कोल्हापूर,
दि. 21 : सेंद्रीय शेती विकसित करण्यास शासनाने प्राधान्य दिले असून शेतकऱ्यांच्या गटामार्फत राबविण्यात येत असलेल्या या योजनेत सहभाग होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रती गटास 14 लाख 95 हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यात या योजनेतून 30 गटांमार्फत सेंद्रीय शेती योजना राबविण्याचे उद्दिष्ट असल्याचे आत्माचे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन देणे, सहभागी हमी पध्दतीने प्रमाणिकरण, सेंद्रीय शेती ग्राम विकसित करणे, शेती मालाचे प्रमाणिकरण आणि विक्री व्यवस्था करण्याकरीता परंपरागत कृषि विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 50 शेतकऱ्यांच्या समुह तयार करुन 50 एकर क्षेत्र निर्धारीत करुन ही योजना राबविली जाणार आहे. एका गटाकरीता एक महसूली गाव अथवा ग्रुप ग्रामपंचातीची निवड करुन एका गटासाठी 50 एकर क्षेत्राचा व कमीत कमी 50 शेतकऱ्यांचा समावेश एका गावातून करण्यावर
भर दिला आहे. सेंद्रीय शेती तंत्रज्ञानानुसार सेंद्रीय उत्पादनासाठी लागणाऱ्या निविष्ठा प्राधान्याने शेतकऱ्यांनी गावात तयार करण्यात येत असून त्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठा गावातच उपलब्ध होणार आहेत.
सेंद्रीय शेतीसाठीच्या शेतकरी गटासाठी शासनाच्या वतीने 3 वर्षासाठीच्या या योजनेंतर्गत एका गटासाठी 14 लाख 95 हजाराचे अनुदान देण्यात येणार असून जिल्ह्यात 30 शेतकरी गट तयार करण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत 16 शेतकरी गटांनी नोंदणी केली आहे. उर्वरित गटांसाठी तसेच या योजनेच्याअधि माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तसेच प्रकल्प संचालक आत्मा यांच्याशी संपर्क साधावा.
0 0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.