कोल्हापूर दि. 8 : ग्रामीण भागातील जनतेला बँकिंग विषयक आर्थिक लाभ मिळावे, तसेच बेरोजगारी दुर व्हावी या प्रमुख उद्देशाने राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेस जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 32 हजार 925 लाभार्थ्यांना 247 कोटी 82 लाखांचे अर्थसहाय्य विविध बँकाच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती अग्रणी जिल्हा प्रबंधक (बँक ऑफ इंडिया ) एम.जी.कुलकर्णी यांनी दिली.
राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने गणेशोत्सवात संवादपर्व हा उपक्रम राज्यभर राबविला जात असून, कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने संवादपर्व कार्यक्रमातून सामाजिक जाणिवजागृतीची, प्रबोधनाची श्रेष्ठ परंपरा पुढे नेण्यास प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कागल येथील सरकार ग्रुपच्यावतीने आयोजित केलेल्या गणेशोत्सवात संवादपर्व कार्यक्रमात अग्रणी जिल्हा प्रबंधक एम.जी.कुलकर्णी बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, माहिती अधिकारी एस. आर. माने, कागलचे पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, मंडळाचे अध्यक्ष धैर्यशील (भैय्या) इंगळे, सचिव दिपक मगर आदिजण उपस्थित होते.
मुद्रा योजना ही होतकरु, बेरोजगार युवकांना रोजगार निर्मितीसाठी सहाय्यभूत ठरणारी महत्वपूर्ण योजना असल्याचे सांगून श्री. कुलकर्णी म्हणाले, जिल्ह्यात मुद्रा योजना सन 2015 पासून राबविली जात असून आतापर्यंत 32 हजार 925 लाभार्थ्यांना 247 कोटी 82 लाखांचे अर्थसहाय्य विविध बँकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यामध्ये शिशू योजनेंतर्गत 28 हजार 495 तरुणांना 76 कोटी 39 लाख, किशोर योजनेंर्गत 3 हजार 549 तरुणांना 107 कोटी 75 लाख आणि तरुण योजनेंतर्गत 881 तरुणांना 63 कोटी 68 लाखाचे अर्थ सहाय्य करण्यात आले आहे. यापुढील काळातही ही योजना अधिक प्रभावी राबविली जाईल.
मुद्रा योजनेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करुन त्यांची जीवनमान उंचावण्यासाठी जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज उपब्ध करुन देण्यावर शासनाचा भर आहे. या योजनेंतर्गत तीन गटामध्ये कर्ज उपलब्ध करु दिले जात असून शिशू गटासाठी 10 हजार ते 50 हजार, किशोर गटासाठी 50 हजार ते 5 लाख आणि तरुण गटासाठी 5 लाख ते 10 लाख असे कर्ज जिल्ह्यातील सहकारी, राष्ट्रीय, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक वित्तीय संस्थामार्फत उपलब्ध करुन दिले जात आहे.
मुद्रा योजनेच्या माध्यमातून छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांनाही कर्ज उपलब्ध होऊ शकते त्याच बरोबरच सुतार, गवंडी काम, कुंभार, सलुन, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते इत्यादी लहान स्वरुपाच्या व्यवसायासाठीही कर्ज देण्याची तरतुद केली आहे. यावेळी श्री. कुलकर्णी यांनी प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तसेच अटल पेंशन योजनेचीही सविस्तर माहिती सांगितली.
यावेळी संवादपर्व कार्यक्रमात पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनीही गणेशोत्सव आणि शासन योजना या संदर्भात माहिती दिली.
प्रारंभी सरकार ग्रुपचे अध्यक्ष धैर्यशील इंगळे यांनी स्वागत केले. माहिती अधिकारी एस. आर. माने यांनी संवादपर्व या उपक्रमाची संकल्पना विषद करुन गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या प्राधान्यक्रमाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच गावकऱ्यांनी योगदान द्यावे असे सांगितले.
शेवटी धीरज खोत यांनी आभार मानले. या कार्यक्रमास उपनिरीक्षक डी.बी. वाघचौरे, विवेक पाटील, सुदर्शन कोरवी यांच्यासह सरकार ग्रुपचे अन्य पदाधिकारी, शहरातील मान्यवर व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.