इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

कोल्हापूर पर्यटन महोत्सवाचे सुक्ष्म नियोजन करा -जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी


         कोल्हापूर, दि. 31 :  ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणारा कोल्हापूर पर्यटन महोत्सव हा कोल्हापूर जिल्हा पर्यटनाला चालना देणार महत्वपूर्ण उपक्रम असल्याने सर्व यंत्रणांनी यामध्ये सुक्ष्म नियोजन परिपूर्ण तयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले.
            ऑक्टोबर महिन्यात दिनांक 14,15,16 रोजी पर्यटन महोत्सव होणार असून या महोत्सवाची रुपरेषा ठरविण्यासाठी  कोल्हापूर जिल्हा पर्यटन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंग पवार, महापौर अश्विनी रामाणे, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे, प्रोबेशनरी आयएएस श्रीमती भुवनेश्वरी, शाहू स्मारक ट्रस्टचे सचिव विवेक आगवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील,  हॉटेल मालक असोसिएशनचे उज्ज्वल नागेशकर, अमरजा निंबाळकर आदींची उपस्थिती होती.
            ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या तीन दिवसाच्या पर्यटन महोत्सवामध्ये विविध ठिकाणच्या टुर ऑपरेर्ट्सची कोल्हापूर टुरिझमच्यादृष्टीने भेट घडवून आणण्यात येईल. त्यासाठी विविध सर्कीट्स तसेच जिल्ह्यातील वैशिष्ट्ये या बैठकीत निश्चित करण्यात आली. महोत्सवा दरम्यान इव्हीनिंग कल्चर शो शाहू मेमोरियल ट्रस्ट मध्ये दाखविण्यात येईल. यातून शाहू स्मारक भवनला कल्चरल हब बनिण्याचा प्रयत्न केला जाईल, तसेच दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनही शाहू स्मारक येथे आयोजित  करण्यात येईल. तसेच लवकरच ट्रस्टच्या वतीने टुरिस्ट बसही सुरु करण्यात येणार असल्याचे डॉ. सैनी यांनी सांगितले. यात विविध तालमींच्या भेटी घडवून आणल्या जातील. पंचगंगा घाटावरील आरतीचाही यामध्ये समावेश करण्यात येईल, असे याबैठकी स्पष्ट करण्यात आले.
            या बैठकीत एमटीडीसीने महापालिका परिसरात माहिती केंद्र त्वरीत सुरु करावे. कोल्हापूरच्या पर्यटन वाढीच्या दृष्टीने ते आवश्यक असल्याचे सांगून या व्यतिरिक्त शाहू स्मारक भवन आणि रेल्वे स्टेशन परिसर या ठिकाणीही माहिती केंद्र सुरु करावीत. यावेळी पन्हाळा येथील इंटरप्रिटेशन सेंटर, एमटीडीसीकडून पन्हाळा नगरपालिकेला हस्तांतरीत करण्याबाबत तत्वत: मान्यता देण्यात आली. पन्हाळा शिवतीर्थ तलावाच्या सुशोभिकरणाला शासनाने 5 कोटी रुपये निधी मंजूर केला असून सदरचे काम रखडल्याबाबत जिल्ह्याकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करुन काम त्वरीत पूर्ण करावे. पंचगंगा घाट परिसर विकास आराखड्याबाबत महानगरपालिका आयुक्तांनी बैठक घ्यावी सदरचा विषय मार्गी लावावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले.
            आंबा आणि राधानगरी येथील रेस्ट हाऊस सुधारणा करावी आणि ती शाहू स्मारक ट्रस्ट आणि संबंधित शासकीय यंत्रणा या दोहोंच्या माध्यमातंन चालविली जावीत यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याबाबतही जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सुचित केले.
            यावेळी हॉटेल मालक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने कोल्हापूरसाठी स्वतंत्र पर्यटन धोरण असावे. पर्यटन स्थळे स्वच्छ असावीत, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि शौचालयाच्या पुरेशा सुविधा असाव्यात, पार्किंग, टुरिस्ट बसेस असावे. गाईड प्रशिक्षण असावे आदी मागण्या करण्यात आल्या. 

  00 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.