कोल्हापूर दि. १ : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या केएमटी सुवर्ण महोत्सवानिमित्त दोन कोटी रुपयांची मदत राज्य शासनातर्फे देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आज नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी येथे सांगितले.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. येथील भवानी मंडप परिसरात हा कार्यक्रम झाला. यावेळी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, महापौर कादंबरी कवाळे, उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी खासदार प्रतापराव भोसले, परिवहन सभापती प्रकाश कुंभार, ज्येष्ठ नेते महिपतराव बोंद्गे, विविध समित्यांचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.
श्री. जाधव म्हणाले, केएमटीने गेल्या पन्नास वर्षात कोल्हापूर शहरवासिय आणि आसपासच्या नागरिकांची सेवा केली आहे. हा उपक्रम निश्चितच आपली शताब्दी साजरी करेल. या उपक्रमाने अधिक चांगल्या दर्जाच्या सेवा उपलब्ध करुन द्याव्यात.
केएमटीमधील ५६ चालक आणि ४४ वाहकांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव तयार करावा. त्यांना सेवेत कायम करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करेल असेही श्री. जाधव यांनी यावेळी सांगितले.
गृह राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, केएमटी कोल्हापूर शहराची रक्तवाहिनी आहे. शहरालगतच्या अनेक गावांतून केएमटी सेवेची मागणी होते. यावरुनच केएमटी सेवा नागरिकांची गरज असल्याचे स्पष्ट होते. कोल्हापूरचा विकास गतीने व्हावा आणि यासाठी राज्य शासन अनेक प्रकारे प्रयत्न करीत आहे. गावठाणांच्या प्रश्नाबाबतही लवकरच तोडगा काढण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे.
यावेळी माजी खासदार प्रतापराव भोसले, परिवहन सभापती प्रकाश कुंभार, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना यांचीही भाषणे झाली.
सुवर्ण महोत्सवानिमित्त गुणवंत वाहक-चालक तसेच घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांत बक्षीस पटकावणार्या शालेय विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी उपायुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, तसेच महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. परिवहन व्यवस्थापक संतोष जिरगे यांनी प्रास्ताविक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.