सोमवार, ८ ऑगस्ट, २०१६





निर्भया पथक महाराष्ट्रासाठी दिशादर्शक
-          पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पोलीस दलाच्या निर्भया पथकाचा शुभारंभ
           कोल्हापूर दि. 08 : स्त्रीयांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना रामायण, महाभारताच्या काळापासून घडत आहेत. मात्र आता या घटनांचा अतिरेक झाला आहे. आशा घटनांना आटकाव करुन महिलांना समाजात वावरतांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला निर्भया पथक उपक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
           कोल्हापूर जिल्हा पोलीस दलांतर्गत निर्भया पथक स्थापन करण्यात आले असून या पथकाचा शुभारंभ महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर, महापौर अश्विनी रामाणे, आमदार राजेश क्षिरसागर, कोल्हापूर परिक्षेत्राचे  विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, महानगरपालिका आयुक्त पी.शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, मधुरिमा राजे छत्रपती, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी भुवनेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
           विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला निर्भया पथकाचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्राला पथदर्शी ठरले, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याबरोबरच राजर्षी शाहू महाराजांचा वारसा लाभलेल्या या जिल्ह्याला या पथकाची फारकाळ गरज पडू नये अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली. कोल्हापूर जिल्हा हा इभ्रतीला घाबरणारा आहे. या पथकांतर्गत छेडछाड करणाऱ्या व्यक्तीचे चित्रीकरण करुन त्याच्या घरातील आई-बायको-बहिण, अशा स्त्रीयांना दाखविण्याची संकल्पना अतिशय चांगली असून यामुळे महिलांच्या छेडछाच्या प्रकरणांना चांगलाच आळा बसेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
           या अभियानाला आवश्यक साधने, वाहने, कॅमेरे यांची कोणतीही कमतरता भासू देणार नसल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जगातील सर्व प्रश्न,समस्या या मानसिकेतून निर्माण होतात. त्यासाठी मन सुसंस्कारीत करण्याची गरज आहे. भारतीय परंपरेत स्त्रीला समानतेचा दर्जा आहे. हा विचार बिंबवण्याचं कामही निर्भया पथकाच्या माध्यमातून व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
           एखादी घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा वाईट घटना घडू नयेत यासाठी कृतीशील असणे आवश्यकअसल्याचे सांगून डॉ. विजया रहाटकर म्हणाल्या की, कोल्हापूर पोलीस दलांतर्गत तसे प्रयत्न होत असल्याबद्दल समाधान वाटते. महिला संरक्षणाबद्दल शासनाचे कायदे अतिशय कठोर असले तरी त्यांची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. कौटुंबिक हिंसाचार कायदा, विशाखा गाईड लाईन्स यावर आधारीत कायदे यावर अंमलबजावणी अत्यंत सक्षमपणे झाली पाहिजे. असे सांगून निर्भया  पथकाचा समन्वय आणि समुपदेशन यावर भर असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. विनयभंग,  छेडछाडी संदर्भात असणारे कलम 354 खालील गुन्हे दाखल  होतात. अशा गुन्ह्यांना वेळीच आवर घातला तर मोठ्‌या आत्याचारांना वेळीच रोखणे शक्य होईल, असे सांगून स्त्री पुरुष समानता महिला सुरक्षा हा दैनंदिन संस्काराचा भाग झाला पाहिजे. पोक्सो, लैगिंग अत्याचारा संबंधी कायदे समजून घ्या त्याबद्दल समाजात जाणिव जागृती करा, असे आवाहन त्यांनी केले.
           विश्वास नांगरे पाटील यांनी ज्या समाजात महिलांना मानाचे स्थान असते तोच समाज उत्कर्ष पावतो, असे सांगून महिला अत्याचारा संबंधी महिलांना अनेक गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. ऍ़सिड हल्ले, मारहाण, कौटुंबिक हिंसाचार, छेडछाड अशा अनेक समस्या रोज वेगवेगळ्या रुपात समोर येत आहे. महिला अत्याचारा संबंधाच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र चौथ्या स्थानावर असून सुमारे 3465 बलात्काराचे बळी महाराष्ट्रात आहेत. या अनेक अल्पवयीन मुली आहेत. एकूण महाराष्ट्रात महिलांविषक असुरक्षितता वाढती आहे. यांना आटकाव करण्यासाठी तेंलगणा राज्य पोलीसांच्या धर्तीवर महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडाची प्रकार यांच्या समुळ उच्चाटनासाठी निर्भया पथकाची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले.यामध्ये पोलीस स्वत: तक्रार दाखल करतील, महिलांची नावे गोपनीय ठेवली जातील. पथकात अत्यंत संवेदनशील तंज्ञ व्यक्तींची निवड करण्यात येईल.  स्वंयस्फुर्तीने काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना यामध्ये सहभागी करुन घेण्यात येईल. पिडित व्यक्तीबरोबरच  पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ओळखही गोपनीय ठेवण्यात येईल असे सांगितले.
           जिल्हधिकारी डॉ. अमित सैनी यांनी कोणताही नवीन उपक्रम सुरु करताना शासकीय अधिकाऱ्यांना लोकांच्या टिकाटीपणीच धास्ती वाटते. याला फाटा देऊन विश्वास नांगरे पाटील यांनी  सदर पथकाची स्थापना केली आहे. त्यासाठी सोशल मिडीयाची साधने वापरली आहेत. हे अभिनंदनीय आहे. घरा बाहेर पडणाऱ्या महिलांसाठी जशी सुरक्षितता गरजेची आहे तसेच घरातील महिलांनाही सुरक्षित वातावरणाची आवश्यकता आहे. मुलींचे प्रमाण कमी असणाऱ्या देशातील 100 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचा समावेश असावा ही लाजिरवाणी बाब आहे. स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासाठीही निर्भया पथकाच्या मदतीची आवश्यकता आहे.
           जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे म्हणाले, कुणे एकेकाळी चुल आणि मुल एवढ्याच क्षेत्रा पर्यंत मर्यादेत असलेल्या स्त्रीया घराबाहेर पडून आपल कर्तुत्व सिध्द करुन लागल्या यासोबतच काही पुरुषांच्या विकृत मानसिकताही बाहेर पडू लागल्या. अशा विकृत मानसिकतेला पायबंद घालण्यासाठी निर्भया पथक काम करणार आहे. महिलांची छेडछाड हा विषय गंभीर बनत असून त्याला अटकाव करण्यासाठी निर्भया पथक स्थापन झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात निर्भयाची 10 पथके कार्यरत राहणार आहेत. याची परिणाम लवकरच दिसू लागेल आणि महिलांच्या प्रती समाजात सुरक्षित वातावरण निर्माण हाण्यास मदत होईल.
           अप्पर पोलीस अधीक्षक, सोलापूर मनिषा दुगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड,  राजलक्ष्मी शिवलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, , इस्लापूर, वैशाली शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक, कोल्हापूर आरती नांद्रेकर यांनी निर्भया पथकाची माहिती दिली.
           यावेळी निर्भया पथकाच्या फेसबुकचे उद्घाटन  पालकमंत्री पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. निर्भया पथकाशी संपर्कासाठी व्हॉट्स ऍ़प क्रमांक 9552328383, 7218038585, ईमेल आयडी cr.kop@mahapolice.gov.in, व्टिटर आयडी http://twitter.com/nirbhaya_team, फेसबुक  आयडी www.facebook.com/nirbhayateamkolhapur संपर्क नियंत्रण कक्ष 0231-2662333 या शिवाय प्रतिसाद ऍ़प अशा विविध माध्यमातून संपर्क साधता येईल. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भरतकुमार राणे, अमरसिंह जाधव, सागर पाटील यांच्यासह समन्वयक, महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.