सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६




स्वातंत्र्यदिनी कोल्हापूरात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
महसुल कायद्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करणार
                           -- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर, दि. 15 : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 69 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या  शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास राज्याचे महसूलमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह महापौर आश्विनी रामाणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्षा विमल पाटील, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, ज्येष्ठ नेते पद्मश्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापलिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपमहापौर शमा मुल्ला, अपर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, पोलीस, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी गुलाबपुष्प देवून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छ दिल्या.
यावेळी पोलीस दलातील राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच नैसर्गिक आपत्ती विशेषत: पूर परिस्थितीत बहुमोल कामगिरी बजावणाऱ्या विविध सेवाभावी स्वयंसेवी संस्थांचाही प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. महिला बालविकास विभागाकडील माझी कन्या भाग्यश्री या योजनेंतर्गत महिलांना प्रशस्तीपत्र, वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत उत्कष्ठ काम केलेल्या संस्था आणि व्यक्ती, तसेच ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला. कन्यागत महापर्वकाळ सोहळ्यासाठी मदत करणाऱ्या संस्था, व्यक्ती तसेच एनसीसी ग्रुपचाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांचा सत्कार
        जिल्ह्यात उल्लेखनीय काम करुन जनतेचे हीत जोपासणाऱ्या वरिश्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांचा समावेश होता.पालकमंत्री चंद्रकांत पाटील स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यास उभे राहताच त्यांनी स्वत:हून प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कौतुक करुन त्यांचा सत्कार करण्याची सूचना केली.

महसुल कायद्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करणार
                           -- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
            थोर स्वातंत्र्यसैनिक तसेच नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देवून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महसुल कायद्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याची कार्यवाही करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले असून, यासाठी या क्षेत्रातील जून्या कायद्यांचा अभ्यास आणि तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाईल. याबरोबरच अकारी पड जमिनी जमीन मालकांना परत करण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. यापुढील काळात वतन जमिनी एकदा नजराणा घेवून नावावर केल्यास पुन्हा विकताना महसूल विभागाच्या परवानगीची गरज भासणार नाही. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
            राज्यात सात-बारावर पुरुषांबरोबर महिलेचे नाव चढविण्याचे विशेष अभियान महसूल विभागामार्फत हाती घेतले जाईल अशी घोषणा करुन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महसूल सप्ताहामधून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक महिलांचे नाव सात-बारावर चढविण्यात आले आहे. या महिलांना शेतीविषयक माहिती आणि मार्गदर्शन करण्यासाठी महसूल सप्ताहाची व्याप्ती वाढवून तो महसूल पंधरवडा करण्यात आला. यापुढील काळातही पुरुषांबरोबर महिलेचे नाव सात-बारावर चढवितांना कसलीही फी आकारली जाणार नाही.


जिल्ह्यातही ब्रिटीशकालीन पुलांचे येत्या 15 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट- पालकमंत्री
            महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमिवर राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्याउद्देशाने तसेच जुन्या पुलांबाबत योग्यतो निर्णय घेता यावा, यासाठी या क्षेत्रातील तज्ञांची तसेच अभियंत्यांची कार्यशाळा घेवून त्यातून याबाबतच्या उपाययोजना घेतल्या जातील, असे सांगून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, एकट्या पुणे विभागात जवळपास 2 हजार 300 जुने पुल असून यामध्ये168 ब्रिटीशकालीन पुलांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही ब्रिटीशकालीन पुलांचे येत्या 15 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करुन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. भविष्यात महाड सारखी दुर्घटना घडणार नाही, यासाठी आवश्यक खबरदारी आणि उपाययोजना करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे.
कोल्हापूरकरांना एका महिन्यात दुसऱ्यांदा आलेल्या पुराचा सामना करावा लागला, पण या दोन्ही वेळच्या पुराच्या आपत्तीमध्ये जिल्हयातील जनतेनं धैर्य आणि संयमाने पूरपरिस्थिती हाताळण्यात प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल जनतेचे आभार मानून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रशासनाची सजगता आणि लोकांच्या सहकार्यामुळे यावेळच्या पुरामुळे मोठी जीवितहानी झाली नाही,  याकामी प्रशासनाबरोबरच जनता तसेच विविध सेवाभावी स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
            जिल्ह्यात तीर्थक्षेत्र विकास आणि पर्यर्टनाला शासनाने अधिक गती दिली असून,  महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा तयार असून पहिल्या टप्प्यासाठी 72 कोटीस मान्यता मिळली असून, पहिल्या टप्प्यात अद्ययावत दर्शन मंडपाची उभारणी केली जाणार आहे तसेच जोतिबा मंदिर परिसर विकासाचा आराखडा तयार असून पहिल्या टप्प्यात 25 कोटीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. ऐतिहासिक माणगाव येथे स्मारकासाठी 5 कोटीचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. दर बारा वर्षांनी येणारा कन्यागत महापर्वकाळ सोहळा श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे उत्साही आणि भक्तीमय वातावरणात साजरा झाला. वर्षभर चालणाऱ्या सोहळ्यामुळे श्रद्धा, भक्ती आणि पर्यटनाची संधी जनतेला मिळणार आहे. या कन्यागत सोहळ्यासाठी राज्य शासनाने 121 कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
पूर्वीच्या सुकन्या योजनेचे माझी कन्या भाग्यश्री या नव्याने सुरु करण्यात आलेल्या योजनेत विलीनिकरण करुन मुलींच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतुद करणे, स्त्रीभ्रुण हत्या रोखणे, मुलीच्या जन्माबाबत सकारात्मक विचारांची वातावरण निर्मिती करण्याबरोबरच मुलाइतकाच मुलीचा जन्मदर वाढवणे यावर शासनाने अधिक भर दिला आहे. देशात अवयवदानाची मोठी चळवळ उभी केली असून, राज्यातील जनतेने या चळवळीत सक्रीय सहभागी होवून महाअवयवदान अभियानात महाराष्ट्र देशात अग्रेसर ठेवावा, असे आवाहनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
वर्षाला केवळ 12 रुपये भरुन विम्याचे संरक्षण देणाऱ्या प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजनेत जिल्ह्यात 6 लाख 51 हजार 720 खाती, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत 3 लाख 47 हजार 189 खाती उघडण्यात आली आहेत. या दोन्ही योजनेतून जिल्ह्यातील 200 लाभार्थ्यांच्या वारसांना मृत्यूपश्चात 4 कोटी रुपये देण्यात आले आहेत. अटल पेंशन योजनेची 1250 खाती उघडण्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेत सर्वसाधारण योजनेसाठी 226 कोटी 50 लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 100 कोटी 81 लाख, ओटीएसपी साठी 1 कोटी 80 लाख तरतुद केली असून, नाविन्यपूर्ण योजनेसाठी 8 कोटीचा निधी ची तरतुद करण्यात आली आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात गतवर्षी 69 गावांची निवड करुन 28 कोटी 57 लाख रुपये खर्चुन 1 हजार 199 कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामातून 4 हजार 466 टीएमसी पाणीसाठा होऊन 8 हजार 994 हेक्टर क्षेत्रासाठी एकसंरक्षित सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली आहे ही समाधानाची बाब आहे.  यंदा 20 गावांची निवड करुन 32 कोटी 22 लाखाचा आराखडा तयार करुन 622 कामे हाती घेतली आहेत. याबरोबरच जी गावे जलयुक्त शिवार अभियानात सक्रीय लोकसहभाग घेतील त्यांना शासन यंत्रणेकडून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करुन दिली जाईल. राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 6 हजार 500 गावात जलसाठे निर्माण करण्यात आले असून, या उपक्रमातून 24 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध झाला असल्याचेही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
सायबर क्राईमला आळा बसावा, या उद्देशाने राज्य शासनाने आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून राज्यात 44 सायबर लॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला असून, कोल्हापूर जिल्ह्यातही सायबर लॅब सुरु होत आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात सुरु झालेल्या निर्भया पथक उपक्रमाचे कौतुक करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, निर्भया पथकामुळे मुलींच्या आणि महिलांच्या छेडछाडीला निश्चितपणे आळा बसेल,
स्वच्छ भारत मिशनच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली असून, हे अभियान यापुढील काळात गतिमान करण्यासाठी 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या काळात संपूर्ण राज्यात स्वच्छ महाराष्ट्रासाठी 18 लाख भेटी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शौचालये नसलेल्या 18 लाख कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे. हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्यातून अधिक प्रभावीपणे राबवून संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र बनवूया असे आवाहनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 2 कोटी वृक्ष लागवड  मोहिमेंतर्गत अडीच लाख लाकांचा सहभाग घेण्यात आला असून, जिल्ह्यात 8 लाख वृक्षलागवड झाली. जिल्ह्यात 2 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2016 या कालावधीत नवीन स्वरुपातील संत गाडगेबाबा अभियान राबविण्यात येत आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.