इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शनिवार, २१ जुलै, २०१२

कोल्हापुरातील पेट्रोल पंपांची वैधमापनमार्फत तपासणी करणार ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत निर्णय


     कोल्हापूर दि. २१ : कोल्हापुरातील पेट्रोल पंपांची वैधमापन शास्त्र विभागामार्फत तपासणी करण्याचा निर्णय ग्राहक संरक्षण परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसेच शहरातील एकतरी पेट्रोल पंप २४ तास सुरु ठेवण्यात येण्याबाबत कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक    झाली. त्यावेळी वरील निर्णय घेण्यात आले.
            बैठकीस अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे जिल्हाध्यक्ष संजय हुक्केरी, मधुमती पावनगडकर, वैधमापन शास्त्र विभागाचे रवींद्ग आदाटे, जिल्हा उपनिबंधक सी. एम. इंगवले, व्ही. आर. मनगुत्ते आदी अधिकारी उपस्थित होते.
            बैठकीत ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी शहरातील पेट्रोल पंपावर योग्य परिमाणानुसार पेट्रोल मिळत नसल्याची तक्रार केली. त्यावर परिमाणानुसार पेट्रोल मिळते की नाही, याची तपासणी करण्यासाठी वैधमापन शास्त्र विभागामार्फत पेट्रोल पंपाची अचानक तपासणी करावी अशा सुचना जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या.
            कोल्हापूर शहरातील रस्त्यांवरील खड्डे, उघड्या गटारीवरील झाकणे घालण्याबाबत तसेच महानगरपालिकेची १९१३ ही हेल्पलाईन कार्यान्वित नसल्याबाबत महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधण्याचे बैठकीत ठरले. उघड्यावरील खाद्य पदार्थांची अन्न व औषध प्रशासनातर्फे तपासणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
            विद्यार्थी वाहतूक व्यवस्थेबद्दल रिक्षा मालक-चालक संघटना, प्रादेशिक परिवहन अधिकारी व पालक संघटना यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. मध्यवर्ती बस स्थानक ते महालक्ष्मी मंदिर, मुख्य प्रशासकीय इमारत, कसबा बावडा, शिवाजी विद्यापीठ आणि के. आय. टी. या चार मार्गावर शेअर रिक्षा उपक्रम राबविता येईल का याची चर्चा करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस विभाग आणि रिक्षा चालक-मालक संघटना यांची लवकरच संयुक्त बैठक घेतली जाईल असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.