इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ११ एप्रिल, २०१२

अनैतिक मानवी वाहतुकीला आळा घालण्यास व्यापक समाज प्रबोधनाची आवश्यकता जिल्हा पोलीस अधिक्षकांचे प्रतिपादन

कोल्हापूर दि. ११ : अनैतिक मानवी वाहतुकीला आळा घालण्यासाठी अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) अधिनियमाची व्यापक पातळीवर प्रसिध्दी होण्याची आणि समाज प्रबोधनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी आज येथे केले.
अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ अंतर्गत जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालयाच्यावतीने आज एक दिवसाची कार्यशाळा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. जाधव म्हणाले, अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम १९५६ नुसार मानवी वाहतूक करणार्‍यांना कडक शिक्षेची तरतूद आहे. पण हा प्रश्न केवळ कायद्याने आणि त्याच्या अंमलबजावणीने सुटणारा नाही. त्यासाठी व्यापक समाज प्रबोधनाची आवश्यकता आहे. पोलीस, सामाजिक संस्था, समाजातील विविध घटक यांनी हा अनिष्ट प्रकार थांबविण्यासाठी पुढे येणे, संघटित होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या प्रश्नांची समाजाच्या वेगवेगळ्या व्यासपीठावर याबाबत चर्चा होण्याची आवश्यकता आहे. अनैतिक वाहतूक बंद होण्यासाठी समाजाचं पाठबळ मिळणंही आवश्यक आहे.
सेव्ह द चिल्ड्रन इंडियाचे समन्वयक प्रविण कदम यांनी लैंगिक शोषणाकरिता होणारी मानवी वाहतूक याबाबत संकल्पना स्पष्ट केली. यासाठी त्यांनी लघुपटाद्वारे सादरीकरण केले.
      जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय माने यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत केले. परिविक्षा अधिकारी बी. जी. काटकर यांनी सूत्रसंचलन केले. दिवसभराच्या या कार्यशाळेत मुंबईच्या रेस्कू फाऊंडेशनचे अ‍ॅड. हरिष भंडारी यांनी अनैतिक वाहतुकीला बळी पडलेल्या व्यक्तींची सुटका, काळजी आणि संरक्षण याबाबत माहिती दिली. बाल कल्याण समितीचे माजी अध्यक्ष सतीश पाटील यांनी बाल न्याय (बालकांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम यांच्यामधील संबंध आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.