कोल्हापूर दि. ६ : यंदा चांगला पाऊस पडू दे आणि राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन राज्यातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी असे साकडे आज सहकार, संसदीय कार्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दख्खनचा राजा श्री जोतिबास घातले.
श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त पालकमंत्री पाटील यांनी श्री जोतिबाचे दर्शन घेऊन पूजा केली. त्यांच्या हस्ते मानाच्या पाडळी आणि विहे येथील सासनकाठींचे पूजन झाले. त्यानंतर ते बोलत होते.
पालकमंत्री म्हणाले, राज्याच्या काही भागात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहेच. पण येणार्या पावसाळ्यात राज्यात सर्वदूर चांगला पाऊस व्हावा आणि राज्यातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी. कारण शेती आणि शेतकरी हाच राज्याचा केंद्गबिंदू आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुष्काळी भागाचे दौरे केले आहेत. त्यांनी दुष्काळी भागातील अधिकार्यांची बैठक बोलावली असून त्यामध्ये ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
जोतिबा देवस्थानच्या यात्रेला दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढतच आहे. वाढणारी संख्या पाहता त्यांना चांगल्या पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. एकेरी वाहतूक, भक्त निवास आदींच्या यामध्ये विचार करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी गृह, ग्रामविकास राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून जोतिबा देवस्थान विकासासाठी निधी देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. यावेळी खासदार सदाशिवराव मंडलिक, आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस प्रमुख विजयसिंह जाधव आदी उपस्थित होते.
जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात, गुलाल खोबर्याच्या उधळणीत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आदि राज्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबाची यात्रा भक्तीमय वातावरणात पार पडली. पालखीच्या मिरवणुकीला ढोलताशे व हलगीच्या निनादात प्रारंभ झाला. गगनाला भिडणार्या सासनकाठ्या नाचवत व गुलाल-खोबरे उधळत भाविक देहभान विसरुन मिरवणुकीत सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.