इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २१ जुलै, २०१२

अन्न व औषध प्रशासनातर्फे गुटखा बंदी अंमलबजावणी सुरु


  कोल्हापूर, दि. २१ : राज्यात गुटखा, पानमसाला पदार्थांच्या उत्पादन, वितरण, साठा व विक्रीवर १ वर्षाकरीता प्रतिबंध करणारी अधिसुचना अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी दि. २० जुलै २०१२ रोजी जारी केली आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात तात्काळ गुटखा, पानमसाला बंदी आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु केली असून त्यासाठी अन्न सुरक्षा अधिकार्‍यांची चार पथके करण्यांत आली आहेत.
        अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत तरतुदीनुसार बंदी आदेशाचे उल्लंघन करणार्‍याला ६ महिने ते १ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा व एक लाख ते तीन लाखापर्यंत दंडाची तरतुद करण्यात आली  आहे.    
      जिल्ह्यातील गुटखा पानमसाला पदार्था वितरक, घाऊक, किरकोळ विक्रेते, तसेच पानस्टॉलधारक, फेरीवाले यांनी त्यांच्याकडील गुटखा पानमसाल्याचा साठा तात्काळ नष्ट करावा. अन्यथा त्यांच्या विरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कडक कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, कोल्हापूर यांनी सूचित केले आहे.
      जिल्ह्यामध्ये गुटखा, पानमसाला पदार्थाचे वितरक घाऊक, किरकोळ विक्रेते यांच्या गोदामांच्या तसेच पान स्टॉलधारक फेरीवाले अशा सर्व स्तरावर तपासणीची मोहीम राबविण्यात येत असून तपासणीमध्ये प्रतिबंधीत पदार्थांचा साठा आढळून आल्यास त्यांचे नमुने घेऊन उर्वरीत साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहेत. 
      परराज्यातून जिल्ह्यामध्ये गुटखा, पानमसाल्याची चोरटी वाहतूक होणार नाही यासाठी वाहन तपासणी नाक्यावर, जकात नाक्यावर, वाहतूक करणारी वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात येत असून त्याकरीता पोलीस व परिवहन विभागाचे सहकार्य घेण्यात येत आहे.
     सर्व शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राहक संस्था यांना सदर बंदी आदेशा बाबत जनजागृती व प्रबोधन करुन बंदी आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी होणेबाबत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य कोल्हापूर यांनी केले आहे.
     जिल्ह्यामध्ये प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला या पदार्थाचा साठा अथवा विक्री बाबत काही माहिती असल्यास ती अन्न व औषध प्रशासनास कळवावी, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यातआले आहे.                                                                                         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.