इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, ७ जुलै, २०१२

कोल्हापूरची क्रीडा संस्कृती बळकट करणार -जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे

कोल्हापूर, दि. ६  - कोल्हापूरच्या मातीत घडलो. येथील लोकांच्या आशीर्वादामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकलो आता येथेच शासकीय सेवा करण्याची संधी मिळत आहे. या संधीचा फायदा घेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडवून कोल्हापूरची क्रीडा संस्कृती आधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यश मिळविणार्‍या खेळाडूंना राज्य शासनाच्या सेवेत थेट वर्ग एक पदावर नियुक्ती करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू नवनाथ फरताडे यांनी क्रीड़ा खात्यातच सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांची कोल्हापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांनी सांगितले की, राज्य शासनाने सुमारे १२ खेळाडूंची थेट वर्ग एकच्या पदावर नियुक्ती केली. त्यापैकी केवळ दोनच खेळाडूंनी क्रीडा विभागात सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यापैकी मी एक आहे. क्रीडा खात्याच्या सहकार्यामुळेच मी आंतरराष्ट्रीय खेळाडू बनू शकलो त्यामुळे मी क्रीडा खात्यात येण्याचा निर्णय घेतला.
श्री. फरताडे यांनी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहा सुवर्ण पदके पटकावली आहेत. श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या दहाव्या सॅफ स्पर्धेत नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले आहे. दहा मीटर एअर रायफल हा फरताडे यांचा नेमबाजीतील आवडता स्पर्धा प्रकार आहे. या प्रकारात  त्यांनी जर्मनी,  चेक प्रजासत्ताक, हंगेरी, अमेरिका अशा देशांत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
कोल्हापूरच्या मातीतच मी घडलो. येथील प्रबोधनीमध्ये सराव करूनच मी आंतरराष्ट्रीय नेमबाज घडलो, त्यामुळे मला कोल्हापूरविषयी विशेष प्रेम आहे. आता मला कोल्हापूरचा क्रीडा अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळत आहे, ही बाब माझ्यासाठी अतिशय महत्वाची आहे, असे श्री. फरताडे यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, राज्य शासन खेळासाठी खूप पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे. क्रीडा खात्याला चांगल्या आणि उच्च गुणवत्तेचे खेळाडू घडवायचे आहेत. त्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर निधीही खर्च करीत आहे. आता प्रत्येक तालुक्यात क्रीडा संकुल उभारण्याची योजना आहे. विशेष बाब म्हणून हुपरी आणि बाचणी येथेही क्रीडा संकुल उभारण्यात येत आहेत. त्याचबरोबर कोल्हापुरात विभागीय क्रीडा संकुलही उभारले जात आहे. यामुळे कोल्हापूरची क्रीडा संस्कृती आधिकच बळकट होण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.