कोल्हापूर दि. 12 : राज्य शासनाच्या अवयवदान अभियानास कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेकडून उर्त्स्फूत प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 4 हजाराहून अधिक लोकांनी अवयवदानाचे फॉर्म भरुन नोंदणी केली आहे. या पुढील काळातही हे अभियान गतीमान केले जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल.एस.पाटील यांनी आज माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संवादपर्व कार्यक्रमात बोलताना सांगितले.
येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय परिसरात सीपीआर हॉस्पिटल तरुण मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या गणेशोत्सवात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संवादपर्व कार्यक्रमात डॉ. एल.एस.पाटील बोलत होते. संवादपर्व कार्यक्रमास माहिती अधिकारी एस. आर. माने, मंडळाचे अध्यक्ष सुधीर आयरेकर, संजय क्षिरसागर, डॉ. निरगुंडे, डॉ. देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.
अवयवदान हे श्रेष्ठदान असल्याचे स्पष्ट करुन जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. पाटील म्हणाले, मृत्यूनंतरही आपण अवयवदानाच्या स्वरुपात दुसऱ्याच्या शरिरात जीवंत राहू शकतो. अवयवदानाच्या या उदात्त कार्याला जात, धर्म, लिंग यांचे बंधन नसल्याचे सर्वानीच अवयवदानासाठी तात्काळ नोंदणी करावी. आज देशात किमान 5 लाख रुग्ण मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असून हे रुग्ण अवयवांच्या प्रतिक्षेत आहेत. 50 हजार रुग्ण यकृताच्या म्हणजे लिव्हरच्या प्रतिक्षेत आहेत तर 2 हजार रुग्ण ह्दयाच्या प्रतिक्षेत आहेत. सध्यस्थितीत 12000 पेक्षा जास्त रुग्ण विविध अवयवांच्या प्रतिक्षेत आहेत. अशा प्रकारच्या रुग्णांना आवश्यक अवयव उपलब्ध करुन देणे व त्यांना एक नवीन जीवनदान देणे या हेतुने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून अवयवदान चळवळ उभारण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने हे अभियान यशस्वी करण्याचा संकल्प करावा.
मुलगा-मुलगी असा भेद न करता मुलींनाही सन्मानाची आणि समानतेची वागणूक देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे सांगून जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. पाटील म्हणाले, वंशाला दिवा मुलगा हवा या वर्षांनुवर्ष ख्खोलवर रुजलेल्या विचाराने मुला-मुलीत फरक केला जात आहे, ही समाजाला घातक बाब आहे. आज राज्यातला मुलींचा जननदर हा 1000 मुलांच्या मागे 894 इतका आहे, तर कोल्हापूरात मुलींचाजन्म दर 1000 मुलांच्या मागे 893 इतका आहे.
मुलांच्या बरोबरीनेच मुलींचा जन्मदर वाढावा, त्यांना चांगली शिक्षण मिळावा, त्यांच्या आरोग्यचा दर्जा उंचवावा आणि बालविवाहास प्रतिबंध व्हावा आदी कारणांसाठी केंद्राच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेच्या धर्तीवर राज्यात माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरु करण्यात आली असून या योजनेत जिल्हयातील सर्वांनीच सक्रीय व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच समाजात छुप्यापध्दतीने होणारी स्त्रीभृणहत्या रोखण्याकामीही सर्वानी दक्ष रहावे, असे आवाहनही त्यंनी केले.
गणेशोत्सवात संवादपर्व उपक्रमाद्वारे शासन राबवित असलेल्या विविध विकास तसेच कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उदेशाने शासनाने सुरु केलेंल्या संवादपर्व उपक्रमाविषयी माहिती अधिकारी एस. आर. माने यांनी माहिती सांगितली. संवादपर्व या उपक्रमाची संकल्पना विषद करुन गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या प्राधान्यक्रमाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच गावकऱ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन केले.
प्रारंभी सीपीआर हॉस्पिटल तरुण मंडळाचे अध्यक्ष सुधीर आयरेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. संवादपर्व कार्यक्रमास मंडळाचे सदस्य प्रभाकर शेळके, चरणदास घावरी, सुरेंन्द्र कांबळे, प्रताप कुरणे, सतिश शिंदे, गणेश आसगांवकर, संतोष गडीयाळ, अनिल पंडत, प्रेम लोट, राजू मारुडा यांच्यासह अन्य पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सिंग स्टाफ, रुग्णांचे नातेवाईक तसेच नागरिक उपस्थित होत्या.
000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.