जलयुक्त शिवारने ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलेल
-
पालकमंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर, दि. 15 : गेल्या काही वर्षांमधली सततच्या पाणी टंचाईमुळे महाराष्ट्रातील शेतीचा विकास दर हा अत्यंत कमी झाला होता. पण टंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्याने जलयुक्त शिवार अभियान ही अतिशय महत्वकांशी योजना हाती घेऊन पाच वर्षात 33 हजार गावांमध्ये विकेंद्रीत पाणीसाठा निर्माण करण्याचे नियोजन केले आहे. दर वर्षी 6 हजार गावे टंचाईमुक्त होतील, त्यामुळे भुगर्भातील पाणीसाठा वाढेल यावर टिबक सिंचन पध्दतीचा आवलंब केल्यास प्रती एकरी उत्पादन वाढ होऊन शेती आणि शेतकरी सदन होईल या योजनेमुळे ग्रामीण भागाचे अर्थकारणच बदलेले, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
शिरोळ तालुक्यातील मौजे तमदलगे येथील 40 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या पाझर तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचून गळती लागली होती. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाव पाझर तलावातील गाळ काढून गळती काढण्यात आल्याने तसेच यावर्षी चांगला पाऊस झाल्याने तलाव पाण्याने भरला आहे. या पाण्याचे पूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते. यावेळी आमदार उल्हास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, यांत्रिकी मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलींद जिवने, कार्यकारी अभियंता मिलींद मोरे, उप वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळे, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, पंचायत समिती सदस्य सर्जेराव शिंदे, रत्नापाअण्णा कुंभार सहकारी सुत गिरणी तमदलगेचे अध्यक्ष अशोकराव माने, सरपंच सपना कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत घेतलेल्या कामातून तमदलगे येथील पाझर तलावात साठलेले पाणी पाहून आपल्याला अतिशय आनंद होत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जलयुक्त शिवार योजना ही शासनाच्या दुरदृष्टीचेे प्रतीक असल्याचे सांगितले. या योजनेंतर्गत 28 कोटी रुपये जिल्ह्यात खर्च करण्यात आले असून 4500 हेक्टर म्हणजेचे सुमारे 12 हजार एकर जमिन ओलीताखाली येईल इतका पाणीसाठा वाढला आहे. हेच पाणी टिबक सिंचन पध्दतीने वापरल्यास 19 हजार एकर क्षेत्र ओलीताखाली येईल. टिबकमुळे उत्पादनही वाढेल आणि चांगला दर मिळून शेतकरी सुखी होईल. तमदलगे ग्रामपंचायतीने टिबक सिंचन वापरण्याचा ठराव करावा व त्याचा स्वतंत्र प्रस्ताव द्यावा. त्यासाठी पाठपुरावा करुन महाराष्ट्र शासनाकडून निधी आणला जाईल असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
खासदार राजू शेट्टी यांनी तमदलगे पाझर तलावातील पाण्याचा उपयोग जैनापुर, निमशिरगाव, माणगाववाडी आदी ठिकाणांना हाईल, असे सांगून जलयुक्त शिवार अभियान योजनेत जिल्हाधिकारी यांनी तमदलगे गावचा समावेश केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. निसर्गाने दिलेले पाणी जमिनीत मुरले आहे, असे सांगून खासदार राजू शेट्टी म्हणाले, हा ठेवा जपून वापरा, ऊसा ऐवजी भाजीपाला उत्पादन घ्या, आज भाजीपाला थेट ग्राहकांना उपलब्ध होत आहे. याचे खरे शिल्पकार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आहेत ते सहकार व पणनमंत्री असताना बाजार समित्या नियमन मुक्त केल्यानेच हे शक्य झाल्याचे सांगितले.
आमदार उल्हास पाटील यांनी तमदलगे गावचे भौगोलिक क्षेत्र कमी आहे तलावाची साठवण क्षमता जास्त आहे. टिबक सिंचन अनुदान योजनेत या गावचा समावेश करुन 100 टक्के सबसिडी उपलब्ध करुन द्यावी. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असून त्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच रस्ता रुंदीकरणात गावचे दैवत बिरदेव मंदिर जाऊ नये यासाठीही विनंती केली. पाझर तलावापासून स्मशानभुमीचा रस्ता आमदार फंडातून करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद मोरे यांनी केवळ तीन महिन्यात पाझर तलावाचे काम पूर्ण केल्याचे सांगून यामुळे साधरणपणे 1 कोटी 90 लाख पाणीसाठा वाढला आहे. यासाठी 20 लाख 31 हजार रुपये खर्च झाल्याचे सांगून तलावातून काढण्यात आलेल्या गाळामुळे 200 एकर क्षारपड जमिन सुपिक झाली आहे. गाव टँकरमुक्त झाले आहे, असे सांगितले.
यावेळी मॅथॉरॅन अँड फ्लॅट पुणे या कंपनीतर्फे तलावातील विहिरीत सोडण्यासाठी 10 एचपीचा पंप मोफत देण्यात आला.
माजी सरपंच पिरगोंडा पाटील यांनी प्रस्तावना केली. सरपंच सपना कांबळे यांनी स्वागत केले.ग्रामपंचायत सदस्य संतोष कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.