इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

अवयव दान - आयुष्य जगायला आणखी एक संधी महारॅलीने केली अवयवदानासंबधी जनजागृतीची सुरुवात



कोल्हापूर दि. 30  : अवयव दान म्हणजे आयुष्य जगायला आणखी एक संधी  असून अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे याबाबत समाजाला जाणीव जागृती  करण्यासाठी राज्यात  महाअवयवदान अभियान सुरु करण्यात आले असून या अभियानाची  सुरुवात कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून केली.
येथील दसरा चौकातून सुरु झालेल्या महाअवयवदान अभियान महारॅलीच्या शुभारंभाप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, राजर्षि शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एन. शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
            अवयव दान श्रेष्ठ दान, गणपती बाप्पा मोरया - आवयव दान करुया, अवयवदान आयुष्य जगायला आणखी एक संधी, सबसे महान अवयवदान अशा घोषणा देत या महारॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी संपुर्ण परिसर दणाणून सोडला. अवयवदानाने मृत्युच्या उबंरठ्यावर असणाऱ्यांना जिवन जगण्याची संधी देऊ शकतो. मृत्युनंतरही आपण अवयवदानाच्या स्वरुपात दुसऱ्याच्या शरिरात जिवंत राहु शकतो. अवयवदानाच्या या उदत्त कार्याला जात, धर्म, लिंग यांचे बंधन नाही. यामुळे अवयवदानासाठी मोठ्याप्रमाणात पुढे यावे असे आवाहन या महारॅलीद्वारे करण्यात आले. छत्रपती राजर्षि शाहु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, जगतगुरु पंचाचार्य होमिओपॅथिक महाविद्यालय, वेणूताई चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज, सावित्रबाई फुले नर्सिंग कॉलेज, शिवाजी विद्यापीठातील एनएसएस विभाग, महावीर महाविद्यालय, शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर मेडीकल असोशियशन यांचा या रॅलीत सहभाग होता.
 पाच हजार विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या महारॅलीची सुरुवात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते दसरा चौक येथून हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. दसरा चौकातून ही रॅली पुढे आईसाहेब महाराज पुतळा, बिंदु चौक, शिवाजी पुतळा, महानगरपालीका, सीपीआर मार्गे दसरा चौकात आली. यावेळी शासकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अवयवदान जनजागृती बाबत पथनाट्य सादर केले. रॅलीनंतर सावित्रीबाई फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.  जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्येही महारॅलीचे आयोजन करण्यात आले. 31 ऑगस्ट 2016 रोजी या अभियानाअंतर्गत विविध महाविद्यालयामध्ये निबंध, वृत्वव, रांगोळी या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. आणि 31 सप्टेंबर 2016 रोजी विविध ठिकाणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.


000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.