गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

विभागीय क्रिडा संकुल कंत्राटदाराला नोटीस द्या - एस.चोक्कलिंगम्




        कोल्हापूर, दि. 8 :  विभागीय क्रिडा संकुलातील बाह्य विद्युतीकरणातील डि.जी. सेट, हायमास्ट लाईट ट्रॉन्स्फॉरमर आदी कामी वारंवार सूचना देऊनही कंत्राटदाराने पूर्ण केली नाहीत. 4 जूनला झालेल्या बैठकीत त्यांना 45 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली होती. तथापि अद्यापही कामे पूर्ण झाल्याबद्दल कंत्राटदाराला नोटीस देण्याच्या सूचना  विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम् यांनी केल्या.
            विभागीय क्रिडा संकुल समिती कोल्हापूरची बैठक  विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता आर.एस.पाटीलउपसंचालक क्रिडा अनिल चोरंबले, जिल्हा क्रिडा अधिकारी वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी टेनिस क्रिडांगण भाडे तत्वावर चालविण्यास देण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन, मुंबई या संघटनेने विभागीय क्रिडा संकुलातील तीन टेनिस क्रिडा संकुले प्रत्येकी 50 हजार वार्षिक भाडे तत्वावर चालविण्यासाठी तयार असल्याचे सांगितले असून याबाबत चर्चा करण्यात आली. क्रिडा संकुलाच्या पश्चिम बाजूकडील वारे वसाहतीचे सांडपाणी पावसाचे जमा होणारे पाणी यांचा निचरा करण्यासाठी संरक्षण भिंतीच्या बाहेरील बाजूने ओपन नाल्याची खुदाई करुन पाईपलाईनद्वारे सदर पाण्याचे निर्गतीकरण करण्याची शिफारस सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. परंतू याबाबतही कंत्राटदाराने कामे केली नसल्याचे याबैठकीत सांगण्यात आले. विभागीय क्रिडा संकुलाच्या पहिल्या टप्प्यातील निविदेमध्ये समाविष्ठ नसलेल्या परंतू आवश्यक बाबींचे कामांबाबत कंत्राटदाराला कामे वेळेत पूर्ण केल्याबद्दल नोटीस द्यावी. पेनॉल्टी रक्कम वसूल करण्याबाबत नोटीस द्यावी, अशाही सूचना विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम् यांनी दिल्या. यावेळी क्रिडा संकुलामध्ये कंत्राटी पध्दतीने कर्मचारी नेमणूकीबाबत चर्चा होऊन कामगार आयुक्तांनी निश्चित केलेल्या दरानुसार मानधन निश्चित व्हावे, असेही चोक्कलिंगम् यांनी सांगितले.

  0 0 0 00 0 0 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.