गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६




 दिगंबरा...दिगंबराच्या जयघोषाने शिरोळ दुमदुमले
शिरोळच्या भोजनपात्र पालखीचे शुक्लतीर्थाकडे प्रस्थान

  नृसिंहवाडी, दि. 11 :  दिगंबरा...दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त अशा नामघोषात हत्ती, घोडे, उंटांच्या लवाजम्यासह  टाळ, मृदुंग, झांज, ढोल-ताशाच्या गजरात आरत्यांच्या निनादात आणि शिरोळवासियांच्या अपूर्व उत्साहात भोजनपात्र येथील श्रींच्या पालखीचे शुक्लतीर्थाकडे आज सायंकाळी ५ वाजता प्रस्थान झाले.
 कन्यागत महापर्वकाळातील शिरोळच्या भोजनपात्र पालखी सोहळ्यामध्ये भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. पालखी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती. नैवद्य, धुप, दिप आरती होऊन दुपारी श्रींच्या पालखी सोहळ्यास ब्रम्हवृंद, ग्रामस्थ, दत्तभक्तांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी शिरोळचे आमदार उल्हास पाटील, सरपंच सुवर्णा कोळी, उपसरपंच पृथ्वीराज यादव, दलितमित्र अशोकराव माने, अनिल यादव, श्रींचे मान्यवर पुजारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 श्रींची पालखी भोजनपात्र मंदिरापासून सायंकाळी ५ वाजता निघाली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळयांच्या वेली, मध्ये मोठ्या आकाराच्या रस्ता व्यापून टाकणाऱ्या लक्षवेधी रांगोळ्या, पुष्पपाकळ्यांचा मार्गावरील सडा, विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, डौलदार ऐट मिरवणारे हत्ती, छत्रपती शिवराय, महाराराणी ताराराणी, मल्हारी मार्तंड, मावळ्यांच्या वेषभूषेतील घोड्यावर बसलेले तरुण, तरुणी, उंट, शिरोळची ऐतिहासिक तोफ वाहून नेणारी डौलदार बैलजोडी, कोल्हापूरचे तरुण-तरुणींचे विशेष ढोल पथक, मिरजेचे बँड पथक, कन्यागत महापर्वकाळ 2016-17 लिहिलेल्या भगव्या टोप्या परिधान केलेले ग्रामस्थ यामुळे शिरोळचे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.
ग्रामस्थ तसेच भाविकांनी विद्युत रोषणाईने आपली घरे व पालखी मार्ग सजविला आहे. सुहासिनींनी भोजनपात्र पालखीचे औक्षण केले. पालखी मार्गावर महिला, पुरुष, अबालवृध्द भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.