सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६




सायबर लॅबमुळे गुन्हेगारांना जरब बसेल
-          पालकमंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर येथे अद्ययावत सायबर लॅब कार्यान्वित
     कोल्हापूर, दिनांक 15 : आजच्या स्वतंत्रदिनी राज्यात 44 ठिकाणी सायबर लॅब सुरु होत असून या सायबर लॅबमुळे अनेक सायबर गुन्हे उघडकीस येऊन गुन्हेगारांना जरब बसेल, असा विश्वास महाराष्ट्राचे महसूलमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना व्यक्त केला.
      कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने 66 लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या अद्ययावत सायबर लॅबचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमास कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी,  पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर आदी मान्यवर उपस्थित होते.   
     जिल्हास्तरावर अद्ययावत सायबर लॅब कार्यान्वित झाल्याने अनेक सायबर गुन्हे तात्काळ उघडकीस आणणे शक्य होणार असल्याचे, सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, दिवसेंदिवस सायबर क्राईम वाढत आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारीला वेळीच लगाम घालण्याचे काम सायबर लॅबद्वारे होईल.  सायबर लॅबच्या माध्यमातून हार्ड डिस्क फॉरेन्सिक त्याचप्रमाणे मोबाईल फॉरेन्सिक तपास सहज शक्य होणार आहे. जिल्हास्तरावर सायबर लॅब ही काळाची गरज असून यापुढील काळात हा उपक्रम अधिक प्रभावी आणि परिणामकारकपणे राबवावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
      महाराष्ट्र शासनाने विशेषत: मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी राज्यात जनतेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले असून जिल्हास्तरावर सायबर लॅब हा एक महत्वाकांशी प्रकल्प राज्यभर सुरु केला आहे. पोलीस दलाची संख्यात्मक वाढ करण्याबरोबरच त्यांना अत्याधुनिक सुविधा आणि साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्यासही राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. जिल्हास्तरावर सायबर लॅब मुळे गुन्हे तात्काळ उघडकीस येतील मात्र सायबर गुन्ह्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयी नव्या पिढीमध्ये जागृती आणि प्रबोधन करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.    
      याप्रसंगी बोलताना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यात तीन कोटी रुपये खर्चुन सायबर लॅब उभारण्यात आल्या आहेत. या सायबर लॅबमुळे भविष्यात सायबर गुन्हे उघडकीस येण्यास मदत होणार आहे. सायबर लॅब प्रकल्पाबरोबरच सायबर गुन्ह्याविषयी लोकांना विशेषत: शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.
      प्रारंभी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सायबर लॅब बाबतची अधिक माहिती प्रेझेंटेशनद्वारे दिली, ते म्हणाले पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यान्वित झालेली ही अद्ययावत सायबर लॅब असून या उपक्रमासाठी सद्यस्थितीत 10 अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत.  ही सायबर लॅब वातानुकुलीत असून तांत्रिक तपासणीसाठी सुसज्ज आहे. तसेच सायबर लॅबकरीता C-DAC कडून पोलीस तपासणीसाठी आवश्यक असलेले सॉफ्टवेअर आणि प्रशिक्षण देण्यात आले आहे. या सायबर लॅबमध्ये मोबाईल चेक, विनलिस्ट, सायबर चेक, ट्रयूबॅक,  नेसा अशी आधुनिक पध्दतीचे सॉफ्टवेअर आहेत. शेवटी गडहिंग्लजचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांनी आभार मानले.
      समारंभास पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय भांबुरे, शहर पोलीस उपअधीक्षक भरतकुमार राणे आणि संजय जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर नागरीक उपस्थित होते.
 00 0 0 0 0 0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.