इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ८ ऑगस्ट, २०१६





समाजाच्या गरजा लक्षात घेऊन
विवेकानंद शिक्षण संस्थेने नवनवे अभ्यासक्रम सुरु करावेत
-          पालकमंत्री चंद्रकांत पाटील
-           
     कोल्हापूर दि. 08 : समाजाच्या गरजा आणि आवश्यकता डोळ्यासमोर ठेऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने आगामी काळात कौशल्य विकास, आपत्ती व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, लर्निंग असे विविध अभ्यासक्रम सुरु करावेत, असे अवाहन  जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलताना केले.
     श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्यावतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या 29 व्या स्मृतीदिनानिमित्त संस्थेच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे स्मृती भवनामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. समारंभास संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे आदि मान्यवर उपस्थित होते. या समारंभात आजच्या शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हाने या विषयावर साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांचे भाषण झाले.
     संस्थेच्या सर्व शाळातील शिक्षक तसेच शिकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून सर्व शाळांमध्ये ई-लर्निंगची सुविधा सुरु करावी, असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, येत्या तीन वर्षात संस्थेने समाजातील दानशुरांच्या मदतीतून विशेषत: लोकसहभागातून नवनवे उपक्रम हाती घ्यावेत. संस्थेतील प्रत्येकाने उद्दिष्ट निश्चित करुन संस्थेच्या आगामी तीन वर्षाचा नवा आराखडा तयार करुन त्यानुसार वाटचाल करावी. समाजातील दानशुर व्यक्ती आणि संस्थांनी सेवाभावी वृत्तीने समाजासाठी विशेषत: गरीब वर्गासाठी काम करण्याची जबाबदारी उचलावी असे आवाहनही त्यांनी केले.
     शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी अथक परिश्रमातून, जिद्दीने स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करुन गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. ज्या तत्वज्ञानावर संस्थेची उभारणी झाली आहे. त्यांची नव्याने गुरुदेव कार्यकर्त्यांनी आचरण करण्याची गरज असून नव समाजरचनेमध्ये आपले योगदान देण्यासाठी कृती करण्याची गरज आहे. डॉ. बापूजी साळुंखे  सुसंस्कारी, सदविचारी शिक्षण महर्षी होते. त्यांनी घालून दिलेल्या विचाराने कार्य करणे आणि अशा कार्यातून त्यांचे स्मरण करणे खऱ्या अर्थाने महत्वाचे आहे.  डॉ. बापूजी साळुंखे यांच्या कार्याचा आणि शिकवणीचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गौरव केला.
     याप्रंसगी साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी आजच्या शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हाने या विषयावर सविस्तरपणे भाषण केले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच अन्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विविध पुस्तकांचे प्रकाशनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
     प्रारंभी कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. शेवटी सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी आभार मानले. समारंभास सहसचिव प्राचार्य अशोक कारंडे, प्राचार्य हिंदुराव पाटील,      डॉ. शरद साळुंखे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजाराम शिपुगडे, माणिक पाटील-चुयेकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरीक उपस्थित होते.
     कार्यक्रमापुर्वी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या प्रागणातील शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या समाधीस्थळास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पचक्र अपर्ण करुन अभिवादन केले.

0 0 0 0 0 00

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.