शुक्लतीर्थावर श्रींच्या
पर्वकाळ स्नानाने कन्यागत महापर्वास सुरुवात
पालकमंत्री चंद्रकांत पाटील,गृहराज्यमंत्री
केसरकरांची उपस्थिती
नृसिंहवाडी दि.
12 : दिगंबरा...दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रींचे शुक्लतीर्थ घाटावर सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी गंगा कृष्णा स्नान झाले. यानंतर शिरोळ येथील जयभवानी तोफेची सलामी देण्यात आली. भाविकांनी श्रींच्या स्नानांच्या या अलौकिक सोहळ्याची याची देही याची डोळा अनुभूती घेतली.
दत्त मंदिरातून दुपारी निघालेली ही पालखी मुख्य सभामंडप, पेठ भाग, ग्रामपंचायत, मरगुबाई मंदिर, ओतवाडी मार्गे शुक्लतीर्थी
नेण्यात आली. टाळ मृदुंगाच्या आणि दिगंबरा...दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त अशा निनादाने संपूर्ण वाडीक्षेत्र दुमदुमून गेले. काल दुपारी दत्त मंदिरातून निघालेली श्रींची पालखी भाविकांच्या आणि दत्त भक्तांच्या अभुतपूर्व उत्साहात रात्री उशीरा शुक्लतीर्थावर आली. शुक्लतीर्थावरील औदुंबराच्या झाडाजवळ श्रींची पालखी भाविकांच्या दर्शनासाठी विराजमान झाली. विश्रांतीनंतर पहाटे विधीवत पूजा होऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, श्री नृसिंहसरस्वती दत्त देवस्थानचे अध्यक्ष राहूल पुजारी, सचिव संजय पुजारी तसेच मान्यवर विश्वस्त, नृसिंहवाडीच्या सरंपच अरुंधती जगदाळे, उपसरपंच धनाजीराव जगदाळे तसेच श्रींचे मान्यवर पुजारी आणि भाविक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
शुक्लतीर्थ घाटावरील
पहाटेचे प्रसन्न वातावरण आणि पुष्पमाळानी सजविलेल्या भव्य स्वागत कमानींच्या पार्श्वभूमिवर औदुंबराच्या वृक्षाभोवती श्रींच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी लाखो भाविकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. या परिसरात श्रींच्या स्नानाचा सोहळा दत्त भक्तांना पाहता यावा, यासाठी प्रशासनाने आणि देवस्थान समितीने चोख व्यवस्था केली होती.
शुक्लतीर्थावर
श्रींच्या स्नान सोहळ्यानंतर भाविकांनी स्नानास प्रारंभ केला. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृह
राज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही यावेळी स्नानाचा लाभ घेतला यावेळी मंदिर परिसरातील घाटावर भाविकांनी स्नानाची एकच गर्दी केली होती. दिगंबरा...दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात संपूर्ण परिसर स्नान सोहळ्याने कृष्णाघाट फुलून गेला होता. दत्त देवस्थान परिसरात हेलिकॉप्टरमधून यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. लाखो भाविकांनी कृष्णातीरावरील घाटांवर अभुतपूर्व स्नानाचा आनंद घेऊन पहिली पर्वणी उत्साहाने साजरी केली. भाविकांच्या स्नानासाठी प्रशासन आणि पोलीस दल तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या खबरदारीत भाविकांनी स्नान सोहळ्याच्या पर्वणीचा आनंद घेतला.
आज सकाळी 6 वाजून २० मिनिटांनी
श्रींच्या उत्सवमुर्तीचे पर्वकालस्नान झाल्यावर पुष्प अर्घ देवून विधीवत पुण्याहवाचन,
गंगापूजन आदि कार्यक्रम होवून सकाळी १० वाजता उत्सवमुर्ती शुक्लतीर्थावरुन मुख्य मंदिराकडे
येण्यासाठी निघाली.
दर 12 वर्षानी येणारा कन्यागत महापर्वकाल सोहळ्यास शुक्लतीर्थावरील श्रींच्या स्नान सोहळ्याने आरंभ झाला. आता पुढे वर्षभर हा सोहळा कृष्णातीरावर सातत्याने सुरुच राहणार आहे. कन्यागत महापर्वकाल सोहळ्याच्या वर्षभरात जवळपास 50 पर्वण्या असून त्यामध्ये 8 प्रमुख पर्वण्या आहेत. यामध्ये 12 ऑगस्ट 2016, 20 सप्टेंबर 2016 तर पुढील वर्षी 14 जानेवारी 2017, 25 मार्च 2017, 9 जुलै 2017, 7 ऑगस्ट 2017, 21 ऑगस्ट 2017 आणि 12 सप्टेंबर 2017 रोजी हा कन्यागत सोहळा समाप्त होतो.
श्री क्षेत्र नृसिंहवाडीसह शिरोळ येथे भोजनपात्र मंदिर, औरवाड येथे अमरेश्वर मंदिर, गणेशवाडी येथे स्वयंभु गणेश मंदिर आणि खिद्रापूर येथे पुरातन कोपेश्वर मंदिर यासह कृष्णातीरावरील अमरापूर, औरवाड, आलास, गौरवाड, बुबनाळ, गणेशवाडी, कवठेगुलंद आदि गावातही कन्यागत महापर्वकालामध्ये भाविकांना स्नानाची पर्वणी लाभणार आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.