपरिषद क्षेत्रात काविळीच्या साथीने मृत झालेल्या १२ व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून द्यावयाच्या  मदत निधी संदर्भात जिल्हा प्रशासनाने योग्य ती सर्व कार्यवाही केलेली आहे असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी कळविले आहे.
      याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, इचलकरंजी नगरपरिषद क्षेत्रात काविळीच्या साथीने मृत झालेल्या १२ व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून चौवीस लाख रुपये मंजूर झाले होते. मयतांच्या वारसांना धनादेश क्रमांक ०६१२७९ ते ०६१२९० ने प्रत्येकी दोन लाख रुपये याप्रमाणे जिल्हा प्रशासनामार्फत हातकणंल्याचे तहसिलदारांकडून मयतांच्या वारसांना २५ जून २०१२ रोजी दिले आहेत. हे धनादेश भारतीय स्टेट बँकेच्या दसरा चौक शाखेचे होते. यातील काही धनादेश बँकेने २९ जून २०१२ रोजी संबंधितांच्या खात्यावर जमा केले आहेत. श्री. संदेश बाजीराव आडमुठे यांच्या नांवे असलेला दोन लाख रुपयांचा धनादेश क्रमांक ०६१२८३ दिनांक २५ जून २०१२ रोजी दिला होता. पण भारतीय स्टेट बँकेच्या दसरा चौक शाखेने त्यांच्या खात्यावर वीस हजार रुपये जमा केले. याबाबत बँकेच्या व्यवस्थापकांना विचारणा केली असता त्यांनी आज श्री. आडमुठे यांच्या खात्यावर दोन लाख रुपये जमा केल्याचे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.