कोल्हापूर दि. 14 :- श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाळ सोहळयास 12 ऑगस्टपासून सुरुवात झाली असून हा सोहळा 12 सप्टेंबर 2017 पर्यंत साजरा होत आहे. या सोहळयानिमित्त आज सिक्कीमचे राज्यपाल महामहिम
श्रीनिवास पाटील यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडीस भेट देऊन श्रीचे दर्शन घेतले तसेच कन्यागत महापर्वकाळ सोहळयानिमित्त करण्यात आलेल्या कामांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.
राज्यपाल महामहिम श्रीनिवास पाटील यांचे आज श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आगमन होताच प्रशासनाच्यावतीने तहसिलदार के.बी.काकडे यांनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. तर श्री क्षेत्र नृसिंहवाडी गावच्यावतीने सरपंच अरुंधती जगदाळे यांनीही त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासमवेत आमदार उल्हास पाटीलही उपस्थित होते.
कन्यागत महापर्वकाळ सोहळयानिमित्त राज्य शासनाने दिलेल्या निधीतून कृष्णाकाठावर घाट, रस्ते, दर्शन मंडप यासारख्या अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून राज्यपाल महामहिम श्रीनिवास पाटील यांनी या कामांबद्दल समाधान व्यक्त करुन भाविकांची आणि जनतेची या सुविधामुळे उत्तम सोय झाल्याचे मत व्यक्त केले.
श्री दत्त मंदिरात जावून त्यांनी श्रींचे दर्शन घेतले आणि केलेल्या घाटाच्या उभारणीच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर भक्त निवासात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार उल्हास पाटील, करवीर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य, श्री नृसिंह सरस्वती दत्त देवस्थानचे अध्यक्ष राहुल पुजारी, सचिव संजय पुजारी, माजी अध्यक्ष विनोद पुजारी, शशिकांत पुजारी, सरपंच अरुंधती जगदाळे, तहसिलदार के.बी. काकडे, हातकणंगलेच्या तहसिलदार श्रीमती वैशाली राजमाने आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना राज्यपाल महामहिम श्रीनिवास पाटील म्हणाले, श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे वर्षभर साजरा होणारा कन्यागत महापर्वकाळ सोहळा मोठया उत्साहाने आणि आनंदाने साजरा झाला असून तो जनतेच्या सदैव स्मरणात राहील, यातून जनतेला नवी प्रेरणा आणि उत्साह मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कन्यागत महापर्वकाळ सोहळयानिमित्त राज्य शासनाने केलेल्या विकास कामांमुळे भाविकांची सोय झाली असून श्री क्षेत्र नृसिंहवाडी आणि परिसराचा चेहरा-मोहरा बदलला आहे. कन्यागत महापर्वकाळ सोहळयानिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी आणि कृष्णाकाठाचे नांव जगाच्या नकाशावर पोहोचले आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. याकामी आमदार उल्हास पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल आणि सक्रीय योगदानाबद्दल राज्यपाल महामहिम श्रीनिवास पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी आमदार उल्हास पाटील म्हणाले, कन्यागत महापर्वकाळ सोहळयानिमित्त राज्य शासनाने 121 कोटीचा निधी मंजुर केला असून पहिल्या टप्यात सुमारे 65 कोटीची विकास कामे पूर्ण केली आहेत. या सोहळयामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडीसह कृष्णाकाठावरील तीर्थक्षेत्रावर भाविकांची आणि पर्यटकांची सोय झाली असून त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे सोईचे झाले आहे.
याप्रसंगी करवीर पीठाचे जगदगुरु शंकराचार्य यांचेही आशिवचन झाले.
प्रारंभी श्री नृसिंह सरस्वती दत्त देवस्थानचे ट्रस्टी राजेंद्र खोंबारे-पुजारी यांनी स्वागत करुन कन्यागत महापर्वकाळ सोहळा आणि त्यानिमित्त कृष्णा काठावर शासनामार्फत करण्यात आलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. राज्यपाल महामहिम श्रीनिवास पाटील यांचा सत्कार करवीर पीठाचे जगदगुरु शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभास श्री नृसिंह सरस्वती दत्त देवस्थानचे ट्रस्टी तसेच मान्यवर पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक तसेच भाविकही उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.