कोल्हापूर दि. ३ : श्री ज्योतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा ४ ते ७ एप्रिल २०१२ कालावधीत होत आहे. चैत्र यात्रेच्यावेळी रहदारीच्या प्रमुख मार्गावर मोटार वाहनांचे पार्किंग होऊन वाहतुकीची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने भाविकांची सुरक्षा व मोटार वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. यासाठी यात्रेच्या काळात घाटामध्ये खालीलप्रमाणे एकेरी वाहतूक व सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना प्रवेश बंद / मार्ग वळवण्यात येत आहेत. तरी मोटार वाहनचालक व भाविकांनी वाहतुक नियोजनास सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापुरचे पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
वाहतुकीसाठी एकेरी वाहतूक व प्रवेश बंद करण्यात येणारे मार्ग - जोतिबा यात्रेकरिता जाणारी सर्व मोटार वाहने केर्ली ते कुशिरे फाटा मार्गे जोतिबा डोंगरावर जातील व इतर सर्व मार्ग मोटार वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येत आहेत. कुशिरे गावावरुन येणारी सर्व मोटार वाहने सामाजिक वनीकरण फाटा येथून गायमुख मार्गे जोतिबा डोंगरावर जातील. फक्त एस. टी. बसेस सामाजिक वनीकरणमधून सरळ मार्गाने जुने आंब्याचे झाड मार्गे जोतिबा डोंगरावर ये-जा करतील. घाट उतरताना जोतिबा डोंगरावरील सर्व मोटार वाहने दाणेवाडी फाट्यावरुन वाघबिळ किंवा गिरोली मार्गे कोल्हापूर व इतर ठिकाणी एकदिशा मार्गे जातील. जोतिबा डोंगर ते आंब्याचे झाड या दरम्यानची वाहतुक दोन्ही मार्गाने राहील. वाघबिळ व शाहुवाडीकडून दाणेवाडी मार्गे येणारी सर्व वाहने फक्त केर्ली या मार्गेच जोतिबा डोंगर या मार्गे जातील. माले, कोडोली, गिरोली, वाघबिळ हे मार्ग फक्त बाहेर जाण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. ते जोबिता डोंगरावर येण्यास प्रवेश बंदी आहेत. मालाने भरलेले ट्रक, तीनचाकी प्रवासी व माल वाहतूक रिक्षा व दोन ट्रेलर असलेले ट्रॅक्टर यांना जोतिबा डोंगरावर जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. मुख्य जोतिबा यात्रा दि. ६ एप्रिल २०१२ रोजी असल्याने जोतिबा डोंगरावर मोटार वाहनांचे पार्किंगकरिता जागा अपुरी पडल्यास परिस्थिती अन्वये सर्व मोटार वाहने शेवताई मंदिर परिसरामध्ये व केर्ली हायस्कूलच्या मैदानावर व गिरोली फाटा या ठिकाणी केलेल्या पार्किंगच्या ठिकाणी पार्क करावीत आणि त्याच ठिकाणावरुन जोतिबा डोंगरावर जाण्यास एस. टी. बसेस व अत्यावश्यक वाहनाखेरीज इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात येईल. भाविकांनी आपली वाहने शेवताई मंदिर परिसरामध्ये व केर्ली मैदानावर व गिरोली फाटा या ठिकाणी पार्किंग करुन एस. टी. बसने जोतिबा डोंगरावर जावे आणि यात्रा सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी व भाविकांना होणार्या अडचणी व त्रास टाळण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. केर्ली येथील सर्व मोटार वाहनांना (एसटी बस व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) प्रवेश बंद केले नंतर जोतिबा डोंगर ते केर्ली पार्किंग प्लेस या दरम्यानची एसटी बसेसची वाहतूक दोन्ही बाजुनी चालू राहील. प्रवासी टोल नाक्याजवळील नवीन एस. टी. बस स्थानक ते पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊस या दरम्यानचे मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्यांच्या दोन्ही बाजुस थांबण्यास व पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.
मोटार वाहन पार्किंग व्यवस्था - यमाई मंदिराजवळ - चारचाकी, मेन पार्किंग - लक्झरी, मिनीबस व चारचाकी, ट्रक पार्किंग - ट्रक व टेम्पो, ग्रामपंचायत पार्किंग - चारचाकी, यात्री निवाससमोर - दुचाकी, नवीन एस.टी. स्टँड समोर व परिसर - चारचाकी व दुचाकी, पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊस भिंतीलगत पार्किंग - दुचाकी, शेवताई मंदिर परिसर - चारचाकी, गिरोली फाटा - चारचाकी व इतर वाहने.
सदरचे वाहतुकीचे एकेरी मार्ग व प्रवेश बंद हे नियमन दि. ४ एप्रिल २०१२ रोजी रात्रौ ८ पासून दि. ७ एप्रिल २०१२ रोजी साय. ६ वाजेपर्यंत करण्यात येत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.