इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ९ एप्रिल, २०१२

रणजित देसाई यांच्या स्मारकासाठी राज्य शासन प्रयत्नशील : पाटील

        कोल्हापूर दि. ९ : थोर साहित्यिक रणजित देसाई यांचे कोवाड येथे स्मारक उभारण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल. त्यासाठीचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी कोवाड (ता. चंदगड) येथे दिली.
      रणजित देसाई यांची ८५ वी जयंती आणि सार्वजनिक ग्रंथालयाचा दहावा वर्धापन दिन या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोवाड येथील श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.
      श्री. पाटील म्हणाले, रणजित देसाई यांनी श्रीमान योगी, स्वामी, राधेय यासारख्या आपल्या साहित्यकृतींनी मराठी साहित्याचे दालन समृद केले आहे. त्यांच्या लिखाणामुळे मराठी साहित्याचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव झाले. त्यांचं कोवाड येथे उचित स्मारक झालं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी राज्य शासन सकारात्मक पावले उचलेल. स्मारकाचा आराखडा कसा असावा, त्याची रचना कशी असावी याबाबतचा विचार करण्यासाठी राज्याच्या कला संचालनालयास सांगण्यात येईल.
      यंदाचे वर्ष महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. यशवंतराव चव्हाण साहित्यिक, कलाकार यांना कायमच आदराचे स्थान देत असत. त्यांचे ते धोरण राज्य शासनाने पुढे सुरु ठेवले आहे, असे सांगून श्री. पाटील म्हणाले, राज्य शासनाने मराठी भाषेच्या विकासासाठी स्वतंत्र मराठी भाषा विभाग सुरु केला आहे. या विभागाच्या माध्यमातून मराठी संवर्धनासाठी राज्य शासनाचे कार्य सुरु आहे.
      यावेळी व्यासपीठावर सरपंच मारुती कांबळे, सौ. पारु नाईक, मधुमती शिंदे, विजयकुमार दळवी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी निलीमा धायगुडे, चंदगडचे तहसिलदार शिवाजीराव तळपे आदी उपस्थित होते.
      यावेळी डॉ. रमाकांत जोशी यांनी लिहिलेल्या गंध आठवणींचा या पुस्तकाचे पंडीत राहुल देशपांडे  यांच्या  हस्ते  प्रकाशन झाले.  कार्यक्रमानंतर पंडीत राहुल देशपांडे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.