गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६

जलयुक्तमुळे सातवणेत मिळू लागले संरक्षित पाणी




सर्वांसाठी पाणी - टंचाई मुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत कोल्हापूर जिल्हयात जलयुक्त शिवार अभियान  गतीमान केले आहे. चंदगड तालुक्यातील सातवणे गावांने जलयुक्त शिवार अभियानातून 55.65 टीसीएम इतका पाणीसाठा निर्माण केल्याने भात, ऊस भाजीपाल्यासारख्या पिकाच्या उत्पादनात शास्वतता आली आहे. ही यशस्विता आहे, जलयुक्त शिवार अभियानाची.
दीडहजार लोकसंख्या असलेल्या या गावात 694.52 हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी केवळ 10?7 हेक्टर क्षेत्र बागायती असून हे क्षेत्र यापुढील काळात वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त ठरत आहे. या गावांने शासन योजना तसेच लोकसहभागातून गावात माती नाला बांध, वळण बंधारा, शेततळे, मजगी या कामाव्दारे जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब थेंब अडवून तो जमिनीत  मुरविण्याच्या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले, त्यामुळेच 24 लाख 41 हजार रुपये खर्चून 55.65 टीसीएम इतका पाणीसाठा  होऊ शकला.
जलयुक्त शिवार अभियानातून या गावामध्ये जमिनीची धूप रोखण्यासाठी तसेच पाण्याचा अपधाव रोखून मुरवण्याच्या हेतूने ओघळ नियंत्रण उपचार माती नाला बांध घेण्यात आले. या बांधामुळे 12 टीसीएम पाणी अडवून जिरवण्याची क्षमता निर्माण केली आहे. ह्या बांधामुळे लाभ क्षेत्रामध्ये असणाऱ्या विहिरींची  पाणी पातळी अंदाजे 1 मीटरने वाढली आहे तसेच अडलेल्या पाण्यामुळे  परिसरातील जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे, तर पिकांसाठी संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था निर्माण झाली आहे.
सातवणे गावामध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रवाही सिंचन बंधारा उभारण्यात आला असून      15.60 हेक्टर भीज क्षेत्र निर्माण होऊन भात, ऊस भाजीपाला पिकासाठी पावसातील खंड प्रतिकूल परिस्थितीत संरक्षित पाणी देण्याची सोय होऊन पिकांच्या उत्पादनात शास्वतता आली आहे. तसेच सदरच्या प्रवाही सिंचन बांधामुळे रब्बी हंगामातील पिकांनाही जीवदान मिळाले आहे. या बरोबरच गावामध्ये या अभियानांतर्गत 30:30:3 मीटर आकाराचे शेततळे घेण्यात आले असून या शेततळ्यामुळे 2.19 टीसीएम इतकी पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे . त्यामुळे भात, ऊस भाजीपाला पिकांना संरक्षित पाण्याची सोय झाली आहे.
सातवणे गावामध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 27.42 हेक्टर क्षेत्रावर मजगीचे काम झाले असून 44 लाभधारक शेतकऱ्यांच्या भात शेती क्षेत्रात वाढ होऊन अंदाजे 900  क्विंटल भात पीक उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. तसेच चंदगड तालुक्यात बांधावर काजू पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. त्यामुळे सदर निर्मित मजगी क्षेत्राच्या बांधावर काजू पिकाची जवळपास 4000 झाडांची लागवड झालेली आहे. त्यापासून आगामी 4 वर्षानंतर त्यांना प्रत्येक झाडांपासून 4 किलो काजू बिया मिळतील, यामुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक उत्पादनाचे नवे साधन निर्माण होऊन त्यांचे जीवनमान सुधारेल.
एकंदरीत जलयुक्त शिवार अभियानामुळे चंदगड तालुक्यातील सातवणे गावाने केलेली जलक्रांती गावकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मोलाची भर टाकणार असल्याने गावातील शेतकरी जलयुक्त शिवार अभियानाबाबत समाधान व्यक्त करीत आहेत.

                                                                                    एस.आर.माने

                                                        माहिती अधिकारी, कोल्हापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.