शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

कोल्हापुरात 2 सप्टेंबर पासून संत सावता माळी शेतकरी आठवडी बाजार - राज्यमंत्री सदाभाऊ खोत


        

कोल्हापूर, दि. 20 : व्यापाऱ्यांच्या जोखडातून शेतकऱ्यांना मुक्त करण्याची गरज असून त्या दृष्टीने शासनाने संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजार सुरु केला आहे. याला ग्राहकांमधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. या आठवडी बाजाराची सुरुवात कोल्हपुरात 2 सप्टेंबरला सासने ग्राऊंडवर होणार असून यात शेतकऱ्यांच्या 50 ऍ़ग्रो प्रोड्युसर कंपन्यांचे स्टॉल, बचत गटांचे खाद्य पदार्थांचे स्टॉल, शेतकऱ्यांचे स्टॉल यांचा समावेश असेल, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
            कोल्हापुरात संत शिरोमणी सावता माळी आठवडी बाजाराची सुरुवात करण्याच्या दृष्टीने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली. यावेळी  महानगरपालिका आयुक्त पी.शिवशंकर, महानगरपालिका उप आयुक्त विजय खोराटे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, पणन उप व्यवस्थापक सुभाष घुले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजार या उपक्रमातून शेतकऱ्याला शासन दिशा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून सदाभाऊ खोत म्हणाले, कायदे हे शेतकरी आणि ग्राहक या दोहोंच्या फायद्याचे असले पाहिजेत. आज रस्त्याच्याकडेला कोठेही लोक भाजीपाला घेऊन बसलेले असतात. त्यांना शिस्त असली पाहिजे. उत्पादक आणि ग्राहक अशी बाजाराची साखळी तयार करण्याचे शासनाचे धोरण असून काही झाले तरी उत्पादकाला दोन पैसे जादा मिळाले पाहिजेत. आज मार्केट कमिट्या अडती व्यापारांच्या हातात गेल्या असून उत्पादकांचा थेट मार्केटशी संबंध निर्माण झाला पाहिजे.  
            आठवडी बाजारासाठी महानगरपालिकेने मोक्याच्या तसेच शेतकरी ग्राहक अशा दोहोंच्या सोयीच्या जागा उपलब्ध करुन द्याव्यात. त्यासाठी महानगरपालिकेची तात्काळ सर्वसाधारण सभा बोलवावी. ज्या जागा  आरक्षित आहेत, त्या ठिकाणी नियोजित कार्यक्रम असल्यास आठवडी बाजाराला सुट्टी दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.  प्रत्येक स्टॉलला कमीत कमी सर्व्हीस टॅक्स आकारला जाईल.
            जे महिला बचत गट स्वत: बाजारात माल विक्रीसाठी येतात अशा महिला बचत गटांची महानगरपालिकेने यादी तयार करावी, असे सांगून राज्यमंत्री खोत यांनी आठवडी बाजारात विक्री करणाऱ्यांना सुरुवातीला स्टॉल उभारणी करण्यासाठी शासन मदत करेल. बचत गटांनी निवडलेला भाजीपालाच बाजारात आणावा. त्यासाठी त्यांना वार, वेळ ठरवून दिला जाईल. शेतकरी, बचत गट, ऍ़ग्रो प्रोड्युसर कंपन्या, विक्रेते यांना पणन विभागामार्फत लायसन्स दिले जाईल.
            या बैठकीत त्यांनी आत्माने विक्रीसाठी गट तयार करावेत. शासनाने आत्मांतर्गत प्रोड्युसर कंपन्यांना निधी उपलब्ध करुन दिला आहे, त्यांनी आपला माल थेट विक्रीसाठी बाजारात आणला पाहिजे. जे गट आठवडी बाजारांतर्गत विक्रीला येणार आहेत अशांना टेंट शासनामार्फत उपलब्ध करुन दिला जाईल त्याची नोंद पणन आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांच्याकडे राहिल. असेही त्यांनी स्पष्ट केले.

 00 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.