मंगळवार, ३ एप्रिल, २०१२

शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम यशस्वी करा : जिल्हाधिकारी

       कोल्हापूर दि. ३ : शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी करुन कोल्हापूर जिल्हा कार्बनमुक्त करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज येथे केले.
      महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा आणि नियोजन बैठकीत ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठातील भाषा भवनच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, कुलगुरु डॉ. एन. जे. पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, कर्नल एस. एच. ग्रेवाल, उपसंचालक सामाजिक वनीकरण सत्यजित गुजर, उपवनसंरक्षक विजय शेळके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शिवाजी कादबाने आदी उपस्थित होते.
      श्री. देशमुख म्हणाले, शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने गावनिहाय नियोजन करावे. महाविद्यालयाने गाव दत्तक घ्यावे. माजी सैनिक, युवक मंडळे यांचाही या मोहिमेत सहभाग वाढवावा. कोल्हापूर जिल्हा देशातील पहिला निर्मल जिल्हा झाला आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील ३३ टक्के क्षेत्र वृक्षाखाली आणून जिल्हा देशातील पहिला हरित जिल्हा करुया, असे आवाहनही त्यांनी केले.
      कुलगुरु एन. जे. पवार म्हणाले, कोल्हापूर शहर निसर्गाने वेढलेले आहे. मात्र हवेची गुणवत्ता चांगली राखण्यासाठी आणि पाण्याचे स्त्रोत कायम टिकवण्यासाठी वृक्षांची लावड करण्याची आवश्यकता आहे. राज्य शासनाने हाती घेतलेले हे कार्य सामाजिक बांधिलकीचे आहे. या कार्यात शिवाजी विद्यापीठ आणि अखत्यारीतील सर्व महाविद्यालये सहभागी होतील.
      जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, शतकोटी वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम एक लोकचळवळ व्हावी. या चळवळीत शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी या मोहिमेत सहभागी व्हावेत. कारण विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाल्यास ही मोहीम यशस्वी होईल.
      यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्रा. ए. बी. राजगे, कर्नल एस. एच. ग्रेवाल, इचलकरंजीचे प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, भुदरगडच्या तहसिलदार नीता शिंदे यांचीही भाषणे झाली.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.