शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

गणेश मुर्तींचे विसर्जन पर्यावरण पूरक करुन जल प्रदुषण टाळा - पालकमंत्री चंद्रकांत पाटील


     

कोल्हापूर, दि. 2 : आगामी गणेशोत्सवात गणेश मुर्तींचे विसर्जन पर्यावरण पूरक करुन जल प्रदुषण टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या.
            गणेश मुर्ती विसर्जनाच्या उपाययोजनांच्या चर्चेबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पर्यावरणतज्ञ प्रा. उदय गायकवाड, निसर्ग मित्र संस्थेचे अनिल चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
            गणेश मुर्तींचे विसर्जन शास्त्रीय पध्दतीने करण्यासाठी प्रभावी अभियान राबवावे, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, तलाव, तळी, नद्या यातील जल प्रदुषण मोठ्या प्रमाणात होते. ते टाळण्यासाठी काटेकोर उपाययोजना कराव्यात, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, कृत्रिम तलाव, कृत्रिम कुंड, काईली यांची संख्या वाढवावी. निर्माल्याच्या वर्गीकरणासाठी आणि संकलनासाठी अवनीच्या कचरा संकलन करणाऱ्या महिलांची मदत घ्यावी. शास्त्रीय पध्दतीने मुर्तींच्या विघटनासाठी आवश्यक रसायने उपलब्ध करुन द्यावीत, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी केल्या.
            पुर्वी गणेश मुर्ती शाडूच्या बनवल्या जात असत. पण आता सार्वजनिक गणेश मुर्ती प्रमाणेचे घरगुती मुर्तीही मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बनू लागल्या आहेत. अशा मुर्तींच्या विसर्जनाने तळी, तलाव नद्यांमधील पाण्यात जल प्रदुषण वाढत आहे. हे प्रदुषण टाळणे आवश्यक असून प्लॅस्टर ऑफ पॅरिसने बनविलेल्या गणेश मुर्तींचे पर्यावरणपुरक विसर्जन शास्त्रीय पध्दतीने करणे शक्य आहे. विघटनामधून प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे निर्माण होणारे प्रदुषण टाळून पिके झाडांसाठी खत उपलब्ध करुन देता येईल. त्यामुळे जनतेने या पध्दतींचा अवलंब करावा, असे आवाहनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

 00 0 0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.