रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

शाहुवाडी तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना देणार - पालकमंत्री चंद्रकांत पाटील





कोल्हापूर दि.10  - निसर्गाने नटलेल्या शाहुवाडी तालुक्यात पर्यटन विकासासाठी चांगली संधी आहे. त्याला संकलित स्वरुप  देऊन चालना मिळाल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी निर्माण होतील त्या दृष्टीने शाहुवाडी तालुक्याला पर्यटनाच्या बाबतीत जगासमोर आणण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री पालकमंत्री चंद्राकांत पाटील यांनी केले.
     पंचायत समिती शाहुवाडीच्या नविन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन महसुल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्‌टी होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटीलआ. सतेज पाटील, आ. सत्यजित पाटील, आ. उल्हास पाटीलमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार,  माजी आमदार संजिवनीदेवी गायकवाड, माजी आमदार राव धोंडी पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, पंचायत समिती सभापती पंडीत नलवडे, जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी पाटील, आकांक्षा पाटील, गोकुळचे संचालक बाबा देसाई, उपविभागीय अधिकारी सुचेता शिंदे, गटविकास अधिकारी उदय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
     निसर्गाने नटलेल्या शाहुवाडी तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगून महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेती पर्यटन लक्षात घेऊन या तालुक्यात प्रक्रिया उद्योग उभे राहणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले. आक्टोंबर महिन्यांत होणाऱ्या पर्यटन महोत्सव मध्ये 40 टूर ऑपरेटर्सचा सहभाग असून शाहुवाडी तालुक्यात त्यांची टूर घडवून येथील पर्यटनस्थळे अधोरेखित करण्यात येतील. असे स्पष्ट केले. पंचायत समिती शाहुवाडीची इमारत अतिशय कमी निधीत अतिशय देखणी उभारली असून या सुंदर इमारतीतून कामेही सुंदर व्हावीत सामान्य माणसाला न्याय मिळावा, शासनाच्या सर्व योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यात यावा अशी आपेक्षा व्यक्त केली.
     खासदार राजु शेट्टी यांनी विकासाची गंगा डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यत पोहचणे आवश्यक असल्याचे सांगून त्यासाठी विशेष पॅकेज देण्यात यावे अशी मागणी केली. शाहुवाडी तालुक्याकडे केवळ बॉक्साईडचा तालुका म्हणून पाहता विशाळगड, अंबा, बर्की या पर्यटनस्थळांचा विकास त्यातून रोजगाराच्या संधी यासाठी चालना देणे आवश्यक असल्याचे सांगून याठिकाणी अधिकाऱ्यांचा निवासस्थानाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि त्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी पंचायत समिती सदस्याचे अधिकार आणि निर्णय प्रक्रियेतील त्यांचा सहभाग वाढविण्याची आवश्यकता व्यक्त केली.
     आमदार सतेज पाटील म्हणाले, बदलत्याकाळात ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजेत हे शासनाचे धोरण असून जनतेला गावात सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली. संग्राम योजनेतून गावाच विविध दाखल्यांसाठी ऑपरेटर निर्माण केले होते. ती योजना पुन्हा पुर्ववत सुरु करावी, प्रशासकीय इमारतीच्या देखाभालीबाबत राज्यस्तरावरुन धोरणात्मक निर्णय व्हावा अशी मागणी त्यांनी केली.
     आमदार सत्यजित पाटील म्हणाले, पंचायत समितीची नविन प्रशासकीय इमारत पुर्ण होऊन बराच काळ उद्घटनाच्या प्रतिक्षेत होती. या इमारतीच्या पुर्णत्वासाठी सर्व पक्षीयांचे सहकार्य लाभले आहे. चांगल्या इमारतीमधून जनतेला सुविधाही चांगल्या मिळाव्यात.  यावेळी त्यांनी शाहुवाडी तालुक्याच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातून 42 कोटींचा निधी उपलब्ध झाल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्राकांत पाटील यांचे आभार मानले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडीत नलवडे यांनी केले. आभार पंचायत समितीचे माजी उपसभापती नामदेव पाटील यांनी मानले. यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ मोठ्यासंख्येन उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.