गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६

अवयवदान अभियानात कोल्हापूर जिल्ह्याचे काम राज्यात सर्वात चांगले - जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी






        कोल्हापूर, दि. 1 : अवयवदानात राज्यात कोल्हापूर जिल्ह्याचे काम सर्वात चांगले असून सर्व घटकांचा समन्वय उल्लेखनीय आहे, यातून अवयवदानाबाबत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन अवयवदानासाठी लोक पुढे येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
            महाअवयवदान अभियानाच्या तिसऱ्या दिवशी नोंदणी फॉर्मस स्विकृत करुन या अभियानाची औपचारिक सुरुवात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
            गेल्या तीन दिवसापासून अवयवदान अभियान सातत्याने सुरु असून जिल्ह्यातील किमान 10 टक्के लोकांनी अवयवदानाचे फॉर्म भरावेत हे फॉर्म भरल्यानंतर आपल्या नातेवाईकांमध्येही याबाबत सजगता निर्माण करावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी महाभारतातील कर्णाच्या चरित्रातून प्रत्येकाने त्याची दान करण्याची प्रवृत्ती त्यासाठी लागणाऱ्या इच्छाशक्तीचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी अवयवदान केलेल्यांचे आभार मानले. तसेच या अभियाना दरम्यान पथनाट्य सादर करणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या तसेच सावित्रीबाई फुले नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आपला अवयवदानाचा फार्म भरल्यानंतर डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते त्यांना अवयवदाता पत्रिका देण्यात आली.
            यावेळी अवयवदात्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये कमलाकांत कुलकर्णी, मंगल मारुती सावंत, आक्काताई पाटील या तिघांनी आपआपल्या मुलासाठी किडनी दान केली आहे. सुवर्णा गवळी यांनी आपल्या पतीसाठी, राणी चौगुले यांनी आपल्या भावासाठी किडनी दान केली आहे.
किडनी दानानंतरही मी खणखणीत - कमलाकांत कुलकर्णी
            कमलाकांत कुलकर्णी यांनी सन 2013 साली मुलगा किडनी फेल्युअर असल्याचे समजल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला यावेळी मुलाला आपली किडनी दिली. आज मुलगा चॅटर्ड अकाऊंट असून त्याची प्रॅक्टीस व्यवस्थित सुरु आहे. मुलाने गिरीष कमलाकांत कुलकर्णी नावाने किडनी फौंडेशन सुरु केले असून आपली तब्येत खणखणीत आहे. दर 15 दिवसांनी आपण कोल्हापूर ते जोतिबा चालत जातो. यातून इतरांनीही अवयवदानासाठी प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
मी आणि पती दोघेही आनंदी - सुवर्णा गवळी
            सुवर्णा गवळी यांनी दोन वर्षापासून आपल्या पतीला किडनीचा त्रास होत होता. त्यांना किडनी देऊन पुनर्जन्म देण्याची माझी इच्छा झाली. त्यातून आपले पती आणि आपण दोघेही आज आनंदी जीवन जगत असल्याचे सांगितले.
खरी साथ आणि प्रेरणा पतीची - राणी चौगुले
            राणी चौगुले यांनी आपल्या भावासाठी किडनी दिली. जेव्हा आपल्याला भावाला किडनीची गरज असल्याचे समजले त्यावेळी आपल्या पतीने किडनी दानात खरी साथ आणि प्रेरणा दिली. आपली मुले लहान असल्याने भावाने सुरवातील किडनी घ्यायला नकार दिला. आपल्या पतीने अवयवदानाबाबत दोघांचीही तयारी करुन घेतल्याचे सांगून आपल्या पतीचे आभार मानले.
            यावेळी अवयवदान अभियानाच्या यशस्वीतेसाठी मदत करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात रोट्री क्लबचे हेमंत दळवी, महालक्ष्मी अन्न क्षेत्र सेवा ट्रस्टचे राजू मेवेकरी, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. शिरीष पाटील, डॉ. सुनिल करंबे, डॉ. अजित गायकवाड, डॉ. अजित रोकडे, जिल्हा एड्स नियंत्रण समितीची सर्व टीम, अनुप्रिया घोरपडे, डॉ. बसरगे, डॉ. दिपक देवळापुरकर आदींचा सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले. आभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस.पाटील यांनी मानले.
 00 00 0  0


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.